Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजदुसरी बायको सोसायटीला ताप

दुसरी बायको सोसायटीला ताप

क्राइम अ‍ॅड. रिया करंजकर

शहरीकरण म्हटल्यावर त्या ठिकाणी अनेक उंच उंच इमारती दाटीवाटीने उभ्या राहिलेल्या आहेत. शहराकडे जाणाऱ्या लोकांचा कल असल्यामुळे इथे इमारती उभे राहिल्या आणि इमारतीला को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे नामांतर झाले.
सोसायटीमध्ये अनेक लोकांनी रूम घेऊन ते राहायला आल्यानंतर त्या सोसायटीतील रहिवाशांची सर्व इत्यंभूत माहिती ही सोसायटीच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आली. प्रत्येकाची एक वेगळी स्वतंत्र फाईल करण्यात आली. गृहनिर्माण संस्थेचे नियम या सोसायटींना लागू झाले. काही सोसायटींमध्ये अनेक प्रकरण आजही न्यायालयात प्रलंबित आहेत.

तारा नावाच्या सोसायटीमध्ये चार विंग होत्या. प्रत्येक विंगमध्ये ४० खोल्या होत्या. म्हणजे एकूण ३६० खोल्या होत्या. सुशिक्षित लोकांची ही सोसायटी होती. पण या सोसायटीला काही थकबाकीदारांमुळे मनस्ताप सहन करावा लागत होता. पण याच्यातील एक अशी व्यक्ती होती की, त्याचा प्रश्न संपता संपतच नव्हता. धनंजय कारवार यांच्या नावावर बी विंग मधली रूम होती. आणि त्याला अनेक नोटिसा पाठवून सुद्धा तो काही थकबाकी भरत नव्हता. रजिस्टर ऑफिसला जाऊन मी थकबाकी भरतो असे तो फक्त सांगायचा पण भरत मात्र नव्हता. त्या घरामध्ये त्याची दुसरी बायको राहत होती. पहिली बायको त्याची मृत पावलेली होती आणि ही दुसरी बायको केलेली होती. तिचे नाव संध्या असे होते. सोसायटीला ज्या नवीन सभासदांची नियुक्ती झाली होती त्यांना काही गोष्टी माहीत नव्हत्या.

धनंजयला विचारले तर तो सरळ सांगायचा की, तिथे माझी बायको राहते. तिच्याकडून तुम्ही वसूल करा. मी तिथे राहत नाही. कारण धनंजय तिथे राहतच नव्हता. तो आपल्या दोन मुलांबरोबर म्हणजे पहिल्या बायकोच्या दोन मुलांबरोबर दुसरीकडे राहत होता. या ठिकाणी त्याची दुसरी बायको संध्या ही तिच्या पहिल्या पतीची एक मुलगी व धनंजयची एक मुलगी अशी तिघीजणी त्या खोलीत राहत होत्या. चार वर्षे झाली तरीही तिने अजून थकबाकी भरली नव्हती.

एक दिवस असे झाले की, सोसायटीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर तेथील सेक्रेटरीने मेसेज टाकला की, पाणी या वेळेला फक्त दहा मिनिटं येणार आहे. त्या ग्रुपला फक्त तिचा नवरा ॲड होता. संध्या ॲड नव्हती. त्यामुळे तिला मेसेज गेला नाही आणि पाणी सोसायटीमध्ये येऊन गेले. बाकीच्यांना पाणी मिळाले. मला मिळाले नाही. मुद्दाम हे लोकं करतायेत, मी मेंटेनेस भरत नाही असं तिला वाटलं आणि तिने जाऊन सोसायटीची तक्रार पोलीस स्टेशनला केली. सोसायटीतल्या सेक्रेटरी व इतर सदस्यांना बोलवण्यात आले. त्यावेळी आम्ही पाणी सोडले होते. त्यांनी सांगितले की, दहा मिनिटे पाणी आलेले होते. ही गोष्ट ती मान्यच करायला तयार नाही. मुद्दाम तुम्ही सोडले नाही. त्यावेळी सेक्रेटरीने ग्रुपवर पाठवलेला मेसेज दाखवला. आता त्या ग्रुपवर नाही, हिला सांगण्याची जबाबदारी तिच्या नवऱ्याची आहे, आमची नाही. आम्ही पाणी बंद केलेलं नाही. पोलिसांनी विनंती करून अजून पाच मिनिटात तिला पाणी सोडा असे सांगितले. म्हणून सेक्रेटरीने रिंगचा कॉक चालू करताना व्हीडिओ शूटिंग केले. पाणी दहा मिनिटं सोडले आणि बंद केले. तरीही पुन्हा पोलीस स्टेशनला गेली आणि तिने परत सोसायटीच्या विरुद्ध तक्रार केली. त्यावेळी पोलिसांनी सेक्रेटरीला विचारले असता, सेक्रेटरींनी सोसायटीत यायला सांगितले. पोलीस त्या ठिकाणी आले. सेक्रेटरीने काढलेला व्हीडिओ त्यांना दाखवला.

त्यावेळी पोलिसांनी संध्याला चांगले झापले आणि त्यावेळी मग सोसायटीने सांगितले की, चार वर्षे झाली ही मेंटेनन्स भरत नाहीये. पण हिला सोई सगळ्या पाहिजेत. त्या पोलिसांनी याबाबत संध्याला विचारला असता, ती म्हणाली, घर माझ्या नवऱ्याच्या नावावर आहे. तो भरेल. यांनी नवऱ्याकडे मागावे. त्यावेळी सोसायटीतल्या लोकांनी सांगितले मी नवऱ्याला विचारले तर नवरा सांगतो, बायको तिथे राहते. बायकोकडून मागणी करा. आम्ही कोणाकडून मागायचे? सोसायटीने सांगितले, हिला लाईट बिल भरता येते, सामान भरता येते, फक्त सोसायटीचा मेंटेनन्स देता येत नाही. सोसायटीने काही नियम बनवलेले होते. मुलांचा खेळण्याचा वेळ काय असेल, बाहेरून येणाऱ्या डिलिव्हरी बॉईज कुठे उभे राहतील, या सगळ्या गोष्टी सोसायटीने सोसायटीच्या सेफ्टीसाठी केलेल्या होत्या. संध्या मात्र टाईम टेबल काहीच बघत नसे. मुलांना खाली खेळायला पाठवत असे. त्या दोन मुलींच्या आरडाओरडाने लोकांना त्रास होत असेल आणि तिच्याबद्दल तक्रार आली आणि तिला बोलावलं तर ती उलट बोलायची. मुलांना कळलं पाहिजे आणि खेळण्यासाठी कुठला टाईम उलट उत्तरं ते द्यायचे. माझी मुलं कुठे जाऊन खेळणार तेही सांगा असे सोसायटीलाच विचारायची. वॉचमनने तिच्या मुलांना इथे खेळू नका, तिकडे खेळा असे जरी म्हटलं तरी ती खाली येऊन वाॅचमेनला चांगल्या शिवीगाळ करत असे. या सगळ्या गोष्टींना सोसायटी वैतागलेली होती. या सर्व गोष्टींमुळे आजूबाजूची लोकही तिला वैतागलेली होती.

सोसायटीने विचार केला की, हिच्याबद्दल तक्रार द्यायची. कारण धनंजय कारवार यांची जी फाईल होती त्याच्यामध्ये त्यांचे दोन मुलगे नॉमिनी होते. यात संध्याचा कुठे उल्लेखही नव्हता. की ती त्याची दुसरी बायको आहे याच्याबद्दल काही माहिती दिलेली नव्हती. ती नक्की बायकोच आहे का, हे सोसायटीला माहीत नव्हते. ती भाडोत्री आहे, त्याचा अॅग्रीमेंट आहे की नाही त्यामुळे धनंजयला बोलवण्यात आले. तू मेंटेनन्स भरत नाहीये. तुझी बायको आम्हाला दादागिरी करते. तुम्ही मेंटेनन्स तरी भरा नाहीतर बायकोला तरी काढतो. तो सोसायटीला बोलू लागला की, तिची तक्रार करून तिलाच घराबाहेर काढा की, एकदा घराबाहेर काढली तर मला तो रूम विकता येईल कारण ती आहे तोपर्यंत मला रूम विकता येणार नाही म्हणजे तो सोसायटीला सांगत होता की, तुम्ही तिच्याविरुद्ध कारवाई करा आणि तिला घरातून बाहेर काढा म्हणजे मी रूम विकीन आणि तुमचं मेंटेनेस पूर्ण करेन. एक रुपया मेंटेनन्स न भरता जरी झाडूवाले, कचरेवाले नाही आले तर सर्वात अगोदर शिव्या घालायला हीच पुढे असते. रजिस्टर ऑफिसवरून नोटीस येऊनही मी तिथे राहत नाही. संध्या तिथे राहते असं तू तिथेही जाऊन सांगतोस. सोसायटीने सांगितलं की, घर तुझ्या नावावर आहे. त्यामुळे तुलाच मेंटेनन्स भरावा लागेल. तो धनंजय उलट सांगतो, घर जरी माझ्या नावावर असलं तरी घरात संध्या राहते. सोसायटीच्या सगळ्या सुख-सुविधा ती उपभोगते. मग मी मेंटेनन्स का भरायचा असा उलट प्रश्न तो सोसायटीला करतो. या नवरा बायकोच्या भांडणामध्ये आज आता सोसायटीने योग्य तो सल्ला घेऊन धनंजय कारभार यांच्याविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यासाठी तक्रार केलेली आहे.
(सत्यघटनेवर आधारित)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -