बरोबर ४२ वर्षे १९ दिवसांपूर्वी एक सिनेमा आला होता. आज त्याची आठवण यावी याला कारण त्यातले एक जबरदस्त गाणे! ते आजच्या परिस्थितीला तंतोतंत लागू पडते! आनंद बक्षी एखाद्या विषयावर किती सखोल विचार करून त्यावर अंतिम वाटावी अशी रचना करत त्यांचे हे गाणे म्हणजे एक पुरावाच! सिनेमा होता १९८३ चा ‘अंधा कानून.’ तसा तो एका तमिळ सिनेमाचा (‘सत्तम ओरु इरुतर्राई’ {१९८१}) रिमेक! कलाकार होते रजनीकांत, रीना रॉय, हेमामालिनी, धर्मेंद्र, अमिताभ बच्चन, प्राण, प्रेम चोपडा, मदन पुरी, डॅनी, अमरीश पुरी, ओम शिवपुरी, सुलोचना, असरानी, आगा आणि माधवी. त्यावर्षी सर्वाधिक उत्पन्न मिळवणाऱ्या चित्रपटात ‘अंधा कानून’चा क्रमांक ५ वा होता. रजनीकांतचा तो पहिला हिंदी चित्रपट! कथा गुंतागुंतीची होती. विजय सिंगला (रजनीकांत) आपल्या पित्याच्या खुन्यांचा बदला घ्यायचा आहे. त्याच ध्येयाने विजयची बहीण दुर्गा देवी (हेमा मालिनी) पोलीस अधिकारी झालेली आहे. मुळात सज्जन आणि परोपकारी असलेल्या मात्र संतापलेल्या विजयला प्रसंगी कायदा हातात घेऊनसुद्धा मारेकऱ्यांना ठार करायचे आहे. त्याची भेट अशाच एका न्यायव्यवस्थापीडित जान निसार खानशी(अमिताभ बच्चन) होते. वनाधिकारी खान एक कर्तव्यदक्ष अधिकारी असतो. त्याच्याकडून चंदनतस्करांना पकडताना एका तस्कराचा (राम गुप्ता) मृत्यू होतो. एरव्ही अत्यंत ढिसाळपणे चालणारा खटला वेगाने चालून जान निसार खानला २० वर्षांची शिक्षा होते. तो तुरुंगात असताना त्याच्या पत्नीवर बलात्कार झाल्याने ती वैफल्यग्रस्त होऊन मुलीसह आत्महत्या करते! अमिताभला ते दु:ख असह्य होते. त्याला नंतर कळते की गुप्ता चक्क जिवंत आहे. म्हणजे कायद्याच्या चुकीमुळे आपल्याला न केलेल्या गुन्ह्याबद्दलही आयुष्यातली २० वर्षे तुरुंगात काढावी लागलीत! तो, संतप्त होतो. रजनीकांत, हेमा मालिनी आणि अमिताभ एकत्र येतात आणि आपापले सूड घेतात अशी ही कथा.
सुरुवातीच्या एका प्रसंगात अभिताभ बच्चन हेमा मालिनीला गुंडांच्या तावडीतून वाचवतो आणि ती त्याचे आभार मानते. त्यावेळी ती म्हणते, ‘आपका बहुत बहुत शुक्रिया. आपने कानूनकी मदद की हैं, मैं आपको इनाम दिलवाऊंगी! तिचा पोलिसी गणवेश पाहून अमिताभच्या मनातील एकंदर व्यवस्थेबद्दलचा राग वर येतो आणि तो म्हणतो, ‘कानून?’ इनाम? ये कानूनका नाम मेरे सामने फिर मत लेना!’ आणि तो निघून जातो. जाताना स्वत:शीच तो जे गाणे म्हणतो ते म्हणजे आनंद बक्षीजी, किशोरदा, लक्ष्मी-प्यारे आणि एडिटरने केलेली कमाल होती. आनंदजींचे भेदक शब्द होते-
‘ये अंधा कानून है, ये अंधा कानून है,
‘जाने कहाँ दगा दे दे, जाने किसे सजा दे दे,
साथ न दे कमजोरोंका, ये साथी है चोरोंका,
बातों और दलीलोंका, ये है खेल वकिलोंका,
ये इंसाफ नहीं करता, किसीको माफ नहीं करता, माफ इसे हर खून है, ये अंधा कानून है…!’
किशोरदाने ‘अंधा’ या शब्दाचा उच्चार लांबवत असा काही आलाप घेतला होता की, या आलापामुळे गाण्याचा अर्थ आणि गांभीर्य श्रोत्याच्या हृदयापर्यंत पोहोचते. लक्ष्मी-प्यारेंच्या अप्रतिम चालीवर किशोरदाने गाणे इतके समरसून गायले की ‘अँग्री यंग मॅन’ अमिताभच गातोय असे वाटते. अमिताभनेही मनात धुमसणारा राग, वैफल्य, बेफिकीरी अगदी सहज अभिनयातून दाखवली. त्याला आलेला न्यायव्यवस्थेचा वेदनादायी अनुभव, पत्नीवर अत्याचार, मुलीचा मृत्यू आणि न केलेल्या गुन्ह्याबद्दल २० वर्षांचा तुरुंगवास… सगळे बक्षीजींच्या शब्दातून लाव्हा रसासारखे बाहेर येते.एकेक वाक्य सगळ्या व्यवस्थेने चिंतन करावे असे आहे. ‘साथ न दे कमजोरोंका, ये साथी है चोरोंका, बातों और दलीलोंका, ये है खेल वकीलोंका.’ किती भेदक, किती खरे वर्णन! आणि शेवटचे वाक्य, तर कहर आहे, ‘माफ इसे हर खून है, ये अंधा कानून है!’ आपली अकार्यक्षम, भ्रष्ट व्यवस्था कितीतरी निष्पाप लोकांचे बळी घेते आणि न्यायालयाचा अवमान होण्याच्या भीतीने तिला कुणीही दोष देऊ शकत नाही हे सत्य आनंदजींनी किती सहज, एका ओळीत, सांगितले!
गाण्याच्या वेगवान चालीमुळे दृश्यात्मकता साधणे, कवितेतील सर्व संदेश दृशातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणे एक आव्हान होते! कारण ओळीमागून ओळ वेगळ्याच घटनेवर भाष्य करत जाते. तरीही एडिटरने एकही संदेश केवळ श्राव्य न राहू देता दृश्यमान केला होता. त्याचे महत्त्व लक्षात येण्यासाठी गाणे मुळातून पाहणे आणि किशोरदांच्या दमदार आवाजात ऐकणे गरजेचे आहे.
‘लोग अगर इससे डरते, मुजरीम जुर्म ना करते,
ये माल लुटेरे लूट गये, रिश्वत देकर छूट गये.’
हे शब्द देशातील ७५वर्षांचे विदारक वास्तव स्पष्ट करतात. त्यानंतर लगेच येणाऱ्या –
‘असमतें लुटीं, चली गोली,
इसने आँख नहीं खोली,
काला धंधा होता रहा,
ये कुर्सीपर सोता रहा.’
या ओळीतून तर कश्मीरची, बंगालची जणू आजचीच स्थिती वर्णन केली होती. तीही ४२ वर्षांपूर्वी! ‘स्त्रियांची अब्रू लुटली गेली, गोळ्यांचा वर्षाव झाला पण कायदा आंधळाचा राहिला!’ असे कवी म्हणतो. न्यायव्यवस्थेच्या निष्क्रियतेवर इतकी कठोर टीका एखादा कवीच करू शकतो. बक्षीजी पुढे म्हणतात –
दुनियाकी इमारतका, कच्चा इक सुतून है,
ये अंधा कानून है…’
लंगडा, आंधळा कायदा हा माणसाने मोठ्या कष्टाने उभ्या केलेल्या संस्कृतीच्या इमारतीचा सगळ्यात कमजोर खांब आहे! ‘त्याचे हात लांब असतात वगैरे गौरवाला’ काहीही अर्थ नाही. कितीही अत्याचार दिसत असले, अन्याय सुरू असला तरी कायदा स्वत:हून कसलीच दखल घेत नाही हे कवीचे दु:ख आहे. या निष्क्रियतेमुळे कितीतरी निरपराध लोक फाशीवर जातात आणि खुनी सुटून सुखाने जगतात –
‘लंबे इसके हाथ सही, ताकत इसके साथ सही,
पर ये देख नहीं सकता, ये बिन देखे है लिखता. जेल में कितने लोग सडे, सूलीपर निर्दोष चढे,
मैं भी इसका मारा हूँ, पागल हूँ आवारा हूँ.
यारों मुझको होश नहीं, सर मेरे जुनून है,
ये अंधा कानून है…!’
अशा वेळी बायबलच्या ‘उपदेशक’ भागातील काही ओळी आठवतात. ‘गांजलेल्यांचे अश्रू गळत आहेत, पण त्यांचे सांत्वन करणारा कोणी नाही. न्यायाचे स्थान पाहावे, तर तेथे दुष्टता आहे. धर्माचे स्थान पाहावे, तर तेथे दुराचार आहे’ सत्य २००० वर्षांपूर्वी सांगितलेले असो की, ४२ वर्षांपूर्वी ते सत्यच असते आणि जगाचा व्यवहार त्याच्या उफराट्या पद्धतीनेच सुरू असतो, हेच खरे!
जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात आज पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे.…
नवी दिल्ली: ‘ऑपरेशन सिंदूर’कारवाई संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भारताने आपल्या कारवाईस केंद्रित, मोजकी आणि गैर-उत्तेजक…
नवी दिल्ली : जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा भारत दौऱ्यावर आहेत. ते या दौऱ्याच्या सुरुवातीला…
नवी दिल्ली : वाढत्या भारत - पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवार आठ मे रोजी…
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…