अरविन्द दोडे
तो हा सकळ जीवांचा विसावा |
नैष्कर्म्य सुखाचा ठेवा |
परी उघड करूनी पांडवा |
दाविजत असे ॥४.४७॥
तो हा अधियज्ञ सर्व जीवांचा विसावा आहे आणि नैष्कर्म्यसुखाचा ठेवा आहे, पण तो मी तुला उघड करून दाखवत आहे. वैराग्यरूपी काष्ठं पेट घेतात. इंद्रियरूपी अग्नीत विषयविकारांची आहुती देतात. थोरामोठ्यांच्या महासिद्धान्तांचा आवाका मोठा असतो. आपल्या अल्पबुद्धीला तो कळत नाही. गुरूच्या ज्ञानाचं, अभ्यासाचं ज्येष्ठत्व श्रेष्ठ असतं. तो नैराश्याची सगळी चिन्हं हटवतो. अनाहताचे मेघ वर्षवतो. वासनांतराची विवंचना मिटवतो. विरक्तीच्या वणव्यात आसक्तीची स्वप्ने जाळून टाकतो. मोक्षलक्ष्मीच्या भुवनी घेऊन जातो. पुण्यकर्माचा ओलावा वाढवतो. देहांतीची व्याकूळता मिटवतो. ज्ञानाची आस वाढवतो. विषयांचे भय मिटवतो. मानसीचं वांच्छित पुरवतो. धाक दाखवतो. लाड करतो. आकाराच्या ऐलतटावरून निराकाराच्या पैलतटावर नेतो. गुरू काय काय असतो? तो प्रेमाचा पुतळा असतो. भक्तीचा जिव्हाळा असतो. मैत्रभावाची चित्कळा तोच असतो. अखेर आत्मानंदाची गुढी उभारतो अन् प्रसादाने तृप्त करतो. महासुखाची गोडी कळल्यावर आपणही स्वेच्छेनं विरक्तीचे पाणी ग्रहण करतो!
गुरुकुलातील पवित्र वातावरणात पशुपक्षी निर्भयपणे येत असत. असा विश्वास शिष्यांनाही वाटत असे. तिथून जावेसे वाटत नसे. इतक्या निसर्गरम्य वातावरणात वृक्षवल्लीही फुलत. एकदा एका गुरूला शिष्याने विचारले, “तुम्ही कुणालाही गुरू मानता. पशूला, पक्ष्याला, निर्जीव गोष्टीला हे कसे काय?” “सांगतो, ऐक! मी एकदा भटकंती करत होतो. गुरूचा शोध घेत होतो. उन्हाळा कडक होता. तहान लागली होती. नदीकाठी आलो. स्वच्छ, नितळ पाणी प्यायला. शांतपणे निसर्गसौंदर्य न्याहाळू लागलो. तेवढ्यात एक कुत्रं आलं. तेही तहानने व्याकुळले होते. काठावर उभं राहून त्याने पाण्यात पाहिले. त्याचं प्रतिबिंब पाहून भुंकू लागले. पाण्यात दुसरं कुत्रं असेल असे समजून मागे सरले. बऱ्याच वेळाने ते पुन्हा पाण्याजवळ गेले. पुन्हा मागे सरले. तहान वाढली होती. दुसऱ्या कुत्र्याशी लढण्याचे त्राण नव्हते. असे पाच वेळा झाले. अखेर त्याने सरळ पाण्यात उडी मारली. मनसोक्त पाणी प्यायला. ताजातवाना झाला. काठावर आला. अंग झटकून निघून गेला… मी त्याला गुरू मानले. कुणालाच, कशालाच घाबरायचे नाही. मरणाला तर नाहीच नाही. निर्भय झालो! जो धाडस करत नाही, तो सरस ठरत नाही. कुठल्याही संकटांशी सामना करायला शिकलो.”
या कथेचे तात्पर्य कथेतच आहे. मित्रहो, ‘जो जो जयाचा देखिला गुण | तयासी गुरू केले जाण॥’ बस! प्रत्येकाच्या अंत:करणात प्रेमस्वरूप परमेश्वर असतो, पण त्याचं प्रेम निद्रिस्त असते. ते जागृत करून, प्रवाहित करण्यासाठी कुणाच्या तरी प्रेमात पडावे लागते. समजा, हजाराची नोट आहे. तिचे सुट्टे पैसे करावे लागतात. सुट्टे केले नाहीत तर व्यवहार होत नाही. तसे प्रेमाचे आहे. ‘प्रेम आहे’ असे म्हणून उपयोग काय? ते करायला नको? कृतीत दिसायला नको? स्पर्शातून कळायला नको? त्याचा अनुभव यायला नको? प्रेम केल्याशिवाय प्रेमसुख मिळणार कसे? गुरू सर्वांवर प्रेम करतो. ते प्रवाहित ठेवतो. त्या प्रवाहाचा आत्मलाभ ज्यांना घेता येतो ते परम भाग्यवान! अशा प्रेमदेवतेचे अस्तित्व विश्वव्यापी असते. हा अभेदयोग साधकाने कसा साधावा? गुरुप्रेम करून ‘परस्परो देवो भव’ ही समरसतेची भावना जागवून.
