Thursday, May 8, 2025
Homeताज्या घडामोडीनालेस्‍वच्‍छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे - बीएमसी आयुक्‍त

नालेस्‍वच्‍छता कामात मुंबईकर नागरिकांनी सहकार्य करावे – बीएमसी आयुक्‍त

मुंबई : मुंबईतील अनेक छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये नागरिकांनी टाकलेल्या कच-यामुळे पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. नाल्यातून गाळ काढण्याच्या कामातील हा सर्वात मोठा अडथळा आहे. अनेक भागातील नाले नियमितपणे स्वच्छ केल्यानंतरही त्यात पुन्हा कचरा टाकण्याचे प्रकार थांबत नाहीत. मुंबईकर नागरिकांनी नाल्यांमध्ये कचरा न टाकता तो कचरा कुंडीतच टाकावा. जेणेकरुन कचरा अडकून नाले तुंबणार नाहीत, पाण्‍याचा प्रवाह सुरळीत सुरू राहिल, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्‍त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी केले आहे.

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महानगरातील नदी व मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे वेगाने सुरू आहेत. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी पश्चिम उपनगरातील विविध ठिकाणांना आज (दिनांक २९ एप्रिल २०२५) भेट दिली. तसेच, नदी व नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करत संबंधितांना आवश्यक ते निर्देश दिले. पर्जन्य जलवाहिन्या विभागाचे संबंधित अधिकारी दौऱयाला उपस्थित होते.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महानगरपालिका आयुक्‍त भूषण गगराणी म्‍हणाले की, नालेस्‍वच्‍छतेची, गाळ काढण्‍याची कामे समाधानकारकरित्या होत असली तरी आजुबाजूच्या वस्‍त्‍यांमधील नागरिक प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू नाल्यांमध्ये टाकतात. नाल्‍याच्‍या दुतर्फा राहणा-या नागरिकांनी, मुंबईकर नागरिकांनी नाल्यांत घनकचरा, टाकाऊ वस्‍तू, प्‍लास्टिक वस्‍तू टाकू नयेत. महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन गगराणी यांनी केले.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्‍हणाले की, नाल्यांतून गाळ काढण्याच्या पावसाळा पूर्व उद्दिष्टापैकी ४३ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित एक महिन्याच्या कालावधीत गाळ काढण्याची कामे वेगाने पूर्ण केली जातील. गाळ काढण्याच्या कामात यंदा अधिक पारदर्शकता आणली आहे. गाळ उपसा संदर्भात प्राप्त होणा-या सर्व चित्रफीतींचे (व्हिडिओ) कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणालीच्या मदतीने महानगरपालिका प्रशासनाकडून विश्लेषण केले जात आहे. त्यानिमित्ताने या कामांमध्ये पहिल्यांदाच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) प्रणालीचा वापर करण्यात येत आहे. त्याद्वारे नाल्यातील गाळ उपसा करण्याच्या कामांची योग्य देखरेख करणे, कामांमध्ये संपूर्ण पारदर्शकता राखणे यासाठी प्रशासनाला मदत होत आहे, अशी माहिती गगराणी यांनी दिली.

महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी म्‍हणाले की, पुराच्‍या पाणी प्रवाहावर नियंत्रण ठेवण्‍यासाठी पर्जन्‍य जलवाहिन्‍या विभागाने काही ठिकाणी पूर नियंत्रण झडपा बसविल्‍या आहेत. पूरजन्‍य परिस्थितीत पाण्याचा दाब कमी करणे, संरचनात्मक नुकसान टाळणे आणि नियंत्रित व सुरक्षित पाण्याचा प्रवाह राखण्‍याचे काम या झडपा करत असतात. जेव्हा पाण्याचा दाब किंवा पातळी ठराविक मर्यादेपेक्षा जास्त वाढते, तेव्हा झडप आपोआप उघडते आणि अतिरिक्त पाणी बाहेर सोडले जाते, त्यामुळे संरचनेचे रक्षण होते. पावसाळ्यात पूर नियंत्रण झडपा, उदंचन संयंत्रे कार्यरत राहतील, याची दक्षता घेण्‍याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. सखल भागात पावसाचे पाणी साचणार नाही याचे नियोजन केले आहे. हे सगळे नियोजन पावसाची विशिष्ट स्थिती लक्षात घेऊन केले आहे, असे गगराणी यांनी नमूद केले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -