Friday, May 9, 2025
Homeदेशपाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर भारताने घातली बंदी

पाकिस्तानमधून होणाऱ्या आयातीवर भारताने घातली बंदी

नवी दिल्ली : पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानमधून होणाऱ्या सर्व प्रकारच्या आयातीवर बंदी घातली आहे. पाकिस्तानमधील वस्तू तिसऱ्या देशाच्या माध्यमातून आयात करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक हितांच्या रक्षणासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे भारत सरकारने जाहीर केले आहे. या निर्णयाला अपवाद करायचा झाल्यास त्यासाठी भारत सरकारची परवानगी घेणे बंधनकारक असेल.

पाकिस्तानमध्ये तयार होणाऱ्या वस्तू, पाकिस्तानमधून निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तू तसेच पाकिस्तानमधील वस्तू तिसऱ्या देशाच्या माध्यमातून आयात करण्यावर भारत सरकारने बंदी घातली आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या पाकिस्तानमधून आयात करणाऱ्यावर भारताने बंदी लागू केली आहे. वाणिज्य मंत्रालयाने बंदी लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

भारताने अटारी सीमेवरुन पाकिस्तानसोबत होणारा व्यापार थांबवला आहे. व्यापारासाठी अटारी सीमेचा वापर पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. एका अहवालानुसार भारत पाकिस्तानमधून एकूण आयातीच्या ०.०००१ टक्के एवढीच आयात करतो.

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नागरिकांची हत्या केली. मृतांपैकी २५ पर्यटक आणि एक स्थानिक होता. या हल्ल्यातील पाकिस्तानचे संबंध उघड झाल्यानंतर भारताने पाकिस्तान विरोधात कठोर पवित्रा घेतला आहे. भारताने पाकिस्तानमधून होणारी आयात थांबवली आहे. तसेच पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना भारताचे हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी घातली आहे. भारतातील पाकिस्तानच्या नागरिकांचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या दुतावासातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. सिंधू नदी पाणी वाटप करार स्थगित करण्यात आला आहे.

भारताच्या कारवाईला उत्तर म्हणून सिमला करार एकतर्फी रद्द करू, अशी धमकी पाकिस्तानने दिली आहे. तसेच पाकिस्ताननेही भारतीयांचे व्हिसा रद्द करणे, भारताच्या दुतावासातील कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात करणे हे निर्णय घेतले. भारतासोबतचा व्यापार स्थगित केला. भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांना पाकिस्तानचे हवाई क्षेत्र वापरण्यास बंदी घातली आहे.

भारत – पाकिस्तान दरम्यान सीमेवर दररोज गोळीबार सुरू आहे. अतिरेक्यांनी हल्ला केला त्या दिवसापासून दररोज पाकिस्तानकडून भारताच्या चौकी – पहाऱ्यांना लक्ष्य करुन गोळीबार केला जातो. या गोळीबाराला भारताकडून प्रत्युत्तर दिले जाते. प्रामुख्याने रात्रीच्या वेळी गोळीबाराच्या घटना घडत आहेत. शुक्रवार २ मे आणि शनिवार ३ मे दरम्यान रात्री पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीरच्या कुपवाडा, उरी आणि अखनूर भागात नियंत्रण रेषेवर लहान शस्त्रांनी गोळीबार केला. ज्याला भारतीय सैन्याने तात्काळ चोख प्रत्युत्तर दिले. तणाव वाढू लागला आहे. भारत पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी मोठी लष्करी कारवाई करेल, अशी भीती पाकिस्तानच्या मनात घर करू लागली आहे. या भीतीपोटी पाकिस्तानच्या सीमेजवळची अनेक गावं रिकामी झाली आहे. ग्रामस्थ घर बंद करुन मौल्यवान चीजवस्तू घेऊन सुरक्षित ठिकाण गाठू लागले आहेत. अनेक बँकांनी पाकिस्तानमध्ये सीमेजवळच्या जिल्ह्यांतील त्यांच्या शाखा बंद केल्या आहेत. यामुळे पाकिस्तानमध्ये गोंधळाची आणि भीतीची स्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी आणि लष्करी अधिकाऱ्यांनी त्यांच्या जवळच्या नातलगांना युरोपमध्ये स्थलांतरित केले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -