नाशिक : साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेल्या अक्षय्य तृतीया सणाला फार महत्त्व असते. या सणाच्या निमित्ताने आज बहुतांश मंदिरात फळांचा राजा असलेल्या हापूस आंब्याची सजावट केली जाते. शहरातील इस्कॉन मंदिरामध्ये अक्षय तृतीया निमित्त आंब्याची आरास करण्यात आली तर यावेळी भगवंतांना चंदन लेप देखील लावण्यात आला. श्री राधा मदन गोपाल मंदिर (इस्कॉन) येथे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने ३०० किलो आंब्यांचा विशेष आरास करण्यात आला. भगवंत सांगतात की, मला एखादे पान, फुल, फळ अथवा पाणी अर्पण केले तर मी त्याचा स्वीकार करतो. ह्याच भावनेतून भक्तांनी फळांचा राजा असणारा आंबा आपल्या आराध्य श्री मदन गोपाल यांना अर्पण केला.
https://prahaar.in/2025/04/29/devotees-vehicle-involved-in-fatal-accident-26-injured/
विविध प्रकारच्या पानांचा, फुलांचा व तब्बल ३०० किलो आंब्यांचा वापर करून हा आरास करण्यात आला होता. या मध्ये प्रामुख्याने रत्नागिरी व देवगड हापूस, बदाम, केशर, लालबाग ह्या आंब्यांचा वापर करण्यात आला होता आणि सजावटीसाठी वापरण्यात आलेल्या सर्व आंब्यांचे वाटप संध्याकाळी महाप्रसादाबरोबर भाविकांना करण्यात आले. दिवसभर नाशिककरांनी दर्शनाचा लाभ घेतला. ह्या विशेष दर्शनासाठी दिवसभर मंदिरामध्ये भाविकांची गर्दी पहायला मिळाली.