Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिकश्रध्दा-संस्कृतीसंस्कृतीच्या पाऊलखुणा

संस्कृतीच्या पाऊलखुणा

अर्चना सरोदे

कोकणचे निसर्ग सौंदर्य आणि सांस्कृतिक उत्सव यामुळे कोकण प्रांत सर्वत्र परिचित आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि तिथले सांस्कृतिक जीवन या दोन्ही गोष्टींमुळे कोकणात नेहमीच आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरण असते. म्हणूनच की काय कोकणला स्वर्गाची उपमा दिली जाते. आपली परंपरा, आपली संस्कृती जपण्याची धडपड कोकणी माणसांत प्रकर्षाने जाणवते. सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा जोपासण्यात कोकणी माणसाने मोलाची कामगिरी बजावली आहे आणि म्हणूनच कोकणच्या मातीला अजूनही आपल्या संस्कृतीचा गंध आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर ‘दशावतार” ही पारंपरिक लोककला. पिढ्यानपिढ्या कोकणी माणसाने ही लोककला आजपर्यंत जोपासली आहे. साधारणपणे हिवाळ्याची चाहूल लागताच सुरुवात होते ती कोकणातील गावा गावातून होणाऱ्या जत्रांची. गावा गावात ग्रामदेवतेचा उत्सव साजरा केला जातो. चाकरमान्यांना जशी गणेशोत्सव, शिमगोत्सवाची ओढ तितकीच ग्रामदेवतेच्या उत्सवाची सुद्धा ओढ लागलेली असते. कोकणात दरवर्षी तिथीनुसार प्रत्येक गावात ग्रामदेवतेचा उत्सव होतो. बऱ्याच ठिकाणी हा उत्सव सात दिवस साजरा करतात. देवी देवतांची पूजा करून पालखी काढण्यात येते. देवाला गाऱ्हाणी घातली जातात. नवस घेतले जातात. या उत्सवानिमित गावांमध्ये जत्रा भरते. या जत्रांमध्ये वेगवेगळ्या खाद्यपदार्थांची, खेळण्यांची दुकाने लावली जातात. विशेष म्हणजे अशा जत्रा आणि उत्सवांचे प्रमुख आकर्षण असते ते तिथे सादर होणारे “दशावतार” दशावताराला कोकणात ‘दहीकाला असे देखील म्हणतात.

शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही लोककला कोकणात अजूनही जपली गेली आहे ती कोकणातील कलाकारांमुळे. गावातील जत्रेमध्ये आपली कला सादर करणे म्हणजे दशावतारी कलाकारांना जणू आपला हक्क असल्यासारखेच वाटते. दशावतारी नाटक म्हणजे विष्णूंच्या दहा अवतारांचे नाटक. विष्णूचे दहा अवतार मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशूराम, राम, कृष्ण, कलकी आणि बुद्ध. या दहा अवतारांच्या अानुषंगाने रचलेल्या काल्पनिक कथेचे केलेले नाट्यमय सादरीकरण म्हणजेच दशावतारी नाटक. हे नाटक या जत्रांमधला अविभाज्य असा घटक आहे. हे नाटक साधारण मध्यरात्री सुरू होते ते पहाटेपर्यंत चालते. कोकणातल्या कलाकारांनी या कलेचा ध्यास घेतला आहे, दशावतारी नाटकात जे कलाकार काम करतात त्याना स्त्री आणि पुरुष अशी दोन्ही पात्रे वठवावी लागतात. दशवतारात स्त्री पात्र हे पुरुष कलाकारच करतो. या नाटकाच्या वेळी रंगमंचावर फक्त एक मोठे बाकडे ठेवले जाते, बाकी साथीला एक पेटीवादक, एक तबलावादक आणि सुत्रधार रंगमंचावर एका बाजूला असतात. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकांना ठराविक अशी लिखित स्वरूपाची संहिता नसते आणि म्हणूनच या नाटकाला दिग्दर्शक नसतो.

संवाद तयार करण्यापासून ते सराव करणे तसेच दिग्दर्शन इत्यादींची जबाबदारी त्या-त्या कलाकाराची असते. या नाटकातले कलाकार आपल्या ज्ञानाच्या जोरावर आणि शब्दसामर्थ्यावर आपल्याला दिलेली भूमिका चोख पार पाडतात आणि तरी हे नाटक पाच ते सहा तास चालते. प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. सूर्यास्ताच्या सुमारास ही दशावतारी मंडळी ज्या ठिकाणी नाटक होणार आहे. त्याठिकाणी, एका तात्पुरत्या बांधलेल्या तंबूत, एका बल्बच्या प्रकाशात आपली रंगभूषा करतात. आपली वेशभूषा आणि रंगभूषा ही मंडळी स्वतःच करताना दिसतात. एखादे पौराणिक कथानक घेऊन त्यानुसार हे नाट्य रचले जाते. राम आणि कृष्ण या देवतांबरोबर बाकीच्या देवतांच्या भूमिका ही सादर केल्या जातात. दशावतारी नाटकांकडे कलाकारांकडून केवळ उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले न जाता आपली कला आपण जोपासली पाहिजे, हाच मूळ उ‌द्देश त्यात असावा. आपली परंपरा जपत समाजप्रबोधन करणे हा मुख्य उ‌द्देश असावा. मात्र इतकी जीवतोड धडपड करूनही या लोककलेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. ही वस्तुस्थिती आहे.

पारंपरिक दशावतार जे आजच्या मितीला गावच्या वार्षिक उत्सवाला होतात त्याकडे एक वार्षिक उत्सवाचा भाग म्हणून बघितले जाते. आजच्या सामाजिक माध्यमाच्या दुनियेत किंवा विविध वाहिन्या दाखवणाऱ्या केबल टीव्हीच्या दुनियेत ही लोककला तेवढा प्रभाव पडताना आढळत नाही. मध्यरात्री तीन साडेतीन वाजता सुरू झालेले हे नाटक सकाळपर्यंत चालवायचे म्हणून कलाकार आपापल्या संवादात भर टाकताना आढळतात; परंतु त्यात सामाजिक प्रश्न किंवा राजकीय प्रश्न मांडताना दिसत नाहीत. बदलत्या काळाबरोबर या लोककलेत बदल होत गेला आहे. या प्रयोगाला मिळणारे मानधन हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आजही वार्षिक जत्रोत्सव करताना नाटकाला तुटपुंजे मानधन गावकऱ्यांकडून दिले जाते. त्यामुळे आर्थिक सहाय्य नसल्याने ही कला पुढे कशी नेता येईल याबाबत कलाकारांपुढे मोठा यक्षप्रश्न आहे. आज लोककलेच्या बाबतीत कित्येक वर्षांपासूनच्या ज्या समस्या होत्या त्या आजही कायम आहेत.

लोककलेतून सामाजिक प्रश्न हाताळले जाणे अपेक्षित आहे आणि हीच अपेक्षा दशावताराच्या माध्यमातून सुद्धा अपेक्षित आहे. खरेतर हाच लोककलेचा पाया आहे. हा पाया अजून स्थिर करण्यासाठी काळानुसार बदलण्याची गरज तर आहेच, शिवाय लोककलेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलण्याची देखील गरज आहे. कोकणातील कलाकार दशावतार ही लोककला जोपासत आहेत. त्या कलेच्या संवर्धनासाठी, ही कला चिरकाल टिकवून ठेवण्यासाठी शासनाकडूनही प्रयत्न व्हायला हवेत. किंबहुना असे म्हणता येईल की प्रयत्न जरी होत असले, तरी त्याला अजूनही पाहीजे तशी दिशा सापडलेली नाही. कोकणातील दशावतार व ही पारंपरिक लोककला सादर करणारे कलाकार यांचे एक अतूट नात आहे. म्हणूनच या कलाकारांकडून ही कला यापुढेही अशीच जोपासली जावी आणि आपल्या संस्कृतीच्या पाऊलखुणांची छाप सातासमुद्रापार रसिकांच्या मनावर उमटावी हेच देवाकडे गाऱ्हाणे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -