Thursday, May 8, 2025

अपयश

शिल्पा अष्टमकर

आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी अपयश येतंच. परीक्षा बरोबर होत नाही, स्पर्धेत जिंकता येत नाही, मनासारखं काही साध्य होत नाही- हे अपयशाचं रूप असतं. पण खरं पाहिलं, तर अपयश ही हार नाही, ती तर शिकण्याची संधी आहे. दहावीचा निकाल जाहीर झाला. मैत्रिणीला मोठ्या उत्साहाने फोन केला. मुलगा दोन विषयांत नापास झाला म्हणून ती निराश होती. मुलाला दोष देत होती. मी जास्त काही बोलले नाही. पुन्हा परीक्षेला मुलाला बसविण्याचा सल्ला दिला व फोन ठेवला. बहुतेक मुले अपयश आल्यावर खचून जातात, निराश होतात व वैफल्यग्रस्त होतात. अशा मुलांना खरी गरज असते ती मानसिक आधाराची, सहानुभूतीची, प्रेमाची. अपयश हा यशाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. जगातील प्रत्येक यशस्वी व्यक्तीने त्यांच्या आयुष्यात कधीतरी अपयश अनुभवलं आहे. थॉमस एडिसनला बल्ब तयार करताना हजारो वेळा अपयश आलं, पण तो थांबला नाही. त्याने सांगितलं, “ मी अपयशी झालो नाही, मी अशा हजारो मार्गांचा शोध घेतला जे काम करत नव्हते.” हेच त्याच्या यशाचं गमक होतं. आपल्याला एखाद्या परीक्षेत कमी गुण मिळाले, स्पर्धेत हरलो, किंवा एखादा प्रयत्न फसला, तर त्याला अपयश म्हणतात. पण ते अपयशच आपल्याला आपली चूक ओळखायला शिकवतं. जेव्हा आपण आपल्या चुका सुधारतो, तेव्हाच पुढचं यश आपलं होतं.

अपयशातून शिकण्याची वृत्ती असणारी व्यक्ती कधीच थांबत नाही. ती सतत प्रयत्न करते, नव्याने शिकते आणि शेवटी यशस्वी होते. त्यामुळे, अपयश आल्यावर खचून जाऊ नका. ते स्वीकारा, त्यातून शिका आणि पुढे चला. जीवनात माणसाच्या वाट्याला अपयश येणे ही अपरिहार्य गोष्ट आहे. अपयश मिळाल्याशिवाय यशस्वी जीवन जगता आले अशी माणसे पृथ्वीच्या पाठीवर हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच असतात. अवतारी पुरुष, संत मंडळी, समाजसुधारक, नेते यांची चरित्र व इतिहास अभ्यासला तरी हे लक्षात येईल. जर या थोर पुरुषांची ही कथा, तर सामान्य लोकांच्या जीवनात त्यांना नैराश्य, वैफल्य व अपयश प्राप्त झाले तर त्यात काय नवल! विद्यार्थ्यांच्या यशात महत्त्वाचा घटक म्हणजे “प्रयत्न” हा होय; म्हणूनच त्यांना प्रयत्नांची महती सांगून त्यांना पुन्हा नवीन उत्साहाने प्रयत्नपूर्वक यश खेचून आणण्यासाठी पालक शिक्षकांनी मदत केल्यास निश्चितच त्यांचे जीवन यशस्वी होईल. नापास विद्यार्थ्यांना गरज असते ती योग्य मार्गदर्शनाची. ते मार्गदर्शन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे यातच खरे शहाणपण आहे. म्हणूनच, अपयश आल्यावर रडू नका, लपून बसू नका. उलट स्वतःचा विचार करा – “मी यातून काय शिकू शकतो?” हेच विचार तुम्हाला यशाकडे घेऊन जातील. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. – ती घाबरून नकारू नका, ती चढून पुढे जा.

दुसरा मुद्दा असा की शिक्षण हे ज्ञानासाठी, ज्ञान वाढविण्यासाठी घेतले पाहिजे. हे मुलांच्या मनावर बिंबविले पाहिजे, ज्ञानासाठी अभ्यास केल्यावर गुण वाढणारच हे सांगायला ज्योतिषी नको! केवळ मार्क्स चांगले मिळविण्यासाठी अभ्यास केल्यास मुलांवर मानसिक ताण वाढतो. शाळा कॉलेजात विद्यार्थ्यांना जे शिक्षण दिले जाते ते प्रामुख्याने नोकरी-धंदा करण्यासाठी उपयुक्त ठरते; परंतु मानसिक उन्नती हा शिक्षणाचा मुख्य हेतू असला पाहिजे. मानसिक उन्नती होताच विद्यार्थ्यांना यश निश्चितच मिळेल यात शंकाच नाही. यशाच्या मार्गावर अपयश ही केवळ एक विश्रांती असते, अंतिम थांबा नाही. म्हणून, अपयश आल्यावर स्वतःवर विश्वास ठेवा आणि पुन्हा उठून नव्या जोमाने प्रयत्न करा. कारण, अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -