श्रीनिवास बेलसरे
चित्रपटसृष्टीतील जुन्या कलाकारांनी, विशेषत: गीतकारांनी, सगळ्या नात्यांना किती सुंदरपणे प्रेक्षकांसमोर आणले ते पाहिले की कौतुक वाटते. अर्थात त्यासाठी जुने सिनेमा पाहायला, जुनी गाणी ऐकायला हवीत. आईवडील-मुले, काका-पुतणे, मामा-भाचे, आजोबाआजी-नातू, प्रियकर-प्रेयसी, मित्र-मैत्रीण इतकेच काय शत्रूच्या नात्यावरही सुंदर सिनेगीते आहेत.
मात्र सर्वांनाच तशा रसरसलेल्या नात्यांचे सुख मिळते असे नाही. काही मुले जन्मतात ती अनाथ म्हणून! कारण बाळंतपणात त्यांच्या मातेचे निधन झालेले असते. इतरांकडे बघून त्या अनाथ मुलांनाही आपली आई कशी होती ते जाणून घ्यायची उत्सुकता असते. त्यावरच मराठीत एक सुंदर गाणे होते. चित्रपट होता १९६१चा ‘एक धागा सुखाचा’. कलाकार मराठीतले एके काळचे दिग्गज-रमेश देव, नलिनी सराफ (नंतरची सीमा देव), उषा किरण, दामूअण्णा मालवणकर, शरद तळवलकर, धुमाळ, मधू आपटे, शांता बेडेकर, हनी इराणी, राम टिपणीस इ. दिग्दर्शक होते दत्ता धर्माधिकारी, संगीतकार राम कदम आणि गीतकार मधुकर जोशी व मधुसूदन कालेलकर. अनंतची(रमेश देव) पहिली पत्नी मालती (उषा किरण) बाळंतपणानंतर मरण पावते. त्यामुळे जन्माला आलेल्या ‘संजय’वर (मुलावर) अनंतचा आधीपासून राग असतो. मरताना मालतीने बाळाला आई असावी म्हणून दुसरे लग्न करा अशी पतीला विनंती केलेली असते. जवळजवळ ५ वर्षांनंतर त्याच्या प्रेमात हेमा (सीमा) पडते आणि ते लग्नाचा विचार करू लागतात. त्यावेळी पोलिओग्रस्त संजयची (मुलाची) उपस्थिती रमेश देवला अडथळा वाटल्याने तो आपल्याला मुलगा आहे हे तिला सांगत नाही. जेव्हा ते तिला कळते तेव्हा त्यांच्यात बेबनाव निर्माण होतो. त्यामुळे अनंत मुलाच्या इच्छेविरुद्ध त्याला अनाथाश्रमात ठेवतो. तशात हेमाही त्याला मुलावरून सोडून गेल्याने पहिल्या पत्नीची आठवण येते. तो अंतर्मुख होतो.
अनंता मुलाशी कठोर वागल्यामुळे त्याचा प्रेमळ नोकरही त्याला सोडून जातो. जाताना तो अनंताला चार शब्द सुनावतो. पश्चाताप होऊन अनंत मुलाला परत घरी आणतो. पुन्हा त्याचे हेमाशी भांडण होते. वडिलांना आपल्यामुळे अजून त्रास नको म्हणून बिचारा संजय स्वत:च घर सोडून जातो. घाईघाईत लंगडत जात असताना अपघात होताहोता तो वाचतो. हेमाचे मन ते सगळे बघून द्रवते. पश्चाताप होऊन ती त्याचा स्वीकार करते अशी ही सुखांत कथा! या सिनेमाची बरीच गाणी लोकप्रिय झाली. त्यात मधुसूदन कालेलकरांच्या मन्ना डे यांनी गायलेल्या, त्याकाळी अतिशय लोकप्रिय झालेल्या-
“अ अ आई, म म मका,
मी तुझा मामा दे मला मुका”
या गाण्याबरोबरच मधुकर जोशींनी लिहिलेली आणि आशाताईंनी गायलेली-
“थंडगार ही हवा, त्यात धुंद गारवा,
अशा सुरेख संगमी, जवळ तू मला हवा.”
आणि
“मी लता, तू कल्पतरू.
संसार आपला सुखी करू.”
या गाण्यांचा समावेश होता. राम कदमांचे संगीत अप्रतिम होते. सिनेमात एक अतिशय भावूक प्रसंग होता. संजय वडिलांची वाट पाहत घराबाहेर उभा असतो. रात्र होते तरी ते येत नाहीत. तेवढ्यात ज्या काहीशा वेडसर भिकाऱ्याला दिवंगत मालती प्रेमाने भिक्षा वाढायची तो येऊन संजयशी बोलू लागतो. बोलायला कुणीच नसल्याने संजयही त्याच्याशी आईबद्दल बोलू लागतो. ‘माझी आई कशी होती ते तुला ठाऊक आहे का?’ असे विचारताना म्हणतो ‘मी तिला कधीच पाहिले नाही तू तर नक्की पाहिले असशील ना!’
ज्यांची आई जन्म देताच किंवा बालपणी निवर्तल्याने त्यांना आठवतही नसते केवळ अशा दुर्दैवी व्यक्तींनाच हे गाणे हेलावून टाकते असे नाही. सर्वांनाच गलबलून यावे असा तो अनुभव असतो. कारण आईच्या नात्याची तुलना इतर कोणत्याच नात्याशी होऊ शकत नाही आणि तीच नसणे यासारखे दु:ख नाही. दारिद्र्य नाही. कोणत्याही स्वार्थाशिवाय फक्त आईच प्रेम करू शकते. बाकी सर्व नात्यांना कोणत्या ना कोणत्या हितसंबंधांची किनार असतेच. कालेलकरांनी लिहिलेल्या आणि वसुमती दोंदे व स्नेहल भाटकरांनी गायलेल्या त्या हळव्या गाण्याचे शब्द होते –
“ठाऊक नाही मज काही,
ठाऊक आहे का तुज काही?
कशी होती रे माझी आई?”
छोट्या संजयची अवस्था खरच दयनीय आहे. त्याला आई आठवत नाही आणि वडील त्याचा जन्मापासून तिरस्कार करतात. म्हणून निदान आईचे तरी माझ्यावर प्रेम असावे अशी त्याला आशा आहे. ते जाणून घ्यायची उत्सुकता आहे. तेही त्याला विचारावे लागते ते दारावर येणाऱ्या भिकाऱ्याला! पण त्यातूनही कालेलकरांनी त्या प्रसंगावरही हृदयाला भिडणारे गाणे तयार केले होते. संजय विचारतो –
“मऊ जशी ती साय दुधाची,
होती आई का तशी मायेची.
बागेतील ते कमल मनोहर,
आई होती का तशीच सुंदर?
देवाघरी का एकटी जाई,
ठाऊक आहे का तुज काही?
कशी होती रे माझी आई…”
त्याकाळी समाजात आजच्यासारखी वास्तवाची जाण, चतुरपणा, भावनेचा कोरडेपणा आलेला नव्हता. माणूस खूप भावनाप्रधान, भाबडा, होता. त्यामुळे लहान मुलांना घरात कुणाचा मृत्यू झाला, तर सांगितले जायचे ‘तो देवाघरी गेला.’ त्या निरागस जीवांना ते खरेही वाटायचे. म्हणून संजयला वाटते माझी आई देवाघरी जाताना मला घेऊन का गेली नाही, मला एकटे टाकून का गेली? या वाक्याची भेदकता प्रेक्षकाला हळवे करते. संजयच्या बालमनात येणाऱ्या मोजमापातूनच तो आईची कल्पना करतो. तसेच प्रश्न तो त्या भिकाऱ्याला विचारतो –
चिऊ-काऊची कथा चिमुकली,
सांगत होती का ती सगळी.
आम्हांसारखे शुभंकरोती,
म्हणे रोज का देवापुढती?
गात असे का ती अंगाई,
ठाऊक आहे का तुज काही?
कशी होती रे माझी आई?
पुढचे कडवे स्नेहल भाटकर यांच्या आवाजात आहे. आता भिकारी वत्सलतेने संजयला आईची महती सांगतो. त्याला समजवताना तो स्वत:चेही दु:ख सांगून जातो की त्यालाही आई नाही –
“मऊ सायीहून आई प्रेमळ,
गंगेहून ती आहे निर्मळ.
अमृताचे घास भरविते,
आभाळापरी माया करीते.
आईवाचून मीही विरही,
ठाऊक आहे का तुज काही…
कशी होती रे माझी आई…”
शेवटी आईचे जाणे म्हणजे माणसाचे भावविश्व किती पोकळ करणारा अनुभव असतो! पण प्रत्येकाला तो कधीतरी घ्यावाच लागतो. म्हणून ही गाणी!