नेहमीच्या सवयीप्रमाणे मुग्धा जरा उशिराच उठली. तिला हाक मारून मारून आई थकून गेली होती. खरंतर आज मुग्धाचा वार्षिक परीक्षेचा पहिला पेपर होता. मुग्धाला आई काल रात्रीच म्हणाली होती, “अगं मुग्धा लवकर झोप आणि सकाळी लवकर उठून अभ्यास कर. पहाटेच्या वेळी अभ्यास चांगला लक्षात राहतो. कारण सकाळी आपले मन खूप प्रसन्न असते.” आईच्या बोलण्यावर मुग्धा फसकन हसली आणि म्हणाली, “आई जरा चिल घे. मला कळतंय आता कधी झोपायचं, किती वाजता उठायचं ते.” असे संवाद, अशा शाब्दिक चकमकी मुग्धाच्या घरात रोज चालायच्या पण मुग्धाच्या सवयीत बदल होत नव्हता. आठ वाजता मुग्धाचा मराठीचा पेपर होता. त्यामुळे मुग्धा जरा निवांतच होती. कारण मराठीचा काय अभ्यास करायचा! पास होण्यापुरते गुण मिळाले तरी पुरेसे. नाही तरी पुढे मराठी विषय सोडूनच द्यायचा आहे. अशी काहीशी ठाम मतं मुग्धाची होती. त्यामुळे स्वभावात थोडासा बेफिकिरीपणा आला होता. आईने मुग्धाला परत हाक मारली, “आज तुझी परीक्षा आहे ना! सकाळी आठ वाजता पेपर सुरू होणार आहे. आता साडेसात वाजलेत. तरी अजून झोपलीच आहेस. गधडे चल उठ!” मग मुग्धाने तोंडावरचे पांघरून बाजूला करत मोबाइलमध्ये वेळ पाहिली, तर पावणेसात झाले होते. आई खोटं बोलते. माझी मुद्दाम झोपमोड करते म्हणून ती आईवर प्रचंड चिडली आणि पुन्हा तोंडावर पांघरून घेऊन झोपी गेली. मुग्धाच्या कठोर शब्दांनी आईला वाईट वाटले. तिच्या डोळ्यांत पाणी आले. पण ते बघण्यासाठी कोणीही नव्हते. कारण मुग्धाने तर तोंडावर चादर कधीच ओढून घेतली होती.
आता मात्र आईने ठरवले बस झाला हा अपमान. काही बोलायचं नाही. तिला पाहिजे तेव्हा ती उठेल, हवी तेव्हा शाळेत जाईल, नाहीतर झोपून राहील. पण यापुढे मुग्धाला हाक मारायची नाही. इकडे आईने भरभर भाजी पोळी बनवून टाकली. घड्याळाचा काटा साडेसातच्या दिशेने धावत होता. आईची चलबिचल वाढत होती. पोरीचा पेपर चुकेल म्हणून तिची घालमेल वाढत होती. पण पुन्हा एकदा अपमान करून घेण्याची तिची तयारी नव्हती म्हणून ती गप्पच बसली. पण कुणास ठाऊक कसा साडेसात वाजता मुग्धाचा मोबाइल कोकलला. मुग्धाने पाहिले सात वाजून पस्तीस मिनिटे झाली होती. ते पाहताच मुग्धा ओरडली, “आई हे काय आज माझा पेपर आहे आणि तू मला उठवले का नाहीस?” आईने तिच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. जसं काही ऐकूच आले नाही. असं समजून ती आपली कामं करत राहिली.
आता मात्र मुग्धाची त्रेधातिरपिट उडाली. घाईघाईतच मुग्धा उठली आणि “माझा टॉवेल आणि कपडे दे गं” असं आईला म्हणत बाथरूममध्ये पळाली. पण आई काही न बोलता दुसऱ्या खोलीत निघून गेली. मुग्धाच्या लक्षात आले आई रागावली आहे. तिला सांगून काही उपयोग नाही. मग कपडे शोधण्यापासून पळापळ सुरू झाली. तयारी करेपर्यंत आठ वाजलेदेखील. तरी नशीब शाळा समोरच होती. या गडबडीत ती शाळेचे ओळखपत्र घरीच विसरली. धावत धावत गेटवर पोहोचली. पण ओळखपत्र दाखवा मगच आत सोडेल असा तगादा शिपाई काकांनी लावला. तिने सारे दप्तर शोधले ओळखपत्राचा पत्ताच नव्हता. ती मनोमन आईला दोष देऊ लागली. मला मुद्दाम झोपून ठेवले. तयारी करताना मदत केली नाही. नको नको ते विचार मुग्धाच्या डोक्यात येऊ लागले.
पाच मिनिटांच्या मनधरणीनंतर शिपाईकाकांनी तिला आत सोडले. “मी वर्गात येऊ का?” मुग्धाच्या आवाजाने पेपर लिहिणाऱ्या मुलींचे लक्ष मुग्धाकडे गेले. थोड्याशा आश्चर्याने, कुत्सितपणे हसून त्यांनी आपल्या माना परत एकदा पेपरमध्ये घातल्या. मॅडम म्हणाल्या, “पेपर सुरू होऊन वीस मिनिटे झाली आहेत. आता तुला परीक्षेला बसता येणार नाही.” आता मात्र मुग्धाच्या डोळ्यांत पाणी आले. ती गयावया करू लागली. “मॅडम माझी चूक झाली. मला उशीर झाला. अशी चूक माझ्याकडून परत होणार नाही.” अन् ती हमसून हमसून रडू लागली. मॅडम म्हणाल्या, “ठीक आहे. आता असा परत कधी उशीर झाला, तर पेपरला बसू देणार नाही!”
घाईघाईतच मुग्धाने मॅडमकडून पेपर घेतला. दप्तरातले पेन बघितले, तर सारेच लाल रंगाचे! आता काय करायचं? मग वर्ग मैत्रिणीकडून पेन घेऊन मुग्धाने पेपर कसाबसा पूर्ण केला. पेपर संपल्यावर मैत्रिणी तिला विचारू लागल्या, “काय गं मुग्धा आज परीक्षा आहे हे विसरली होतीस वाटतं!” या प्रश्नाचे उत्तर देताना मुग्धाला अगदी लाजल्यासारखं झालं. दारावरची बेल वाजतात आईने दरवाजा उघडला. तोच मुग्धाने आईला मिठी मारली. “आई, खरंच चुकले मी! आळशीपणा केला. निष्काळजीपणे झोपून राहिले. पण आज मला वेळेचे महत्त्व कळले. आई मी तुला वचन देते. यापुढे मी माझी सारीच कामे वेळेवर करीन.” मग आईने मोठ्या खुशीने मुग्धाला आपल्या मिठीत घेतले.
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘आम्ही मोठे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…