Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाजभारत माझा देश आहे

भारत माझा देश आहे

नक्षत्रांचे देणे – डॉ. विजया वाड

आपल्या देशाबद्दल स्वाभिमान जागृत व्हावाच अशी सध्याची वेळ आहे. आपल्या पाठ्यपुस्तकात, ‘भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशाचा मला अभिमान आहे.’ अशा अर्थाची प्रतिज्ञा छापलेली असते पण दस्तावेज किती तरुण दिलांवर उमटतो? माझे पती आई-वडिलांचे एकुलते अपत्य! पण तरी ते इंडियन आर्मीत शॉर्ट सर्व्हिस कमिशनवर होते. राष्ट्रपतीच्या रक्षा मेडलचे मानकरी आहेत ते. १९६५ चे भारत-पाक युद्ध लढले आहेत या सर्व गोष्टी मला सार्थ अभिमान आहे.

मी आयुष्यभर शिक्षिका म्हणून नोकरी केली. शिक्षिका, पर्यवेक्षिका, मुख्याध्यापिका, संचालिका ही सर्व पदे भूषविली. पण तसे करताना एक तास रोज ‘देशाभिमान’ या विषयाशी निगडित असे. त्यामुळे माझे कितीतरी विद्यार्थी भारतीय सैन्य दलात गेले. अगदी डॉक्टर, इंजिनीअर होऊन सुद्धा! त्यांना मी एक गीत नेहमी शिकवीत असे. ते असे…
‘मी भारतीय आहे
मज सार्थ गर्व आहे
माझ्याच भारताचे
मी एक बीज आहे ! ।।१।।
‘काळीच’ आई माझी
मजला अतिव प्यारी
तव प्राण रक्षिण्याला
मम जीव हा करारी ।।२।।
‘गे मायभू तुलाही
अर्पीन भावमाला
माझ्या पवित्र हाते
माझा प्रणाम तुजला’ ।।३।।

माझा प्रत्येक विद्यार्थी भारत प्रेमी व्हावा ही माझी मनोमन इच्छा असे. त्यातून काही विद्यार्थी लष्करात गेले नि मला नमस्कार करायला आले, की माझे मन नि डोळे भरून येत. त्यांना जवळ घेताना, मायेने थोपटताना, काळजाचा ठोका चुके. पण भारतप्रेम आपण जुन्या पिढीकडून तरुणाईकडे सोपवीत आहोत याचा अभिमान वाटे.
एक दिवस माझा उदयांचलचा विद्यार्थी संपूर्ण लष्करी वेषात माझ्या समोर आला. “टीचर, मी आदिल. १९९९ ची बॅच! आठवतं का? एनसीसीचा कोस्ट कॅडेट म्हणून तुम्ही माझ्या युनिफॉर्मवर बिल्ला लावला होता..”

“हो हो आदिल ! आठवते ना!” मी म्हटले.
“तेव्हाच ठरविले होते. भारतीय सैन्यात जायचे.”
“किती छान.”
“माझे सिलेक्शन झालेय.”
“अरे वा ! अभिनंदन आदिल!” मी आनंदले.
“तुम्ही माझ्या आवडत्या शिक्षिका.”
“मला ते ठाऊक आहे आदिल.”
“म्हणून तुम्हाला शोधत आलो. मला समजले की उदयांचल सोडून तुम्ही प्रमोशनवर पोदार स्कूलमध्ये आलात. मग तडक विक्रोळीहून सांताक्रूझला या शाळेत आलो.”
“खूप छान केलंस.”
“मी त्याला आग्रहाने बसविले. चहा नि वडा खायला दिला तो त्यानं आवडीने खाल्ला.
“टीचर, माझं पोस्टींग सियाचेनला झाले आहे.”
“अरे बापरे!” मी घाबरले.
“तो तर डेंजरस आहे ना रे आदिल?”
“अहो सैन्य म्हणजेच धोका ! फार काय होईल? मी शहीद होईन!”
“असे नको रे बोलूस.”
“का टीचर?”
“माझे मन थरकते ! घाबरे होते. मुझे डर लगता है !”
“घाबरू नका टीचर.”
माझे भरून आलेले डोळे आदिलने मायेने पुसले
“हम होंगे कामयाब एक दिन ! हां. हां मनमें है विश्वास! हम होंगे कामयाब एक दिन.” त्याने गात गात मला विश्वास दिला.
“टीचर, एक दिवस विजयी सैनिक म्हणून तुम्हाला भेटायला येईन. तोवर आशीर्वाद द्या.”
“तो वाकला मी आनंदाने रडत रडत म्हणाले, “विजयी भव ! विजयी भव ! भारत माताकी जय ! अखंड भारताचा विजय असो !”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -