Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

‘टीनएजर्सच्या पालकांकडून अपेक्षा’

डाॅ. स्वाती गानू

वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो, चेष्टा, मस्करी करू शकतो. मात्र मुलं जसजशी टीनएजर्समध्ये येऊ लागतात त्यांच्याबरोबर आपलं असलेलं नातं, रिलेशनशिपमधलं सहजपण हरवून जातं, गुंतागुंतीला सुरुवात होते. आपल्या नात्यात गॅप पडत जातो. मुलांना वाटतं आपल्या आई-वडिलांनी आपल्या भावना समजून घ्याव्यात. त्यांच्या अपेक्षा आपल्या पालकांकडून अशा असतात की,

१. त्यांना फक्त उपाय नको असतात, तर त्यांनाही घरात किंमत मिळावी असं त्यांना वाटतं. पालक खूप लवकर एखादा प्रश्न सोडवावा या हेतूने परिस्थितीत उडी घेतात. जेणेकरून मुलांचा मार्ग सुरळीत व्हावा. मुलांनी आपल्याला त्यांची अडचण सांगितली, प्रॉब्लेम मांडला की, आपण तत्काळ उपाय देतो. दरवेळेला मुलांना त्यातून बाहेर पडण्याचा मार्गच हवा असतो असं नाही, तर कधीकधी मुलांची फक्त एवढीच अपेक्षा असते की, पालकांनी आमचं म्हणणं ऐकून घ्यावं, आमच्या बोलण्याला किंमत द्यावी. तुम्ही त्यांच्या प्रत्येक गोष्टीला, निर्णयाला मान्यता द्यावी, समर्थन करावं असं नाही. त्यांची एवढीच अपेक्षा असते की, आपल्या भावना खऱ्या आहेत, त्यांनाही महत्त्व आहे हे पालकांनी समजून घ्यावं. अशावेळी आपण असं म्हणून मुलांचं मन सांभाळू शकतो की, जे झालंय ते खरंच खूप कठीण आहे तुझ्यासाठी आणि मला कळतंय की तू नाराज का आहेस? आपण त्यांना आपल्या भावना ओळखून त्या समजून घ्यायला वेळ देऊ या. सोल्युशन्स नक्कीच मिळतील. पण खरी सहानुभूती ही उत्तम संवादासाठीची पार्श्वभूमी तयार करायला उपयोगी ठरते. जेव्हा मुलांच्या भावनांना किंमत दिली जाते, मूल्य समजून घेतलं जातं तेव्हा मुलं आपलं मन मोकळं करायला सुरुवात करतात, मिटून जात नाहीत.

२. मुलांची अपेक्षा असते की, आम्हाला स्वातंत्र्य मिळावं. खरं म्हणजे ही त्यांच्या आयुष्याची पहिली पायरी असते. त्यांच्याकडे बंडखोर मुलं म्हणून पाहू नका. वरवर पाहता असं वाटतं की, टीनएजर्सना आपल्याला स्वातंत्र्य मिळावं अशी इच्छा असते. मात्र पालकांना ती इच्छा जबरदस्तीने आपल्या अपेक्षा पूर्ण करण्याकडे ढकलणारी वाटते पण तसं नसतं. प्रत्यक्षात ते स्वतःची आयडेंटिटी, स्वओळख तयार करत असतात. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायचे असतात. मुलं जेव्हा स्वतःचे चॉईसेस घेतात तेव्हा ते अनुभवातून सेल्फ रिलायन्स शिकतात. ते आत्मनिर्भर होतात. त्यांचा आत्मविश्वास वाढतो.
त्यांची काळजी घेणारे पालक म्हणून त्यांना हॅन्डल केलंत, तर मुलं त्यांच्या वाढणाऱ्या जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडताना दिसतात. यातूनच ते स्वतःचा शोध घेत असतात. मुलांना या गोष्टी करण्यासाठी, स्वतःचा विकास करण्यासाठी आपण पुरेशी संधी दिली, तर आपलं नातं अधिक दृढ होईल. कारण मुलं असं समजतात की, आपल्यातील क्षमता आपले पालक जाणतात. तेच आपल्यातील क्षमतांना ओळखू शकतात.

३. त्यांना सृजनशीलतेची आस असते. परफेक्शनपेक्षा मुलांना ते जास्त महत्त्वाचं वाटतं. या वयातील मुलांच्या व्यक्तिमत्त्वात तुम्हाला कपट, ढोंग शोधूनही सापडत नाही. मोठी माणसं जेव्हा गोड बोलून मुलांना भुलवतात, भासवतात की त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा ते अक्षरशः हैराण होतात. मुलांना तुम्ही परफेक्ट पालक म्हणून असण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्यातील चढ-उतार कसे हाताळता, त्यांना कसे सामोरे जाता हे पाहून त्यांना जास्त फायदा मिळू शकतो.
सगळ्याच प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे नसणार. हे तुम्ही मान्य करता आणि आयुष्य जगता. मुलं हे बघतात आणि त्यांना हे साम्य जाणवते की, आपले पालकही आपल्यासारखेच मनुष्यप्राणी आहेत. या आपापसातील सामंजस्यामुळे पालक आणि मुलं यांच्यामधील संवाद अधिक रुजत जातो, फुलतच जातो. कारण तुम्ही मुलांबाबत मुल्यमापनात्मक न होता त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घ्याल असं त्यांना वाटतं. आपल्या अडचणी, दोष पालकांसमोर सांगू शकतो, इथे सांगणं सुरक्षित आहे असं मग त्यांना मनापासून वाटतं.

४. त्यांच्या रोजच्या आयुष्याइतकंच त्यांचं ऑनलाइन जगही महत्त्वाचं असतं. हे पालकांनी समजून घ्यावं, ही मुलांची अपेक्षा असते. मुलांच्या दृष्टीने ऑनलाइन जग हे महत्त्वाचे असल्याने त्याबद्दल एकदम निगेटिव्ह न बोलता किंवा ते तर एक नुसतं गेम वर्ल्ड आहे असं न म्हणता रील वर्ल्ड आणि रियल वर्ल्ड हे वेगवेगळं आहे असं म्हणून कमीत-कमी शब्दांत नाराजी व्यक्त करता येईल. कारण काही वेळेला हळूवार, संवेदनशील टीनएजर्स मुले-मुली यात इतके गुंतून जातात की, काही भावनिक प्रसंग पडद्यावर पाहताना त्यांचं मन खरंच दुखावलं जातं. शिवाय जर त्यांच्या मित्रांनी त्यांना ‘अनफॉलो’ केलं तरी ती बाब त्यांच्यासाठी क्षुल्लक नाहीतर खूप महत्त्वाची असते. हे ‘सोशल रिजेक्शन’ मुलं सोसू शकत नाहीत. मुलं ऑनलाईन असोत की, ऑफलाईन मुलांची स्वतःची मान्यता, मूल्य, किंमत, अस्तित्व, सेल्फवर्थ ही मोठ्या प्रमाणात त्यांचा पीअर ग्रुप काय प्रतिसाद देतो यावर अवलंबून असते. अर्थातच म्हणून तुम्ही मुलांना अनलिमिटेड स्क्रीनटाईम द्यावा असं नाही; परंतु त्यांचा अवास्तव अनुभव जो बहुतेक वेळा डिजिटल माध्यमातील असतो तरीही तोही महत्त्वाचा आहे हे पालकांनी समजून घ्यावं असं मुलांना वाटतं आणि यामुळे तुम्हाला त्यांना मार्गदर्शन करण्यात मदतच होत असते हेही तितकेच खरे आहे.
त्यांना ऑनलाईन किंवा आभासी जगापासून पूर्णपणे तोडून टाकण्यापेक्षा तुम्ही योग्य मर्यादा घालून मुलांना डिजिटल माध्यमं वापरण्याच्या जबाबदार सवयी लावू शकता उदाः मधून मधून ब्रेक घेणं किंवा स्क्रीन वापरणं कधी थांबवायचं, कुठे आणि कसा कंट्रोल करायचा हे समजून घेणं या गोष्टी आपल्याला मुलांकडून करून घ्याव्या लागतील.

५. टीनएजर्स आणि त्यांचे पालक यांच्या नात्यात आणि संवादात अडथळे येतात. अनपेक्षित अडचणी आणि समस्या येतात. टीनएजर्समधील मुलं शांत बसतात किंवा नुसतं हां, हं, हम्म, ओ. के, बरं, हो, नाही असं अगदी कमीत कमी बोलतात. जणू काही पालकांनी त्यांच्या मनातलं ओळखावं अशी परिस्थिती निर्माण होते. मुलं काही बोलायला लागली आणि पालक त्यांना बोलू न देता चूक, बरोबर सांगायला लागले, अडथळे निर्माण करायला लागले तर मुलांचं बोलणं बंद होतं. याऐवजी आपण असं म्हणू शकतो की ‘तुला जर काही सांगायचं असेल, बोलायचं असेल तर मी आहे’ आणि खरंच मग मुलांना तुमच्याशी बोलावसं वाटतं. त्यांना स्पेस मिळते. एकप्रकारे मुलांच्या मतांना, त्यांच्या म्हणण्याला आदर दिला जातो असं मुलांना वाटायला लागतं. मुलांचं नकारात्मक वागणं, ती भावना थोड्या प्रमाणात का होईना कमी होत जाते. या वयातील मुलांच्या मनात त्यांच्या भविष्याबद्दल बऱ्याच गुंतागुंतीच्या भावना असतात. याबद्दल शेअर करताना त्यांना अशी व्यक्ती हवी असते जी कोणत्याही प्रकारच्या निष्कर्षावर उडी न मारता एका उत्तम श्रोत्याची भूमिका निभावेल. या संवादात पालकांना खूप संयम ठेवावा लागतो. ठाऊक आहे की हे कठीण काम आहे पण त्याचा फायदाही होत असतो.

६. ‘विश्वास’ हा दोन्ही बाजूंनी ठेवावा लागतो. थोडक्यात पालकांनी मुलांवर विश्वास ठेवला, तर मुलंही तुम्हाला विश्वासार्ह वाटतील. तुमच्यात आणि तुमच्या टीनएजर्स मुलांमध्ये जी दरी निर्माण होते, त्याला कारणीभूत असतो अविश्वास म्हणूनच संवादाचा पूल बांधण्यासाठी ‘विश्वास’ उपयोगी ठरतो. तुम्ही मुलांवर विश्वास ठेवावा ही मुलांची अपेक्षा असते. ‘विश्वास’ ठेवायला तुम्ही कचरता ते मुलांच्या सुरक्षिततेच्या इच्छेने. मुलं कुठल्याही अडचणीत सापडू नयेत म्हणून तुम्ही विश्वास ठेवायला तयार नसता. पण जर तुमच्या टीनएजर्स मुलांवर तुम्ही सतत लक्ष ठेवत असाल, चुकले की त्यांना पकडत असाल किंवा वारंवार आपले पालक आपल्यावर ‘हेलिकॉप्टरसारखे’ गिरक्या घालत असतात असं त्यांना वाटत असेल, तर ते चांगल्या गोष्टींबाबतसुद्धा तुमच्याशी बोलणार नाहीत. योग्य मर्यादा आखून, मुलांची प्रायव्हसी जपून, मुलांचा आदर राखून पालक आणि मुलं यांच्यात विश्वासाचा पूल तयार होऊ शकतो. जर तुम्ही असं म्हणत असाल की, त्यांच्यावर जी बंदी तुम्ही घालता ती त्यांनी सहन करावी, त्यांचा ठावठिकाणा, थांगपत्ता याबद्दल तुम्हाला माहिती द्यावी. तुम्ही त्यांना सतत मायक्रोमॅनेज करत असाल. त्यांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवून असाल, सगळी बारीकसारीक माहिती मिळवत असाल, तर मग मुलांचं नाराज होणं स्वाभाविकच आहे. त्यातूनच मग मुलं खोटं बोलायला लागतात. माहिती, मित्रपरिवार याबद्दल बोलणं टाळतात, दडवून ठेवतात. आपण काही प्रतिक्रिया दिली, तर त्याचे परिणाम होतील याची मुलांना जाणीव होते मग ते गप्पच राहणं पसंत करतात.

कुमारावस्थेतील मुलांचं पालकत्व निभावणं म्हणजे नकाशा न वापरता टीनएजर्सचा चक्रव्यूह भेदायचा असतो. या वयातील मुलं स्वतःच अस्तित्व, आयडेंटिटी ओळखायची धडपड करत असतात. स्वतःच्या मर्यादा आखण्याचा प्रयत्न करतात. त्यातूनच त्यांच्या मनातील भावनांची आंदोलने, त्यांचे चढ-उतार होत असतात. त्यांच्या म्हणण्याला महत्त्व देऊन, त्यांच्या वाढत्या स्वातंत्र्याचा आदर करून, बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर देऊन आपणही त्यांच्या या प्रवासात त्यांच्यासोबत आहोत हे त्यांना दाखवायला हवे. काही वेळेला खरोखरच आपल्याकडे सगळ्या गोष्टींची उत्तरं नसतात हे आपल्याला मान्य करायला हवे. हे जर मुलांशी तुम्ही बोलत राहिलात, तर मुलं तुमच्याकडे परत येण्याचा मार्ग तयार होतो. तुम्ही तो मार्ग जोपासत आहात हे लक्षात घ्या. टीनएजर्स मुलं ही अंडर कन्स्ट्रक्शन अवस्थेत असतात. म्हणूनच आपण आपलं फस्ट्रेशन त्यांच्यावर न काढता संयम आणि सहानुभूतीने त्यांच्याशी वागलो, तर हे नातं समजुतीचं होईल. अखेरीस टीनएजर्स मुलं आपण कोण आहात याचाच फक्त शोध घेत नसतात, तर जगातील परिस्थितीशी जुळवून घेणं यासाठीही प्रयत्न करत असतात हे आपण पालकांनी लक्षात ठेवायला हवं. थोडेसे सजग राहून प्रयत्न केला तर, आपण त्यांना किती छान गाईड केलं हे त्यांना मोठं झाल्यावर कळेल. जेव्हा मुलं मागे वळून आपल्या बदलाची वर्षे आठवतील तेव्हा त्यांना नक्कीच मनाशी वाटेल की, आपल्या आई-वडिलांनी खूप संयमाने, समजुतीने आणि विश्वासाने आपल्याला वागवले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -