Friday, May 9, 2025
Homeताज्या घडामोडीशूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश...

शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश – शेलार

मुंबई :  नागपूरकरच्या भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार रघुजी भोसले यांची लंडन येथे लिलावात निघालेली तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश आले आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

अशा प्रकारे लिलाव जिंकून आपली ऐतिहासिक वस्तू परदेशातून परत मिळवण्याची ही पहिलीच वेळ असून याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अँड आशिष शेलार यांनी आभार मानले आहेत.

ऐतिहासिक दस्तऐवज असलेली सदर तलवार लिलावात निघाल्याचे वृत्त काल अचानक येऊन महाराष्ट्रात धडकले. सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांना ही बातमी कळताच त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन सदर तलवार शासनाला मिळावी या दृष्टीने नियोजन करण्यात आले. सांस्कृतिक कार्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांना दूतावास संपर्क व या कामाची जबाबदारी देऊन स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अँड आशिष शेलार यांनी रात्री उशिरा पर्यंत याबाबतचे नियोजन व संपर्क यंत्रणा उभी केली. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचने प्रमाणे अँड आशिष शेलार यांनी तातडीने एक मध्यस्थ उभा करुन या लिलावात शासनाने सहभाग घेतला व लिलाव जिंकला. यासाठी हातळणी, वाहतूक व विमा खर्चासह सुमारे 47.15 लाख रुपये यासाठी खर्च अपेक्षित आहे.

याबद्दल आज पत्रकार परिषद घेऊन अँड आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या नावाने एक इतिहास नोंद होईल असा हा आनंदाचा क्षण आहे, अशी भावना यावेळी अँड आशिष शेलार यांनी व्यक्त केली.

*तलवारीचे ऐतिहासिक महत्त्व*

रघुजी भोसले प्रथम (१६९५ ते १४ फेब्रुवारी १७५५) हे नागपूरकर भोसले घराण्याचे संस्थापक आणि छत्रपती शाहू महाराजांच्या काळातील मराठा सैन्यातील एक महत्वाचे सरदार होते. रघुजी भोसले यांचे शौर्य आणि युद्धनीती यांवर प्रसन्न होवून छत्रपती शाहू महाराजांनी त्यांना ‘सेनासाहिबसुभा’ ही पदवी दिली होती. रघुजी भोसले प्रथम यांनी १७४५ आणि १७५५ मध्ये बंगालच्या नवाबाविरुद्ध युद्धमोहिमांचे नेतृत्व करून मराठा साम्राज्याचा बंगाल, ओडिशापर्यंत विस्तार केला. याचबरोबर रघुजींनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये चांदा, छत्तीसगढ, संबळपूर याही प्रदेशांवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. दक्षिण भारतातील कुड्डाप्पाचा नवाब, कर्नूलचा नवाब यांचाही पराभव करून दक्षिण भारतात आपला लष्करी आणि राजकीय दबदबा निर्माण केला. अठराव्या शतकातील एक अत्यंत धाडसी मराठा सेनानी म्हणून रघुजी भोसलेंकडे बघितले जाते. नागपूर भोसलेंच्या भौगोलिक सीमांमध्ये लोखंड, तांबे यांच्या खाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होत्या. यांचा वापर वस्तूंसोबतच शस्त्रे बनवण्यासाठीही केला जात असे. नागपूरकर भोसले घराण्यातील राजशस्त्रे निर्मिती आणि सौंदर्य यांचा अजोड मिलाफ आहेत.

आज लंडन येथे लिलावात निघालेली रघुजी भोसले यांची तलवार ही मराठा शैलीच्या ‘फिरंग’ पद्धतीच्या तलवारीचा उत्कृष्ट नमुना आहे. सरळ, एकधारी पाते आणि सोन्याचे नक्षीकाम केलेली मुल्हेरी घाटाची मूठ ही तलवारीची वैशिष्ट्ये आहेत. तलवारीचे पाते हे युरोपीय बनावटीचे असून पात्याच्या खजान्याजवळ पाते बनवणाऱ्या कंपनीचे नाव आहे. युरोपीय बनावटीची पाती ही मध्ययुगीन भारतातल्या उच्च वर्गांमध्ये प्रसिद्ध होती. पात्याच्या पाठीवर तळाशी ‘श्रीमंत रघोजी भोसले सेनासाहिबसुभा फिरंग’ हा देवनागरी लेख सोन्याच्या पाण्याने लिहिलेला आहे. पात्यावरील लेख ही तलवार रघुजी भोसले यांच्यासाठी बनवली गेली होती किंवा त्यांच्या वापरातील होती याकडे निर्देश करतो. तलवारीच्या मुल्हेरी मुठीवर सोन्याच्या पाण्याने कोफ्तगरी नक्षी काढलेली आहे. तलवारीच्या उभट मुसुमेला हिरव्या रंगाचे कापड गुंडाळलेले आहे.

रघुजी भोसले प्रथम यांची ही फिरंग तलवार अनेकार्थांनी महत्वपूर्ण आहे. बहुतांशी मध्ययुगीन मराठा शस्त्रांची कमी अथवा अजिबात नसलेले नक्षीकाम आणि शस्त्रांवरील निर्माणकर्त्याच्या किंवा वापरकर्त्याच्या नावाचा अभाव ही ठळक वैशिष्ट्ये होती. या दोन्हीसही अपवाद म्हणून रघुजी भोसले यांच्या तलवारीवर नावाचा लेख तसेच नक्षीकाम केलेले आहे. तलवारीचे युरोपीय बनावटीचे पाते अठराव्या शतकातील भारतातील आंतरराष्ट्रीय शस्त्रव्यापाराकडे निर्देश करते.

नागपूरकर भोसलेंची १८१७ मध्ये सीताबर्डी येथे ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध लढाई झाली. या लढाईमध्ये ईस्ट इंडिया कंपनीचा विजय झाल्यावर कंपनीने नागपूरकर भोसल्यांच्या खजिन्याची लूट केली. यामध्ये अनेक मौल्यवान वस्तू, दागिने तसेच शस्त्रांचाही समावेश होता. नागपूरचे संस्थान खालसा झाल्यावर ईस्ट इंडिया कंपनीला वेळोवेळी नजराणे आणि भेटीही मिळाल्या होत्या. रघुजी भोसलेंची तलवार युद्धानंतरच्या लुटीमध्ये अथवा ब्रिटिशांना दिलेल्या भेटींमध्ये देशाबाहेर गेली असण्याची शक्यता आहे, जाणकार व्यक्त करीत आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -