Categories: रिलॅक्स

श्रीलंका ब्रॉडकास्टिंग स्टेशनची सफर

Share

मेघना साने

श्रीलंकेला जाताना मी अतिशय उत्साही होते. कारण लहानपणी ज्या रेडिओ स्टेशनवरून मी बिनाका गीतमाला ऐकण्याचा आनंद घेतला ते रेडीओ स्टेशन मला प्रत्यक्ष पाहण्याचा योग येणार होता! आपले पूर्वीचे रेडिओ सिलोन म्हणजेच आताचे श्रीलंका ब्रॉडकास्टिंग स्टेशन.प्रत्यक्ष रेडिओ स्टेशन पाहिले, तर त्याची इमारत एका मोठ्या बैठ्या बंगल्यासारखी होती. समोर पद्मासनात बुद्धाची पांढरी शुभ्र मूर्ती होती. अपॉइंटमेंटप्रमाणे बरोबर नऊ वाजता रेडिओ स्टेशनमधील हिंदी डिपार्टमेंटच्या निवेदिका सुभाषिणी मॅडम यांची भेट झाली. त्यांनी आम्हाला रेडिओ स्टेशन पाहायला नेले. इमारतीच्या लांबलचक कॉरिडॉरमध्ये आपल्या हिंदी सिनेमातील जुन्या संगीतकारांचे, गायकांचे फोटो लावले होते. तसेच त्यात श्रीलंकेच्या प्रसिद्ध संगीतकारांचेही फोटो होते. सुभाषिणी मॅडम आम्हाला एक स्टुडिओ बघायला घेऊन गेल्या. ते एक ऑडिटोरियमच होते. तिथून संगीताचे लाईव्ह कार्यक्रम प्रसारित केले जातात. त्या रंगीबेरंगी स्टुडिओमध्ये वादक तालमीची तयारी करत होते. कारण थोड्याच वेळात संगीताचे एक लाईव्ह प्रसारण सुरू होणार होते.

मी सुभाषिणी यांना बिनाका गीतमालेचे लोकप्रिय निवेदक अमीन सयानी कोणत्या स्टुडिओत रेकॉर्डिंग करत होते तो पाहायला मिळेल का असे विचारले. त्या म्हणाल्या, “अमीन सयानी तर रेडिओ सिलोनला कधी आलेच नव्हते. तो कार्यक्रम मुंबईत रेकॉर्ड करून त्याचे स्पुल्स आमच्याकडे येत असत. ते स्पुल्स आम्ही इथे वाजवीत होतो.” मग हा कार्यक्रम मुंबईतूनच प्रसारित का होत नव्हता हा प्रश्न मी विचारला. त्या म्हणाल्या, “चला लायब्ररीमधे बसूया. मी तुम्हाला सर्व इतिहास सांगते.” त्या आमच्याशी हिंदीत बोलत होत्या.

ती लायब्ररी म्हणजे रेकॉर्ड्सची (ध्वनिमुद्रिका) लायब्ररी होती. चारही भिंती रेकॉर्ड्सनी व्यापल्या होत्या. सुमारे २६००० पेक्षा अधिक रेकॉर्डस् तिथे आहेत. जी गाणी भारतातल्या आकाशवाणी केंद्रांवर मिळणार नाहीत तीसुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत, असे त्या सांगत होत्या. रेडिओ सिलोन हे सिलोनवर ब्रिटिशांचे राज्य असताना १९२५ साली ब्रॉडकास्टिंग स्टेशन म्हणून सुरू झाले. तसे प्रयोग म्हणून १९२३लाच येथून प्रसारण करून पाहिले होते. प्रयोग यशस्वी झाल्यावर १६ डिसेंबर १९२५ पासून हे स्टेशन प्रसारणासाठी रीतसर सज्ज झाले. श्रीलंकेचे नाव तेव्हा सिलोन होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर लगेचच म्हणजे १९४९ साली सिलोनलाही स्वातंत्र्य मिळाले. रेडिओ सिलोन हे कॉर्पोरेशनच्या अधिपत्याखाली आले व १९६७ साली त्याचे नाव सिलोन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (CBC) झाले. आज या केंद्रातून सिंहली, तमिळ आणि इंग्रजी भाषेतून कार्यक्रम प्रसारित होतात. त्यावेळी या आकाशवाणीसाठी वेगळे मंत्रिपद नव्हते. सिलोन ब्रॉडकास्टिंग डिपार्टमेंट हे पोस्टमास्तरांच्या अधिकार क्षेत्रात होते. आता १९७२ सालापासून म्हणजे सिलोनचे नाव श्रीलंका झाल्यापासून हे रेडिओ केंद्र श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन(SLBC) झाले.

मात्र या रेडिओवरून हिंदी भाषेतील प्रसारण कसे सुरू झाले त्याची एक कथा आहे. भारतात १९५०च्या सुमारास चित्रपट निर्मित भरात आली होती. चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी त्याच्या गाण्यांची प्रसिद्धी करणे हे निर्मात्यांचे धोरण होते. कारण गाण्यांमुळे लोक चित्रपटाकडे आकृष्ट होत असत. पण तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री बी. व्ही. केसकर यांनी आकाशवाणीवरून सिनेसंगीत प्रसारित न करण्याचा नियम आणला होता. केवळ लोकगीते, भजने व अभिजात शास्त्रीय संगीत प्रसारित व्हावे व आपली संस्कृती टिकून राहावी अशी त्यांची भूमिका होती. त्यामुळे चित्रपटसंगीताची गळचेपी होऊ लागली. भारतातील या घडामोडींवर श्रीलंकेतील आकाशवाणीचे अधिकारीही लक्ष ठेवून होते. त्यांचे शॉर्टवेव्हमधील प्रसारण संपूर्ण हिंदुस्तानात ऐकू येत असे. त्यामुळे भारतातील चित्रपट क्षेत्रातील लोकांनी रेडिओ सिलोनकडे मोर्चा वळवला. सर्व ग्रामोफोन रेकॉर्डस् निर्माते रेडिओ सिलोनला त्यांच्या नव्या रेकॉर्डस् पाठवू लागले. रेडिओ सिलोनला गाण्यांच्या प्रसारणासाठी जाहिरातीही मिळू लागल्या.

त्यावेळच्या मद्रासमधील एका जाहिरात कंपनीचे प्रमुख हरिहरन यांनी भारतातून जाहिराती मिळवून त्या सिलोनला पाठवायला सुरुवात केली. रेडिओ सिलोनवर जाहिरातींचा व्याप खूप वाढला. या विभागात काम करणाऱ्या माणसांना दिवसाचे तास आणि मिनिटे कमी पडू लागली. प्रसारणात जागोजाग जाहिरातीचा स्पॉट लावावा लागे. त्यासाठी तज्ज्ञ मंडळींचे एक वेगळे डिपार्टमेंटच उभारण्यात आले. या जाहिरात सेवेच्या बदल्यात श्रीलंकेला पैसे मिळत नसत. पण या सेवेच्या बदल्यात श्रीलंकेला अशोक लेलँडकडून मोफत बसेसचा पुरवठा होऊ लागला. अर्थात, भारतातील जाहिरातदार अशोक लेलँडला या बसेसचे पैसे देत असत. १९५२ साली बिनाका टूथपेस्टच्या निर्मात्यांनी ‘बिनाका गीतमाला’ सुरू केली. त्यात हिंदी गाण्यांची लोकप्रियतेनुसार क्रमवारी ठरत असे. अमीन सयानींसारखे उत्तम निवेदक लाभल्यामुळे हा कार्यक्रम अधिकच लोकप्रिय होत होता.

इकडे भारतात आकाशवाणीवरून सिनेसंगीत वाजणे बंद झाल्यामुळे आकाशवाणीची लोकप्रियता कमालीची घसरली. तेव्हा भारत सरकारने सिनेसंगीतावरील बंदी उठवली. त्यामुळे श्रीलंकेतून शॉर्ट वेव्हवरून प्रसारित होणारा ‘बिनाका गीतमाला’ कार्यक्रम बंद होऊन भारतातून मीडियम वेव्हवरून ‘सिबाका गीतमाला’ या नावाने प्रसारित होऊ लागला.

सुभाषिणी मॅडमनी सांगितले की, आता श्रीलंका ब्रॉडकास्टिंग स्टेशनवरून दोन मुख्य सेवा दिल्या जातात. एक राष्ट्रीय (National) आणि दुसरी व्यावसायिक (Commercial). दोन्ही सेवा या सिंहली, तमिळ व इंग्रजीत उपलब्ध आहेत. याशिवाय, श्रीलंकेतील मुलांची शैक्षणिक प्रगती व्हावी या दृष्टीने शाळेतील शिशु ते माध्यमिक तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा अनेक चांगले उपक्रम रेडिओवरून राबवले जात आहेत. तसेच ते इंटरनेट रेडिओवरही ऐकता येतात. रेडिओ सिलोन म्हणजेच आताचे श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन ही एक नॅशनल इन्स्टिट्यूशनच झाली आहे.

meghanasane@gmail.com

Recent Posts

जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगांचा भारत दौरा

नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…

9 minutes ago

भारताने पाकिस्तानच्या फेक नरेटिव्हचा बुरखा फाडला

नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…

25 minutes ago

पाकिस्तानचा खासदार घाबरला; संसदेत ढसाढसा रडला!

एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…

48 minutes ago

भारताच्या हल्ल्यात मारला गेला जैश – ए – मोहम्मदचा कमांडर रउफ असगर, भारतीय विमान अपहरणाचा होता सूत्रधार

इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…

2 hours ago

रावळपिंडी स्टेडियम उद्ध्वस्त; भारताच्या ड्रोन हल्ल्याने पाकिस्तान हादरला!

पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…

3 hours ago

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

3 hours ago