Thursday, May 8, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखमराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा तहानलेलाच

मराठवाडा वार्तापत्र: अभयकुमार दांडगे

उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याच तुलनेत मराठवाड्यात तहानलेल्या गावांच्या संख्येतही दुप्पटीने वाढ होत आहे. मराठवाड्यात १८४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक तहानलेली गावे मराठवाड्यातच नोंदवली गेली आहेत. विभागीय आयुक्तालयाने यावर शिक्कामोर्तबही केले आहे. पाणीटंचाईची भीषण परिस्थिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत जाणवत आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला असला तरी, टंचाई मात्र कमी झालेली नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १३५ टँकरद्वारे तहानलेल्या ९३ गावांत व १२ वाड्यांना पाणीपुरवठा केला जात आहे. जालना जिल्ह्यात मागच्या आठवड्यापर्यंत ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागला, तर नांदेड जिल्ह्यात दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याची नोंद विभागीय आयुक्तालय कार्यालयात आहे.

मराठवाड्यात काही दिवसांपूर्वी अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे लवकर होतील, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करित आहेत. या संकटातून शेतकरी सावरले असतानाच पुन्हा पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या कडक उष्णता जाणवत असल्यामुळे मराठवाड्यात गरज असलेल्या जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेडपाठोपाठ आता जालना जिल्ह्यातही पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. या तीनही जिल्ह्यांत तहानलेली गावे व वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर विभागातील अन्य जिल्हे सुदैवाने अद्यापही टँकरमुक्त आहेत. काही जिल्ह्यात टँकरची मागणी असून त्यादृष्टीने प्रशासन स्तरावर कामकाज केले जात आहे. गेल्या वर्षी पावसाने चांगली हजेरी लावली होती. त्यामुळे सध्यास्थितीत अन्य जिल्ह्यांत टँकरची गरज मार्च महिन्यात भासली नाही; परंतु एप्रिल महिन्यात उन्हाची तीव्रता वाढल्याने सर्वच जिल्ह्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ येणार आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी मागच्यावर्षी पाऊसमान चांगले झाल्याने टंचाई निर्माण होणार नाही, असा अंदाज बांधत टंचाई कृती आराखड्यामध्ये एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टँकर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले; परंतु निम्मा मार्च महिना संपलेला नसतानाच प्रारंभी वैजापूर तालुक्यातील सावखेड खंडाळा, दसकुली, तिद्धी, आधुर, लोणी बु. आधुर, माळीसागज, मकरमतपूर, कनकसागज यासह अन्य काही तालुक्यातील गावांतून टँकर सुरू करा अशी मागणी झाली. प्रारंभी जिल्ह्यातील १६ गावांमध्ये १७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता.

दिवसेंदिवस तहानलेल्या गावांच्या संख्येत भर पडली. त्यानूसार मराठवाड्यात टँकरच्या संख्येतही प्रशासनाला वाढ करावी लागली. मार्च अखेरच्या अहवालानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९३ गावे व १२ वाड्यांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. फुलंब्रीतील १ गावात २ टँकर सुरू आहेत. यासह पैठण तालुक्यातील ११ गावांना ११ टँकरद्वारे, वैजापूर तालुक्यातील १५ गावे व १ वाडीला १६, तर गंगापूर तालुक्यातील तहानलेल्या ७ गावांना १० टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. या प्रमाणे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ९३ गावे व १२ वाड्यांना १३५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून टँकरच्या मंजूर फेऱ्यांची संख्या १२१ एवढी असल्याचे विभागीय आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, तर मराठवाड्यात २०६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ७८, जालना ४२, हिंगोली ४४, नांदेड ३६, बीड ३, लातूर १ आणि धाराशिव जिल्ह्यात २ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यात टँकरसाठी ७५ गावांतील ९२ विहिरींचे, तर टँकर व्यतिरिक्त १०४ गावांतील ११४ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील एका गावाला तसेच माहूर येथील एका गावाला टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच जालना जिल्ह्यातील २४ गावे व ७ वाड्यांना मिळून ४७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जालना तालुक्यातील तहानलेली गावे व वाड्यांना गरजेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. बदनापूर तालुक्यातील १२ गावे व ६ वाड्यांना १८, अंबड तालुक्यातील ८ गावांना १३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता प्रशासनाने विहीरींचे अधिग्रहण करण्यावर भर दिला आहे.

बीड शहरात सध्या तिव्र पाणीटंचाई आहे. माजलगाव बॅकवॉटर योजनेचे पाणी बीड शहराला १५ ते २० दिवसाला सोडले जात आहे. यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक नागरिक दुचाकी तसेच चारचाकी वाहनातून पाणी आणत आहेत. नागरिकांना पाणीटंचाईमुळे खासगी टँकर चालकांकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे. २५० ते १ हजार लिटर पाणी टँकरद्वारे घरपोच पोहोचविले जात आहे.

यासाठी नागरिकांना अतिरिक्त पैसे देखील मेाजावे लागत आहेत. बीड जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाल्याने त्याचा फटका उन्हाळ्यात जाणवू लागला आहे. बीड जिल्ह्यातील गोदावरी आणि कृष्णा खोऱ्याअंतर्गत असलेल्या १४३ प्रकल्पांपैकी काही लघू प्रकल्प पूर्णपणे कोरडे पडले आहेत. मध्यम व लघूप्रकल्पांचा पाणीसाठा बाष्पीभवनामुळे आटून गेला आहे. बीड जिल्ह्यातील धरणात केवळ २३ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत या ठिकाणी मोठ्या प्रमाणात टँकरची गरज भासणार आहे. बीड नगरपालिका येत्या काही दिवसांत १५ दिवसांनंतरच पाणीपुरवठा करू शकेल, अशी परिस्थिती सध्या दिसून येत आहे. लातूर जिल्ह्यातील राणी सावरगाव या ठिकाणी ५ कि.मी. अंतरावरून नागरिकांना पाणी आणावे लागत आहे. तेथील जलकुंभ निकामी असून गेल्या ८ वर्षांपासून पाण्याचा एकही थेंब तेथून मिळालेला नाही. विद्युत मोटार बंद अवस्थेत आहे. घटेवाडीचे ग्रामस्थ दाद मागून थकले आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत मराठवाड्यात सर्वत्रच कामे ठप्प असल्यामुळे पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. एकंदरीत मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अजूनही टँकरची गरज भासलेली नाही, ही परिस्थिती काहीशी समाधानकारक मानली जात आहे; परंतु येणाऱ्या महिन्यांत मराठवाड्यात उष्णता वाढल्यानंतर पाणीटंचाई भीषण भासणार आहे. त्यासाठी आणखी टँकरची गरज मराठवाड्याला लागणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -