Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्ससमीक्षा कालातीत नसते...

समीक्षा कालातीत नसते…

पाचवा वेद

मागील लेखामुळे एका नाटकाच्या सादरकर्त्यांमध्ये माझ्या नाट्यनिरीक्षणाबाबत थोडी नाराजी व्यक्त झाली. नाराजी, लिखाणातल्या मतांवर होती. नाटक जन्माला आले की ते मुरू द्यावे व नंतर चाखावे असे एक ढोबळ विधान केले जाते व ते मी माझ्या लेखात केलेही होते. मुरणे म्हणजे प्रयोग होऊ देणे. त्यामुळे नाटक “सेट” होण्यास मदत होते. मग माझा प्रश्न असतो की, नाटकाच्या तालिमी कशासाठी करायच्या? माझी समजूत अशी होती की, तालमीमध्ये नाटक सेट होते आणि रंगीत तालीम हा थिएटरमधला प्रयोगच असतो, मात्र विना प्रेक्षक… तांत्रिक टिमने ती केलेली चाचपणी असते. आज हे मी आपल्याशी का शेअर करतोय कारण या शिष्टाचाराचे स्वरुपच बदलून गेलेय. पहिले किमान पाच प्रयोग हे म्हणे समीक्षकांसाठी नसतातच. चांगले लिहायचे झाल्यास नाटकाचा खरा परफॉर्मन्स पाचाच्या पुढल्या प्रयोगांमध्ये दिसतो आणि समीक्षकाने आता चांगले लिहीले तरच त्या नाटकाला लोकाश्रय मिळतो. या एकंदर थिअरीचं काही कळेनासच झालंय. तरी बरं मी माझ्या लिखाणाला “निरीक्षण” म्हणतो, असो तर या नाट्यपरीक्षणावर खास वाचकाग्रहास्तव लिहावे म्हणतो.

मुळात समीक्षेमुळे अथवा समीक्षा वाचून हल्लीचे प्रेक्षक नाटक बघायला जातात हीच मुळात अंधश्रद्धा आहे. बायका रेसिपी वाचून नेहमीच्या डिशमधे बदल करतील किंवा नव्याने त्या लिखित कतीनुसार बदल करतील परंतु पेपरातील सो कॉल्ड नाटकाची स्टोरी सांगितलेली परीक्षणं वाचून त्या नाटकाला जाण्याची सुतराम शक्यता नसते. जनरली मराठीच नव्हे, तर इतर भाषिक नाटके चालतात ती नट नट्यांच्या नावावर. लेखक, दिग्दर्शक वगैरे जंत्री फार पुढची गोष्ट असते. आज मला विजय केंकरेंचे नाटक बघायचे आहे असे म्हणून कुणीही नाटक बघायला जात नाही. एखादा दिग्दर्शक त्या बघितल्या जाणाऱ्या नाटकामुळे प्रेक्षकांच्या “वाट्यास” येतो ज्यास योगायोगाने गवसलेला दिग्दर्शक म्हणावे लागते. सर्वसाधारणपणे नाटकाच्या जाहिरातीतील कॅची लाईन्समुळे प्रेक्षक भुलतो. उदा. ४०-५० वर्षांच्या प्रदीर्घ गॅपनंतर अमक्या तमक्याचे पुनरागमन किंवा शेवटचे दहा प्रयोग किंवा प्रयोग क्रमांक २५ असला तरी “पनवेलमधे आज नाटकाचा शुभारंभ” या असल्या मजकुराला प्रेक्षक कायम बळी पडतं आलाय. नाटक चालवण्याची ती क्लुप्ती आहे, मात्र याची पोलखोल समीक्षकानी करायची म्हटली की, त्याच्या नावाने लाखोली वाहायला सुरुवात करायची, ही हल्ली वाचकांना लागलेली सवयच आहे. जाहिरात हेच नाटक प्रमोशनचे मुळ केंद्र आहे. त्यातील समीक्षेमुळे होणारा प्रपोगंडा प्रचंड दुर्लक्षित झालाय. कारण समीक्षा लिहिणारे समीक्षच उरलेले नाहीत. मी तर माझ्या लेखात नाटकाची स्टोरीच सांगतो किंवा माझा लेख म्हणजे माझ्या पेपरात “जागा भरो आंदोलनाची” भूमिका बजावतो. या अविर्भावामुळे नाटक नावाचा व्यवसाय ओढगस्तीला लागला असावा. प्रेक्षक चांगल्या समीक्षा वाचू न शकल्याने नाटकाकडे फिरकत नसावेत असा भाबडा समज मी करुन घेतलाय. म्हणून मग समीक्षा म्हणजे काय ते सांगावेसे वाटतेय, ते सांगतो…!

नाट्यसमीक्षेची संज्ञा व्यापक आहे. नाटकाची समीक्षा संहिता आणि प्रयोग अशा पातळीवर होत असते. साकल्याने नाट्य हे संहितालक्ष्यी समीक्षेच्या व्यापकतेने अधिक सुदृढ आणि परिपक्वतेकडे जाणारी असली तरी प्रयोगलक्ष्यी समीक्षा परीपूर्णत्वाकडे नेत असते. यासंदर्भात अनेक समीक्षकांची मत-मतांतरे आहेत. नाट्यसमीक्षा केवळ नाटकाच्या समीक्षेची नसावी तर ती नाट्यप्रयोगाचीही असावी यासंदर्भात व. दि. कुलकर्णी म्हणतात, नाट्यसमीक्षा ही समीक्षेच्या जातीतील एक वेगळी जाती आहे. ते पुढे म्हणतात, नाट्यसंहितेतील प्रत्येक शब्दांबरोबर त्या प्रत्येक शब्दांइतकेच रंगमंचावरील त्याच्या अवतरणाच्या तपशिलाला कलादृष्ट्या समान महत्त्व असते हे संपूर्णपणे जाणणारे दोघेच असतात. एक दिग्दर्शक, दुसरा समीक्षक! माधव मनोहर याविषयी म्हणतात, नाटक हे दृश्य काव्य असले तरी नाट्यसंहितेची दृश्यता ही अल्पकालिक असते, तर मूळ संहितेची महत्ता चिरकालिक असू शकते. नाटकाचा प्रयोग तात्कालिक असतो, तर नाटक कालातीत असू शकते.

हे लय म्हंजे लयच सैद्धांतिक बोललो राव…! कोणी बघितलीय ती समीक्षा ? ती बाई आहे, चेटकीण आहे की गाढवीण? सद्यस्थितीतील नाटके या समीक्षेच्या वाटेलाच जात नाहीत. त्यामुळे नवी पिढी विचारणारच ना ? की समीक्षा कुठल्या गाढवीणीचे नाव आहे म्हणून?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -