Thursday, May 8, 2025
Homeक्राईमथरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने,...

थरार, आक्रोश आणि अश्रूंचा डोंगर : डोळ्यासमोर गेले कर्ते पुरुष; लेले, मोने, जोशी कुटुंबांचा हृदयद्रावक अनुभव

लेले, मोने आणि जोशी परिवाराने सांगितला तिथे घडलेला सर्व थरार

मुंबई : काश्मीरच्या निसर्गरम्य खोऱ्यात फिरायला गेलेली डोंबिवलीतील तीन कुटुंबं एका क्षणात उध्वस्त झाली. हे हल्ले केवळ तीन कुटुंबांचं दुःख नाही, तर प्रत्येक भारतीयाच्या काळजावरचा घाव आहेत. पहलगामजवळील बेसरन टेकड्यांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी या तीन मावस भावांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हे तिघेही आपल्या-आपल्या कुटुंबातील कर्ते पुरुष होते. एकाच क्षणी तीन संसारांच्या आधारस्तंभांचा जीवनदीप विझला. आज त्यांच्या कुटुंबीयांनी प्रसारमाध्यमांसमोर डोळ्यात अश्रू आणि मनात थरकाप घेऊन त्या दिवसाचा थरार उलगडून सांगितला.

“निसर्गाच्या कुशीत हिंडत होतो आणि अचानक नरक उघडलं…”

अनुष्का मोने, त्यांची मुलगी ऋचा आणि भाऊ प्रसाद सोमण यांनी डोळ्यासमोर घडलेल्या प्रत्येक क्षणाची शहानिशा पत्रकार परिषदेत केली. त्या दिवसाच्या सकाळी बेसरन टेकड्यांवर पर्यटकांची खूप गर्दी होती. अचानक काही लोक घाईघाईने खाली उतरू लागले, काही खेळ सुरु आहेत म्हणून गर्दी असेल असं वाटलं. काही क्षणांत लष्करी वेशातील दोन दहशतवादी समोर येऊन उभे ठाकले. आणि त्या क्षणाने सगळं आयुष्य बदलून टाकलं.

“काय करताय?” विचारणाऱ्या हेमंत जोशींच्या डोक्यात गोळी

हेमंत जोशी यांना घोडेस्वार झुकण्यास सांगत होते. त्यांनी साहस करून “तुम्ही काय करताय?” असा प्रश्न दहशतवाद्यांना विचारला. त्यावर “काही करू नका, बसून राहा” असं सांगतच त्यांनी थेट त्यांच्या डोक्यात गोळी घातली.

“हिंदू कोण?” – आणि त्यानंतर मृत्यूचा तांडव

दहशतवाद्यांनी जमलेल्या पर्यटकांना झुकवून विचारणा केली – “हिंदू कोण? मुस्लिम कोण?” संजय लेले यांनी हात वर करताच त्यांच्या डोक्यात गोळी घालण्यात आली. ते जागीच कोसळले. त्याचप्रमाणे अतुल मोने यांनीही हात वर केला आणि त्यांच्या पोटात गोळी झाडली गेली. हे सांगताना त्यांच्या पत्नी अनुष्का आणि मुलगी ऋचा हतबुद्ध झाल्या.

“मी मागे होते… आणि संजय काकांचं डोकं माझ्या समोर फुटलेलं होतं” – ऋचाचा थरकाप

“तेव्हा माझे बाबा गयावया करत होते की आम्ही काही केलं नाही… पण त्यांनी त्यांना गोळी मारली. आई त्यांना कव्हर करत होती. मी डोळ्यांसमोर रक्त पाहिलं आणि काहीच सुचेनासं झालं”, असं सांगताना ऋचाच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात.

“कर्ते पुरुष गेले… आता आमचं काय?”

या हल्ल्यात फक्त पुरुषांनाच लक्ष्य केलं गेलं. महिलांना, मुलांना हात लावला गेला नाही. पण ज्यांचे आधारच गेले, त्या कुटुंबांचं भवितव्य आता अंधारात आहे. कोणी शिक्षण घेत आहे, कोणी अजून कमवायला लागलेलंही नाही. सरकारने या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा आणि उद्याच्या भविष्याचा भार उचलावा, अशी मागणी त्यांनी केली.

“दहशतवाद्यांना थेट शिक्षा हवी!”

“मोदींचा उल्लेख करत त्यांनी म्हटलं की काश्मीरमध्ये आपण आतंक माजवलाय… पण एक सामान्य पर्यटक कसला आंतकी?” असा संतप्त सवाल अनुष्काचे बंधु प्रसाद सोमण यांनी उपस्थित केला. कोणाचा राग निष्पाप पर्यटकांवर कशासाठी. हे क्रूर कृत्य करणाऱ्या दहशतवाद्यांना सरकारने पकडून त्यांना जनतेसमोर ठेचलं पाहिजे. पाकिस्तानला आता योग्य तो धडा शिकवला पाहिजे, असा जोरदार संताप त्यांनी व्यक्त केला.

लेले यांचा मुलगा हर्षल यानेही सांगितला सगळा घटनाक्रम

यावेळी संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यानेही सगळा घटनाक्रम उलगडून सांगितला. “२१ तारखेला आम्ही रात्री तिथे पोहोचलो होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही तीन तास प्रवास करुन तिथे पोहोचलो होतो. आम्ही तिथे असताना गोळीबाराचा आवाज ऐकला. फार दुरून आवाज आल्याने आम्ही दुर्लक्ष केलं. नंतर तो आवाज जवळ येत होता. स्थानिकांनी आम्हाला गोळी लागू नये यासाठी खाली वाकण्यास सांगितलं”, अशी माहिती त्याने दिली.

पुढे त्याने सांगितलं की, “दहशतवाद्यांनी हिंदू मुस्लिमांना वेगळं होण्यास सांगितलं. अतुल मोने यांनी दोघींना (पत्नी, मुलगी) मिठी मारुन, यांना सोडून द्या सांगितलं. त्यावर त्याने बाजूला व्हा नाही तर सगळ्यांना मारु असं म्हटलं. यानंतर त्याने पोटात गोळी घातली”.

“माझे व़डील संजय यांच्या डोक्यावर गोळी घातली. गोळ्या घातल्या तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता. माझ्या हाताला काहीतरी जाणवलं. नंतर उठून पाहिलं तर वडिलांचं डोकं रक्ताने माखलेलं होत. जेव्हा मी हे सर्व पाहिलं तेव्हा स्थानिकांनी जीव वाचवून निघून जा असं सांगितलं,” असा खुलासा त्यांनी केला.

“तिथे घोड्याने जायला ३ तास लागतात. तिथे नेणाऱ्यांनी जमेल तसा घोडा दिला होता. सगळे खाली उतरत होते. आम्ही आईला काही वेळ उचललं होतं. घोडेवाल्याने नंतर आईला पाठीवर उचलून घेतलं. मी आणि माझा भाऊ ४ तास चालत होतो. आईला आधीच रुग्णालयात चेकअपसाठी नेलं होतं. २ ते २.३० च्या सुमारास गोळीबार झाला होता. आम्ही सातच्या आसपास खाली पोहोचलो. मला तिघांचा मृत्यू झाल्याचं समजलं होतं. पण अधिकाऱ्यांनी कोणाला सांगू नका, असं सांगितलं होतं. माझ्या काकांनी आयपीएस अधिकाऱ्याशी बोलून त्यांच्या मित्राच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती. मी त्यांचा आभारी आहे, असंही त्याने सांगितलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -