तेल अवीव : येमेनमधून हुती अतिरेक्यांनी बॅलेस्टिक क्षेपणास्त्राद्वारे इस्रायलच्या तेल अवीव विमानतळावर हल्ला केला. इस्रायलच्या क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणेने या हल्ल्याचा जोरदार प्रतिकार केला. अतिरेक्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे एअर इंडियाचे दिल्ली – तेल अवीव विमान तातडीने अबुधाबीला वळविण्यात आले. हे विमान अबुधाबीच्या विमानतळावर उतरले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. विमान लवकरच दिल्लीला परत येणार आहे.
🚨Sirens sounded across Israel due to a projectile launch from Yemen pic.twitter.com/ZxgypYMEJp
— Israel Defense Forces (@IDF) May 4, 2025
एअर इंडियाच्या AI 139 या बोईंग ७८७ प्रकारच्या प्रवासी विमानाने दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन उड्डाण केले. हे विमान इस्रायलमध्ये तेल अवीव येथे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणार होते. पण अतिरेक्यांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर आकाशात आयत्यावेळी एअर इंडियाच्या विमानाचा मार्ग बदलण्यात आला. विमान तेल अवीव ऐवजी अबुधाबीला रवाना झाले. विमान जॉर्डनच्या हवाई हद्दीतून उडत असताना मार्गात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अतिरेक्यांनी तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात सहा जणांना किरकोळ दुखापत झाली. जखमींवर उपचार सुरू आहेत. क्षेपणास्त्र हल्ला होत असल्याचा अंदाज येताच इस्रायलने तातडीने तेल अवीवच्या बेन गुरियन विमानतळावरील कामकाज थांबवले होते. विमानतळावर येत असलेली सर्व विमानं दुसऱ्या मार्गांवर वळवण्याचा निर्णय झाला. यानंतर एअर इंडियाच्या विमानाच्या मार्गात बदल करण्यात आला. प्रत्यक्ष हल्ला होण्याआधीच इस्रायलने विमानतळावर उड्डाण आणि लँडिंग थांबवले होते. दिल्ली – तेल अवीव हे विमान अबुधाबीला उतरवण्यात आले. नंतर हे विमान अबुधाबीतूनच परत दिल्लीला पाठवण्याचा निर्णय झाला. तेल अवीव – दिल्ली हे उड्डाण रद्द करण्यात आले.
तेल अवीवसाठीची सर्व उड्डाणं रद्द
भारतातून तेल अवीवला जाणारी सर्व उड्डाणं ६ मे पर्यंत रद्द करण्यात आली आहेत. सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.