पहलगामच्या भ्याड हल्ल्यावर एक तीव्र निषेध, धगधगता आवाज

Share

निशा वर्तक

फक्त आठच दिवसांपूर्वी मी काश्मीरच्या निसर्गसंपन्न कुशीत जाऊन आले. डोळ्यांत साठवून ठेवावं असं स्वप्नवत दृश्य. हिरव्यागार दऱ्या, बर्फाच्छादित पर्वतशिखरं, शांत झरे, नद्या आणि तितकेच मृदू, प्रेमळ लोक. स्वर्ग जर कुठे असेल, तर तो इथेच असं मनोमन वाटून गेलं. उगाचच नाही काश्मीरला भारताचं नंदनवन म्हणत! पहलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग, श्रीनगर. प्रत्येक ठिकाणी सौंदर्याची नव्याने ओळख झाली. आयुष्यात एकदा तरी काश्मीर पहावं, ही इच्छा पूर्ण झाली. घरी परतल्यावर आनंदाने सर्वांनाच सांगत होते “ज्यांनी काश्मीर पाहिलं नाही त्यांनी नक्की जावं. आता काश्मीर खूप सुंदर आणि सुरक्षित आहे.” आणि… लगेचच हाच भ्याड हल्ला! तोही पर्यटकांवर? एवढ्या सुरक्षेच्या व्यवस्थेनंतरही? विश्वासच बसत नाही. त्या स्वर्गभूमीत मला एक गोष्ट अधिक भावली, ती म्हणजे आपलं सुरक्षा दल. प्रत्येक वळणावर, प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी त्यांच्या डोळ्यांत जागरूकतेचा तेजस्वी प्रकाश होता. त्यांनी जणू त्या भूमीच्या सौंदर्याची देखभाल केली होती, जशी आई आपल्या लेकराची करते. त्यांचं अस्तित्व पाहून अभिमानाने छाती भरून आली. वाटलं ही माती फक्त फुलांनी नाही, तर इथल्या जवानांच्या रक्तानेही पावन झालेली आहे.

माझी इच्छा होती की एखाद्या जवानासोबत आठवण म्हणून एक फोटो काढावा आणि ती इच्छाही पूर्ण झाली. एक जवान आनंदाने तयार झाला. आज तो फोटो पाहताना डोळ्यांत अश्रू येतात. कारण आता त्या भूमीच्या बातम्या पाहवत नाहीत. त्या छायाचित्रांकडे पाहून अस्वस्थ वाटतं. पहलगाममध्ये पर्यटकांवर भ्याड हल्ला झाला आणि तेही नाव विचारून, हिंदू आहे की मुस्लीम याची खातरजमा करून? किती अमानवी आहे हे! मन सुन्न झालंय. वाटतंय, जणू पुन्हा एकदा ती भूमी रक्ताने माखली गेली. संताप उसळतोय. आपण अजून किती सहन करायचं? पुन्हा पुन्हा हे भ्याड हल्ले. आता पुरे झालं. आता कठोर निर्णय घ्यायची वेळ आली आहे. हा केवळ एक हल्ला नाही हा आपल्या देशाच्या मनावर झालेला घाव आहे. आपण प्रत्येक भारतीयाने आवाज उठवला पाहिजे, निषेधाचा, एकतेचा, आणि आपल्या जवानांच्या त्यागाच्या सन्मानाचा. काश्मीर हे खरंच स्वर्ग आहे आणि आपल्या जवानांनी तो स्वर्ग जपण्यासाठी निस्वार्थ सेवा दिलीय. आपण त्यांच्या त्यागाचा आदर करायला हवा. फक्त मेणबत्त्या लावून नाही, तर भ्याड विचारसरणीचा निषेध करून, सरकारवर दबाव आणून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी.

आज मी केवळ भावनिक नाही, तर मी संतप्त आहे. कारण मी नुकताच पाहिलेला स्वर्ग आता रक्ताने माखलेला आहे. म्हणूनच, हा माझा जाहीर, ठाम निषेध आहे अशा कृत्यांचा आणि त्यांच्या पाठीशी असणाऱ्या प्रत्येक सावलीचा. मला खात्री आहे आपले पंतप्रधान मोदीजी नक्कीच योग्य धडा शिकवतील, योग्य निर्णय घेतील.

Recent Posts

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

18 minutes ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

52 minutes ago

थेट प्रहार! पाकिस्तानमधील गाणी, सिरीज, चित्रपट भारतात थांबवा!

‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…

55 minutes ago

IND-PAK तणावादरम्यान शिफ्ट झाला IPL चा सामना, आता धरमशाला नव्हे तर या ठिकाणी होणार सामना

पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना आता अहमदाबादमध्ये अहमदाबाद : आयपीएल २०२५ मध्ये रविवार,…

56 minutes ago

Gold rate: सोने खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी

जळगाव : पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवून पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर…

2 hours ago