आत्मज्ञानाच्या शक्तीवर आरूढ झालेला, तत्त्वज्ञानाने अलंकृत असलेला, भुक्ती आणि मुक्ती देणारा, मुक्तिमार्ग दाखवणारा गुरू परमपूज्य असतो. गुरूच्या कार्यकर्तृत्वाची जसजशी ओळख होत जाते, तसतशी शिष्याची एकनिष्ठता वाढत जाते. गुरू ही दिसते गरीब, साधी, भोळी व्यक्ती. पण तिचा आत्मबळाचा आविष्कार पूर्ण झालेला असतो. गुरूचे वस्त्रालंकार कोणते? आत्मज्ञान! फुलं गोळा केली की सुगंध आपसूकच हाती येतो. गुरूही असाच असतो. मनाच्या आकर्षक कोमलतेबरोबरच अध्यात्मविद्येचा अमर सुवासिक देऊन सार्थकतेचे तोरण लावतो. आत्मवैभवाचा मालक करतो. भक्त दु:खमुक्त होतो. सुखयुक्त होतो. अशा चिंतामणीस्वरूप गुरूला पुन्हा पुन्हा नमस्कार करावा. शरण जावे.
गुरू हा शिष्याचे संचित पुसून टाकतो. पाप-पुण्याची फळं मिळतात. ती परिपक्वं कर्मफळं असतात. प्रारब्ध टाळता येत नाही. गुरू कुणाच्या प्राक्तनात ढवळाढवळ न करता, सारं काही भोगण्याची ‘सहनसिद्धी’ देतो. त्याच्या कृपेने कुठलेही भोग सुसह्य होतात. उभा जन्म उन्हात गेला तरी झळ बसत नाही. ताप वाटत नाही. उलट संकटांवर मात करण्याची शक्ती वाढते. वाईट गोष्टी करायला अक्कल लागत नाही. चांगल्या करायला मात्र आधी मनाची तयारी लागते. नंतर करताना बुद्धी हवी. जन्मोजन्मी केलेली कर्मे, जन्मोजन्मी भोगावी लागतात. पुन्हा नव्या कर्मांची नवीन फळं! अशी सतत पेरणी अन् सतत पीक येतच राहते. गुरुकृपेचे हेच वैशिष्ट्य असते की ती लाभली, तर प्रारब्धभोग संपतात! कर्म करूनही त्याचा लेप शिष्याला लागू देत नाही, ही गुरूची जादू. संचित आणि क्रियमाण यांच्यातून गुरू हा शिष्याला मुक्त ठेवतो. ही कर्जमुक्ती केवळ गुरुभक्तीने मिळते. अनेक पिढ्यांचे कर्ज एक सुपुत्र फेडतो. भाजलेले बीज पेरले तर उगवत नाही. गुरूच्या प्रखर योगाच्या अग्नीत सारी बाधा भस्म होते. याला म्हणतात ज्ञानाचा प्रभाव! महादेव हे पार्वतीला अशा गुरूचा महिमा सांगतात तो असा आहे –
न गुरोरधिकं तत्त्वं |
न गुरोरधिकं तप: |
तत्त्वं ज्ञानात्परं नास्ति |
तस्मै श्रीगुरवे नम: ॥७४॥
गुरूतत्त्व सर्वश्रेष्ठ आहे. हे प्रिये, गुरूशिवाय श्रेष्ठ कुणी नाही. गुरूसेवा अन् गुरूभक्ती यापेक्षा श्रेष्ठ तप नाही. ‘तत्त्व’ ज्ञानापेक्षा कोणतंही ज्ञान श्रेष्ठ नाही. अशा श्रेष्ठ गुरूला नमस्कार असो. सर्व प्रकारची तपं आपोआप गुरूभक्तीनं साधकाकडून घडतात. काया-वाचा-मनाने ही तपं घडल्याने खास वेगळी तपस्या करावी लागत नाही. तन-मन-धन अर्पण करून गुरूकार्य यथाशक्ती करावे. उगाच देहाला, मनाला कष्ट देणारी कष्टप्रद साधना करायला नको. हठयोग नको. घरसंसार सोडायला नको. जे प्रेमाने नामस्मरण आपण करतो, त्यालाच तपस्येचे मोल मिळते. एकूण काय, तर गुरू हा सकळ जीवांचा विसावा असतो. त्या आश्रमात गाय, कुत्रा, मोर, हरीण आणि वाघ-सिंह हे सारेच मित्रत्वानं वागतात. प्रेमाच्या स्पर्शाने पशूंमधील पाशवी वृत्ती नष्ट होते, तर माणसातील माणुसकी. वृद्धिंगत का नाही होणार? कण्वमुनींना निरोप देताना शकुंतला जाऊ लागते, तेव्हा वृक्षवल्लीही अश्रू ढाळतात. असा जिवंतपणा हवा! जय गुरुदेव!
([email protected])