Thursday, May 8, 2025
Homeब्रेकिंग न्यूजहीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी...

हीच योग्य वेळ, आता भारताने पाकिस्तानच्या नरडीचा घोट घेतला पाहिजे; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्याचे ठाम मत

नवी दिल्ली/वॉशिंग्टन : पहलगाममधील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही संताप उसळला आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी ‘काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस आहे’ असे वक्तव्य केले आहे. यावर, अमेरिका थिंक टँक ‘अमेरिकन एंटरप्राइझ इन्स्टिट्यूट’चे वरिष्ठ फेलो आणि पेंटागॉनचे माजी अधिकारी मायकेल रुबिन (Michael Rubin) यांनी “जर काश्मीर त्यांच्या कंठाची नस आहे, तर भारताने त्या नरडीचा घोट घेतलाच पाहिजे!” असे थेट प्रत्युत्तर दिले आहे.

रुबिन यांनी असीम मुनीर यांची तुलना थेट ओसामा बिन लादेनशी केली. “फरक एवढाच की, लादेन गुहेत होता, मुनीर राजवाड्यात राहतो,” असे सांगत त्यांनी पाकिस्तानवर आणि त्यांच्या सैन्यावर जबरदस्त टीका केली. पाकिस्तान दहशतवादाचे उगमस्थान असून, इस्लामाबादने याला हिरवा कंदील दिला आहे, असे स्पष्ट म्हणत त्यांनी अमेरिकेलाही पाकिस्तानविरुद्ध अधिक कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले.

पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द; पुढील तीन दिवसांत सोडावा लागणार भारत देश, CCS चा कठोर निर्णय

ज्या वेळी पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स भारतात होते. याआधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या भारत भेटीदरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणेच यावेळीही असाच हल्ला करण्यात आला. जेडी व्हान्स यांच्या भारतभेटीवरून लक्ष विचलित करण्याचा हा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. राजकीयदृष्ट्या हल्ल्याची वेळ निश्चित केली होती. हे धक्कादायक आहे; पण यातून हेच दिसते की, तुम्ही डुकराला कितीही लाली, लिपस्टिक लावा, पण ते डुक्करच राहाते. आम्ही दहशतवादाचा पुरस्कार करत नाही, असे कितीही दाखवण्याचा पाकिस्तानने प्रयत्न केला तरी, तो दहशतवादाला खतपाणी घालतच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.

तसेच अमेरिकेने पाकिस्तानला दहशतवादाला खतपाणी घालणारा देश म्हणून घोषित करावे आणि असीम मुनीरला दहशतवादी घोषित करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

पाकिस्तानला भारताच्या प्रतिहल्ल्याची भीती!

रुबिन यांनी म्हटले आहे की, “आता कोणताही शॉर्टकट नको. आयएसआय आणि पाक सैन्याचे नेते हे दहशतवादी आहेत, त्यांना तसेच घोषित केले पाहिजे. भारताने इस्रायलप्रमाणेच कठोर भूमिका घ्यायला हवी.”

त्यांनी पहलगाम हल्ल्याची तुलना ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर झालेल्या हमास हल्ल्याशी केली आणि सांगितले की, शांतताप्रिय पर्यटकांना लक्ष्य करणे हीच नवी दहशतवादी रणनीती आहे. अगदी हमासप्रमाणे. भारतातल्या मध्यमवर्गीय हिंदूंवर हल्ला हा केवळ एक दहशतवादी कृत्य नव्हे, तर पाकिस्तानकडून विचारपूर्वक आखलेली खेळी असल्याचा ठपका त्यांनी ठेवला.

या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरोधात उचललेली पावले, जसे की सिंधू जल करार स्थगित करणे, अटारी नाका बंद करणे, हे अत्यंत योग्य असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. “पाकिस्तानला जगभरात वेगळं पाडण्याची हीच योग्य वेळ आहे,” असा स्पष्ट सल्ला त्यांनी दिला.

पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तैयबासह अनेक दहशतवादी संघटना आहेत, हे आम्हाला माहीत आहे. दुर्दैवाने, पाकिस्तानी राजनैतिक अधिकारी पाश्चात्य देशांना मूर्ख बनवत आहेत. त्यामुळे दहशतवादविरोधी कारवाई कमी झाली, अशी टिप्पणी त्यांनी केली.

रुबिन यांच्या या वक्तव्याने भारताच्या आंतरराष्ट्रीय धोरणांना एक नवा पाठिंबा मिळाला आहे आणि जागतिक स्तरावर पाकिस्तानविरोधात आक्रमक राजनैतिक भूमिका घेण्याचा दबावही वाढतो आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -