मुंबई : आतापर्यंत अनेकांना पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघांबद्दल माहिती आहे. हे वाघ अनेक राज्यात मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मात्र आता पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या वाघासह काळ्या रंगाच्या वाघांची माहिती समोर आली आहे. ओडिशामधील ‘सिमिलिपाल’ उद्यानात ‘काळे वाघ’ पाहायला मिळणार आहेत. “काळा वाघ” हा शब्द ऐकला की अनेक लोकांच्या डोळ्यापुढे एक गूढ आणि दुर्मीळ प्राणी उभा राहतो. जाणून घ्या याबाबतची सविस्तर माहिती.
“काळा वाघ” हा प्रत्यक्षात सामान्य वाघ आहे. पण त्याच्या अंगावरचे पट्टे अधिक गडद आणि जवळपास असल्यामुळे तो पूर्ण काळा असल्याचे दिसून येत आहे. या वाघाला मेलॅनिस्टिक वाघ (Melanistic Tiger) असे म्हणतात. मूळात हे बंगाल टायगर आहेत, पण एका विशिष्ट जनुकांमध्ये बदल झाल्यामुळे त्यांच्या अंगावरील पट्टे जास्त काळे झाले आहेत. भारतामध्ये ओडिशा राज्यातील ‘सिमिलीपाल टायगर रिझर्व्ह’ या ठिकाणी काळसर-मेलॅनिस्टिक वाघांचे अस्तित्व प्रत्यक्षात पाहायला मिळाले आहे.
‘सिमिलीपाल’ला मिळाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा
२४ एप्रिल २०२५ रोजी ओडिशा सरकारने अधिकृत अधिसूचना जारी करून सिमिलिपालला भारतातील १०७वे आणि ओडिशातील दुसरे राष्ट्रीय उद्यान घोषित केले आहे. हे उद्यान ८४५.७० चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असून, हे ओडिशातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान ठरले आहे. मयूरभंज जिल्ह्यातील सिमिलिपाल दक्षिण आणि उत्तर वन विभागांतील ११ रेंजमध्ये हे उद्यान पसरले आहे.
‘मेलॅनिस्टिक’ म्हणजे काय?
‘मेलॅनिस्टिक’ हा शब्द मेलॅनिझम (Melanism) या संज्ञेपासून आला आहे. हे एक आनुवंशिक (genetic) स्थिती आहे. ज्यामध्ये प्राण्याच्या त्वचेमध्ये, केसांमध्ये किंवा फरामध्ये “मेलॅनिन” नावाच्या रंगद्रव्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे तो प्राणी खूप गडद किंवा काळसर दिसतो.