Share

श्री गुरुगाथा – अरविन्द दोडे

तव इये शब्दकुपिकेतळी |
नोडवेचि अवधानाची अंजुळी |
जे नावेक अर्जुन तये वेळी |
मागाचि होता ॥७.१८५॥

वाच्या सांगण्याकडे भक्ताचे लक्ष नसेल, तर गुरू त्याला श्रवणभक्ती शिकवतो! शब्दरूपी कुपीच्या खाली अर्जुनाची लक्षरूपी ओंजळ प्राप्त न झाल्याने ही अस्वस्थता आहे. अर्थरूपी रसदार फळं होती ती. वैराग्यगंगेच्या तीरावर वास करताना गुरुभक्तीच्या यज्ञाची समाप्ती कधी होत नाही. रोकडे स्वानुभवसौंदर्य लाभल्यावर निजबोधाचं प्रमेय सहज सुटते, पण हे गणित सुटण्यासाठी ‌‘अवधानकला’ शिकावी लागते. कोणतेही कार्य माणसाने करण्यासाठी देहमनाची पूर्ण तयारी म्हणजे अवधान! यात जाणिवेचे केंद्रीकरण होते. इष्ट विषय जाणिवेच्या केंद्रस्थानी आणला जातो. बोधक्षेत्रात मुख्य आकृती कोणती हे अवधानामुळे ठरते. याचे उदाहरण असे की, धावण्याच्या शर्यतीत स्पर्धकाचे लक्ष, धावण्याच्या सूचनेकडे असते. ती सूचना मध्यवर्ती आणि इतर बाबी सीमावर्ती किंवा गौण ठरतात.

अवधान आणि संवेदन या गोष्टी परस्परांशी संबंधित आहेत. पूर्वी अवधानाचा अभ्यास आत्मनिरीक्षणासाठी केला जात असे. आधुनिक काळात मानसशास्त्रज्ञांनी ही कला अधिक अभ्यासली. अवधानात मेंदूच्या अल्फा लहरींचे निरोधन होते. एका वेळी आपण अनेक कामं करतो. सवयीने ते जमते. ही कला जीवनोपयोगी आहे, म्हणून हा खुलासा. अवधान म्हणजे एकाग्रता!

कोणतीही विद्या असो, कला असो, एकाग्रतेशिवाय आत्मसात होणं अशक्यच. गुरूच्या सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी एकाग्रता आवश्यक आहे.

तदेजति: तनैजति |
तद्दूरे तत्समीपके |
तदन्तरस्य सर्वस्य |
तदु सर्वस्य बाह्यत: ॥६२॥

सर्वव्यापी गुरूचे हे वर्णन. स्थूल देह अमर होणे अशक्य. स्वत:च्या दिव्यत्वाचे स्मरण करणे म्हणजे सार्थकता. ‌‘मी आत्मा आहे’ हे समजून घेण्यासाठी गुरूचा अवतार. गुरुतत्त्व हे गतिशील. परिवर्तनशील नाही. गुरू दूर असतो. सर्वांतरी आहे, तसा बाह्यंतरीही आहे. जे शब्दात सांगता येत नाही, ते वेगळ्या भाषेत सांगतात. बुद्धीला चालना देतात. एका ठिकाणी आहे, म्हणजे तो सर्वत्र आहे. देवदर्शन झाल्यावर तीर्थक्षेत्री रोगी, भिकाऱ्यांना पाहून माणूस तिरस्कार करतो. शिव्या देतो. लोहार आपल्या कामात लोखंड बघतो. सोनार सोनं पाहतो. सुतार लाकडाची परीक्षा घेतो, तर शिंपी कापडाचा पोत निरखतो. कासार हात बघून बांगड्या भरतो, तर कसाई काय पाहतो, हे कळतं आपल्याला!

सागराचं पाणी, पाण्याच्या लाटा, लाटांवरील फेस यात समुद्रच असतो की नाही? कुंभार मातीच्या जाती ओळखतो. तसा साधकानं सर्वव्याप्त गुरू जाणावा! गुरू म्हणजे शिष्याची आत्मप्रभा, आत्मशक्ती होय.

अपूर्वाणां परं नित्यं |
स्वयंज्योतिर्निरामयम्‌‍ |
विरजं परमाकाशं |
ध्रुवभानंदमव्ययम्‌‍ ॥६४॥

आधीच्या श्लोकाशी या श्लोकाचा संबंध आहे. गुरू हाच साक्षात परब्रह्म आहे, हे पटवून देताना शिव म्हणतात, ‌‘हे प्रिये! गुरूसारखा पूर्वी कुणी झालेला नसतो. गुरूसारखा फक्त गुरूच असतो.

