महाराष्ट्र सायबर सेलच्या अहवालात मोठा खुलासा
मुंबई : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतावर तब्बल १० लाख सायबर हल्ले झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. महाराष्ट्र सायबर सेलच्या ‘इकोज ऑफ पहलगाम’ या अहवालातून ही माहिती उघड झाली असून, यामागे पाकिस्तानसह मध्यपूर्व, मोरोक्को, बांगलादेश आणि इंडोनेशियातील इस्लामिक सायबर गटांचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्र सायबरचे एडीजी यशस्वी यादव यांनी सांगितले की, “हल्ल्यानंतर सायबर हल्ल्यांची लाट उसळली आहे. संरक्षण संस्थांना लक्ष्य करत अॅडव्हान्स पर्सिस्टंट थ्रेट ग्रुप ‘टीम इन्सेन पीके’ सर्वात सक्रिय आहे.” या गटाने आर्मी कॉलेज ऑफ नर्सिंग, सैनिक वेल्फेअर पोर्टल्स, आर्मी पब्लिक स्कूल यांना टार्गेट केलंय.
https://prahaar.in/2025/05/01/terrorist-attacked-after-staying-in-pahalgam-for-a-week/
याशिवाय बांगलादेशी MTBD (मिस्ट्रियस टीम बांगलादेश) ने शैक्षणिक पोर्टल्स, ई-गव्हर्नन्स साइट्स आणि बँकिंग संस्थांवर मोठे DDoS व DNS हल्ले केले आहेत. इंडोनेशियन ‘इंडो हॅक्स सेक’ ने टेलिकॉम डेटाबेस उघड केला असून, डार्क वेबवर हजारो पासवर्ड लीक झालेत.
गोल्डन फाल्कन (मध्यपूर्व) आणि मोरोक्कन ड्रॅगन्स (उत्तर आफ्रिका) यांनी मालवेअरच्या माध्यमातून भारतीय आयटी इन्फ्रास्ट्रक्चरला लक्ष्य केलंय. हे हल्ले स्वयंपूर्ण न राहता संघटित पद्धतीने, एकत्रित रणनीतीने होत असल्याचेही अहवालात नमूद आहे.
२६ एप्रिलपासून सुरू झालेले हे हल्ले अजूनही सुरूच आहेत. रेल्वे, बँकिंग, इन्फ्रास्ट्रक्चर हे प्रमुख टार्गेट असून जिथे सायबर सुरक्षेची त्रुटी आहे, तिथे हल्लेखोर यशस्वी ठरले आहेत. डार्क वेबवर भारतीय डेटाचे ‘टेराबाइट्स’ प्रमाणात लीक झाल्याचं या अहवालात स्पष्टपणे नमूद आहे.