Thursday, May 8, 2025
HomeदेशPahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर...

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यात पर्यटकांसह स्थानिकांचाही समावेश आहे. जखमींमधील काही पर्यटक महाराष्ट्राचे आहेत.

जुलैमध्ये अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी पर्यटकांवर हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला. दहशतवादी पोलिसांच्या गणवेशात आले होते. त्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली. हिंदू नावे ऐकताच त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला. बेसराण खोऱ्यात घोडेस्वारी करणाऱ्या पर्यटकांच्या एका समूहाला त्यांनी लक्ष्य केले. या हल्ल्याची जबाबदारी टीआरएफने घेतली आहे. या संघटनेच्या दहशतवाद्यांनी याआधीही अन्य राज्यांतील लोकांवर हल्ले केले आहेत. दहशतवाद्यांचा शोध सुरक्षा दलांकडून घेतला जात आहे. हेलिकॉप्टरच्या मदतीनं दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे.

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांच्या गटाने भटकंती करताना मॅगी खाणाऱ्या प्रवाशांवर अंदाधुंद गोळीबार केला. गोळीबार करण्याआधी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची नावे विचारली. पर्यटकांची हिंदू नावे ऐकताच दहशतवाद्यांनी गोळ्या झाडल्या. जम्मू-काश्मीरला फिरायला जाणारे दहशतवादी श्रीनगरसोबतच पहलगामला फिरायला जातात. इथले बेताब खोरे पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. दहशतवाद्यांचा हल्ला बेसरणमध्ये झाला. हे ठिकाण बेताब खोऱ्यापासून १० किलोमीटर अंतरावर आहे.

पर्यटकांना लक्ष्य करणारे काही दहशतवादी पोलिसी गणवेशात होते. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही त्यांच्याबद्दल कोणतीच शंका आली नाही. ८ ते १० दहशतवादी पोलिसांचा गणवेश परिधान करुन आले होते. हल्ल्यानंतर आयजी, डिआयजी यांच्यासह बडे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीआधीही बिगर काश्मिरींना लक्ष्य करण्यात आले होते. आता पुन्हा एकदा काश्मिरात मोठा दहशतवादी हल्ला झाल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

‘दहशतवाद्यांना सोडणार नाही’

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, ‘जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही,’ अशी प्रतिक्रिया पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या हल्ल्यानंतर सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि या प्रकरणात ठोस आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले. पंतप्रधानांनी गृहमंत्री अमित शाह यांना घटनास्थळी भेट देण्यास सांगितले आहे.

गृहमंत्री अमित शहा श्रीनगरला रवाना

पहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली ज्यामध्ये आयबी प्रमुख आणि गृहसचिव उपस्थित होते. बैठकीनंतर गृहमंत्री श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी, त्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री शहा म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना या घटनेची माहिती दिली आहे. शिवाय, हल्ल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. या भयानक हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असा निर्धार गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.

दहशतवाद्यांनी रेकी केल्याचा सुरक्षा यंत्रणांचा दावा

या हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बैठक घेतली. उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला, सीआरपीएफचे महासंचालक, जम्मू आणि काश्मीरचे महासंचालक आणि लष्कराचे अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीला उपस्थित होते. बैठकीनंतर अमित शाह यांनी दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही असे म्हटले. अमित शाह बीएसएफच्या खास हेलिकॉप्टरने श्रीनगरला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत आयबी प्रमुख आणि गृहसचिव देखील आले आहेत. दरम्यान, पहलगाम हल्ल्याबाबत सुरक्षा यंत्रणांनी मोठा खुलासा केला आहे. दहशतवादी दक्षिण काश्मीरमधील एका पर्यटन स्थळाला लक्ष्य करू शकतात अशी पूर्वसूचना होती. दहशतवादी धर्माच्या नावाखाली बिगर-काश्मिरींना लक्ष्य करू शकतात, अशी ही माहिती होती. त्या जागेची रेकी दहशतवाद्यांकडून आधीच करण्यात आली होती. जमिनीवरून मिळणाऱ्या मदतीमुळे दहशतवाद्यांना येथे शस्त्रे पोहोचवण्यात यश आले, असे सुरक्षा यंत्रणेचे म्हणणे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -