छोड आये हम वो गलियाँ…

Share

वैशाली शिरोडकर: पहलगाम

निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच भेटींदरम्यान येथील निसर्ग सौंदर्याबरोबरच आम्ही वाढत्या पायाभूत सुविधांचा अनुभवही घेतला आहे. मात्र ही भेट इतकी धक्कादायक आणि हादरून टाकणारी असेल अशी कल्पनाही केली नव्हती. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याचा अनुभव, दोन शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे. तरीही केलेला एक प्रयत्न…

‘सौंदर्या’मध्ये रमणीयता, मोहकता, विलोभनीयता आदी शब्दांची सुंदर गुंफण आपसूकच होत असली तरी प्रत्येकवेळी ते दिसतेच असे नाही. काही अन्य पदरांचे वलय, त्यांचे अस्तित्व आणि प्रभाव यामुळे सौंदर्य बाधित होते. यालाच आपण ‘शापित सौंदर्य’ म्हणतो. म्हणजेच सौंदर्य नाकारता येत नाही पण त्याचा निरलस आनंदही अनुभवता वा उपभोगता येत नाही. काश्मीरसारख्या नितांत सुंदर भागाची अवस्था काहीशी अशीच आहे. देशाच्या या भागावर निसर्गाने लयलूट केली आहे. बर्फाच्छादित डोंगर, रमणीय दऱ्या, कधी धुक्यात, कधी बर्फात, तर कधी मऊशार गवतांमध्ये हरवलेल्या वाटा, ऋतूंमध्ये बहरणारे ताटवे, केशराचे मळे, रसरशीत सफरचंदाच्या बागा हे आणि यासारखे सौंदर्य अन्य भागांत बघायला मिळणे विरळच. म्हणूनच सौंदर्य आणि काश्मीर हे परस्परांना समानार्थी असल्यासारखे शब्द आहेत. दहशतीचा पडदा विरळ असताना चित्रिकरणांसाठी अनेक निर्मात्यांनी देशाच्या या कोपऱ्याची वाट धरली ती याच कारणामुळे! पुढे-पुढे दहशतीची दाहकता वाढत गेली, दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हल्ल्यांचे प्रमाण आणि क्रौर्य वाढत गेले आणि सरकारी-लष्करी अधिकाऱ्यांप्रमाणेच सर्वसामान्यांनाही त्याची झळ पोहोचू लागली तेव्हा मात्र रुपेरी पडद्यावरूनच नव्हे, तर पर्यटकांच्या बकेट लिस्टमधूनही काश्मीरचा पत्ता कट होऊ लागला. काश्मीरच्या विविध भागांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, त्यात ठार झालेल्यांची यादी आणि राजकारण्यांकडून वाहिल्या जाणाऱ्या श्रद्धांजलीच्या ठोकळेबाज ओळी अनेक वर्षे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरील एक कोपरा व्यापून राहिल्या. त्यामुळेच अनुच्छेद ३७० हटवले जाणे, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करत देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे, खोऱ्यामध्ये विकासकामांनी वेग घेणे हा घटनाक्रम पुढे पुढे सरकू लागला तशी काश्मीर बघण्याची सर्वसामान्यांच्या मनातील आशाही पल्लवित होऊ लागली. बोगदे, रेल्वे वा अन्य साधनांनी प्रवास सुखकर झाल्यामुळे काश्मीरमधील वर्दळ वाढली आणि देश दहशतवादाचा नायनाट झाल्याचे चित्र रंगवू लागला. मात्र २२ एप्रिलचा भयावह पण तितकाच भेकड हल्ला या देखण्या चित्रावर पाणी फिरवणारा ठरला.

काश्मीरमध्ये फिरण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी चार वेळा आम्ही काश्मीरला भेट दिली होती. आताही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पावले काश्मीरकडे वळली होती. प्रेक्षणीय स्थळे पाहताना टूर लिडरने बैसरनचे गवताळ पठार बघण्याबाबत सुचवले होते. दिवस मोकळा असल्यामुळे आम्हीही तिथे जाण्याचा विचार करत होतो. मात्र तिथे जाण्यासाठी पायी अथवा घोड्यावरून हे दोनच पर्याय असल्याचे समजले. अनेक वेळा ट्रेक केल्यामुळे घोड्यावरून जाताना त्रास होतो, हे ठाऊक होते. त्यामुळेच आम्ही स्थळ बदलले आणि दुसरे ठिकाण निवडून तिकडे फिरून आलो. हॉटेलमध्ये परतेपर्यंत सदर दहशतवादी हल्ल्यांची कल्पना नव्हती पण त्यानंतर अनेकांचे खुशाली विचारणारे फोन येऊ लागले. आलात का, रुममध्येच आहात ना अशा प्रश्नांमुळे परिस्थितीची दाहकता समजली आणि अगदी हाकेच्या अंतरावर इतका मोठा नरसंहार झाल्याचे समजताच अंगावर वीज कोसळण्यासारखे वाटले. हा भयंकर धक्का होता. या घटनेनंतर बाहेरच्या हालचाली तीव्र झाल्या.

रूममध्ये असूनही हेलिकॉप्टरच्या घिरट्या वाढल्याचे जाणवत होते. आधी कधीच हा अनुभव आला नव्हता. हल्ल्याची दाहकता, क्रौर्याची परिसीमा आणि निरपराधांचे गेलेले बळी याविषयी स्पष्टता येत गेली आणि आपण अतिशय स्फोटक स्थितीचा अनुभव घेत असल्याचे सत्य समोर आले. आजपर्यंत घडले नव्हते असे अघटित या घटनेतून दिसून आले. धर्मांधतेचे रूप किती उग्र असू शकते हे जवळून समजले. भीषण दहशतवादी हल्ल्याची बातमी पसरताच पर्यटकांनी काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला. आम्हीही तत्काळ परत फिरण्याचा निर्णय घेतला. रस्ते शांत होते. नेहमी असते तेवढेच जवान रस्त्यांवर तैनात दिसले. फार मोठा बंदोबस्त वा तपासण्या कुठेही दिसल्या नाहीत. दुकाने बंद असल्यामुळे एक प्रकारची शांतता मात्र होती. अर्थात स्थानिकांची खूपच मदत मिळाली. आमच्याशी बोलताना त्यांना या घटनेमुळे झालेले दु:ख स्पष्ट दिसत होते. उद्विग्न चेहऱ्याने ड्रायव्हर ‘हा तर आमच्या रोजीरोटीवरचा हल्ला आहे’ असे म्हणाला तेव्हा त्याच्या डोळ्यांतील आर्थिक चणचणीचे चित्र स्पष्ट वाचता येत होते. हॉटेलमधील लोकांनी सगळ्यांच्या प्रवासाची सोय केली होती. पर्यटकांनी भरलेले काश्मीर अचानक रिकामे झाल्यानंतर एक प्रकारचा ताण जाणवत होता. जगातील अनेक देशांमध्ये मोठे बाँबस्फोट झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत. मुंबईतही हीच परिस्थिती होती. पण याला घाबरून कोणी मुंबईत जाणे थांबवले नाही. त्यामुळे आज शांत झाले असले तरी काश्मीरमधले पर्यटन थांबणार नाही. अशा घटनांनी घाबरून, धास्तावून ही वाट वगळण्याचा विचार करणे अयोग्य ठरेल. अशाने कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. मात्र सदरच्या घटनेमागे सुरक्षा यंत्रणेतील गलथानपणा कारणीभूत असू शकतो. ही व्यवस्था चोख असती आणि वेळीच डाव लक्षात आला असता, तर तो उधळून लावणे फारसे कठीण नव्हते. पण आपण तिथे कमी पडतो, असे वाटते. मुख्य म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे दहशतवादाचा त्रास केवळ पर्यटकांना होतो असे नाही, तर येथील नागरिकांना अधिक प्रमाणात होत आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तर परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आता हा भाग सुरक्षित वाटतो. त्यामुळेच पर्यटनासाठी काश्मीरचा पर्याय निवडताना मनात कोणतीही भीती नव्हती. मात्र या घटनेचे दु:ख फार मोठे आहे. हा विकासाला खीळ घालण्याचा प्रकार म्हणावा लागेल. काश्मीरमध्ये पर्यटकांवर इतका मोठा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यात भारतीय नागरिकांबरोबरच दोन परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे, कारण ही बाब आपल्या देशाची जागतिक प्रतिमा डागाळणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवण्यासाठी वापरलेली पद्धत जाहीरपणे सांगणेच अशक्य आहे. यामुळे निर्माण झालेले भीतीयुक्त वातावरण घालवावे लागेल. मात्र या घटनेला प्रतिसाद देताना भारतामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडणे योग्य नाही. भावनेचा भडका उडू न देता शांतता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज अस्वस्थ असणाऱ्या या वाटांवरून आम्ही परतीचा प्रवास करत आहोत. पण काही काळातच परिस्थिती निवळेल, धोका संपुष्टात येईल आणि काश्मीरमधील गल्ल्या पुन्हा एकदा गजबजतील ही अपेक्षा आहे.

(शब्दांकन : स्वाती पेशवे)

Recent Posts

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

2 minutes ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

25 minutes ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

47 minutes ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

50 minutes ago

पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…

52 minutes ago

Operation Sindoor : का दिलं ऑपरेशन सिंदूर नाव?

भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. हा सूड उगवण्यासाठी दहशतवादी ठिकाणांवर तिन्ही सैन्य दलांनी संयुक्त कारवाई…

1 hour ago