जम्मू काश्मीरला फिरायला गेलेल्या एका कुटुंबासाठी खारट फ्राइड राईस जीवदान ठरले
मुंबई: पहलगामच्या बैसारण येथे जाण्यापूर्वी जेवण करण्यास एका हॉटेलमध्ये थांबलेल्या ११ जणांच्या कुटुंबाचे ऑर्डर मिळण्यात झालेल्या दिरंगाईमुळे प्राण वाचले आहे. कारण जेवणात आलेल्या खारट फ्राईड राईसमुळे त्यांना पुन्हा नवीन ऑर्डर येण्याची वाट पाहात बसावे लागले. ज्यामुळे पुढे त्यांच्यासोबत होणारा अनर्थ टळला.
काळ आला होता पण वेळ नाही, असे पहलगाम दहशतवादी हल्ल्यामधून थोडक्यात वाचलेल्या केरळच्या एका कुटुंबियांबद्दल बोलता येईल. अल्बी जॉर्ज, त्यांची पत्नी लावण्या, त्यांची मुले, लावण्याचे आई-वडील आणि काही भावंडं अशी ११ जण गेली काही दिवस जम्मू काश्मीरच्या सफरीवर होती. १८ एप्रिल रोजी ते कोचीहून निघाले आणि 19 एप्रिलला ते श्रीनगरला पोहोचले. त्यांनी गुलमर्ग आणि सोनमर्ग येथे दोन दिवस फिरण्यात घालवले. तिसऱ्या दिवशी हे सर्वजण पहलगामला भेट देणार होते. ठरल्याप्रमाणे हे कुटुंब दुपारचे जेवण आटपून पहलगामच्या दिशेने निघाले होते. मात्र त्याआधीच तिथे गोळीबार झाल्यामुळे वाटेतच ते थांबले.
लावण्याने सांगितले की, “आम्ही मंगळवारी श्रीनगरपासून सुमारे 80 किलोमीटर दूर असलेल्या पहलगामला निघालो होतो. आम्ही त्या सकाळी थोडे उशिरा निघालो. मागील दोन दिवस धावपळीमुळे जेवण व्यवस्थित केले होते. त्यामुळे माझ्या नवऱ्याने बैसारणला जाण्यापूर्वी जेवणाचा आग्रह धरला. बैसारण फक्त 15 मिनिटांच्या अंतरावर होते”
लावण्या पुढे सांगतात कि, “रस्त्याच्या कडेला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवण मागवले. मात्र फ्राईड राईस खूपच खारट असल्याने आमच्या अक्षरशः तोंडाची चव गेली. रेस्टॉरंटमधील कर्मचाऱ्यांनी आमची नाराजी जाणून घेत ताजं जेवण बनवण्याचा प्रस्ताव दिला. आम्ही पुन्हा जेवण मागवले. त्यामुळे जवळपास एक तास उशीर झाला.”
जेवण आटोपल्यानंतर या कुटुंबाने पुन्हा प्रवास सुरू केला. बैसारणपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर असताना त्यांना काहीतरी गडबड असल्याचे जाणवले. लावण्या म्हणाल्या, “आम्ही पाहिले की घोड्यावरुन अनेकजण परत येत आहेत. बरेच लोक ओरडत होते, पण आम्हाला त्यांची भाषा समजत नव्हती. आम्ही एका गाडीला थांबवले, तेव्हा समजले की गोळीबाराची घटना घडली आहे. आमच्या कुटुंबाला काहीतरी गंभीर आहे, असे वाटले. त्यामुळे आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला.”