एक कथा आठवते, अर्थात गुरू-शिष्यांचीच आहे. मित्रहो, तात्पर्य तुम्हीच काढा – एका शिष्यानं गुरूला विचारलं, “तुमचे गुरू कुठे आहेत? त्यांच्याकडे तुम्ही जात नाहीत, ते कधी इथे येत नाहीत, असे का?” गुरू हसून उत्तरले, “माझे अनेक गुरू आहेत.”

“अनेक कसे? एकच असतो ना?”
“होय. पण त्यांना गुरू मानलंय मी!”
“एखादे नाव सांगा.”
“चोर! त्याला मी गुरू मानले अन्‌‍ प्रगती झाली साधनेच्या वाटेवर!”
“ती कशी? सगळी कथा सांगाल का?”
“सांगतो, ऐक! मी एकदा तीर्थयात्रा करत होतो. पायी चालता-चालता एका गावात पोहोचलो. डोक्यावर चंद्र पाहून लक्षात आले, मध्यरात्र झालीय. गावात सामसूम. काय करावे कळेना. देऊळही दिसेना. मुक्काम करावे कुठे, प्रश्नच होता. तेवढ्यात एक तरुण दिसला. त्याच्याजवळ गेलो. पाहिलं तर तो एका भिंतीवर आवाज न करता पहारीने घाव घालत होता. मी विचारलं, ‌‘अरे बेटा, इथे कुठे मुक्कामाची सोय होईल का?’
“होईल ना! तुमची हरकत नसेल तर!”
“अरे, अर्ध्या रात्रीचा प्रश्न आहे. कुठंही पाठ टेकायला मिळाली की झालं काम!”
“महाराज, मी एक प्रामाणिक चोर आहे. माझ्या घरी चालेल तुम्हाला?”
“होय चालेल!”
इलाजच नव्हता. मी गेलो. रात्री त्याने दोन फळं दिली. मी शांत झालो. तो म्हणाला, “मी पुन्हा जातोय. सकाळी येईन. तेव्हा भेटू पुन्हा. मला आशीर्वाद द्या.”
तो गेला. मी झोपलो. त्याच्या झोपडीत फार सामान नव्हते. त्याच्या छोट्याशा झोपडीत कुणी नव्हते. सकाळी तो आला. मी स्नान करून, पूजा करून जाण्याच्या तयारीत होतो. तो म्हणाला, “काही दिवस जाऊ नका. मला भरपूर माल मिळाला की तुम्हाला कपडे घेऊन देईन. मग जा.”

मला त्याची माणुसकी फार आवडली. एकेक दिवस करता करता महिनाभर राहिलो. त्याचा काहीच त्रास नव्हता. दिवसा तो झोपायचा. रात्रभर बाहेर असायचा. रोज त्याचा उत्साह कायम तसाच दिसायचा. एका डब्यात त्याने भरपूर पैसे ठेवले होते. रोज थोडे थोडे खर्च करायचा. ‌‘आज नाही तर उद्या मला मिळेलच’ असे म्हणायचा. गाणं गुणगुणायचा. स्वयंपाक करायचा. मस्त मजेत जगायचा.

मी साधना करून कंटाळलो होतो. भक्तीत मन रमत नव्हते. चाळीस वर्षांचा झालो होतो. गुरू शोधत वणवण भटकत होतो. आता सगळं सोडून द्यावं. जीव द्यावा असं वाटत होतं. चोर भेटला अन्‌‍ मी विचार केला. पाप करणारा इतका सुखात राहू शकत असेल, तर मी पुण्य करणारा आनंदित का नाही? त्याला मी गुरू मानलं अन्‌‍ थोड्याच दिवसात मला सद्गुरू लाभले.”

कुणाकडून उत्तम गुण घ्यावा हे शिष्यानं शिकायला हवंय. पुन्हा आपण अवधानाकडे वळूयात. माऊलींनी म्हटलंय, ‌‘आता अवधान एकले देईजे!’ ते याच एकाग्रतेसाठी. सुगृहिणी पाहा, स्वयंपाक करताना कुकर लावते. किती शिट्ट्या झाल्यात हे लक्षात ठेवते. भाजी करते. दूध तापवते. बेल वाजल्यावर कोण आलंय पाहते. फोनवरही बोलते… या साऱ्या क्रिया म्हणजे उत्तम अवधानांचा पुरावा! असो. ‌‘अवधानाचा चारा’ असंही माऊलींनी म्हटलंय. संतांचे अनंत उपकार असे उपयुक्त असतात. पैशाचे कर्ज फेडता येते. गुरूचे ऋण तसेच राहते. म्हणूनच जन्मोजन्मी गाठभेट होत राहते. आपल्या सुखासाठी तो दूर जातो. आपणच आपला दिवा व्हावे म्हणून!

जय गुरुदेव!

(arvinddode@gmail.com)

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

3 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

3 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

3 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

3 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

4 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

5 hours ago