पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. पण नव्या अध्यक्षालाही पक्षाला लागलेली गळती थांबवणे जमलेले नाही. पुणे जिल्ह्यातील भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे पक्षातील सर्व पदांचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. याआधी माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचा राजीनामा देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश केला. आता महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे-पाटील यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.
Dhananjay Munde : धक्कादायक, आमदार धनंजय मुंडेंना झाला ‘हा’ आजार
भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे रविवार २० एप्रिल रोजी मतदारसंघात एक मेळावा घेत आहेत. या मेळ्यात ते स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याशी संवाद साधणार आहेत. याच मेळाव्यात संग्राम थोपटे त्यांची पुढील राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे समजते.
भोर मतदारसंघावर थोपटेंचे वर्चस्व
राजकीय इतिहासातील नोंदी बघितल्या तर १९७२ ते २०२४ या ५२ वर्षांपैकी ४५ वर्षे भोर मतदारसंघाची आमदारकी थोपटेंच्या घरात दिसते. संग्राम थोपटेंचे वडील अनंतराव थोपटे १९७२ मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी अपक्ष लढत बाजी मारली. नंतर १९७८ ते १९८० या कालावधीत भोरचं प्रतिनिधीत्व संपतराव जेधे यांनी केलं. यानंतर १९८० ते १९९९ अशी सलग १९ वर्षे अनंतराव थोपटे यांनी काँग्रेसकडून लढत विजय मिळवला.
शरद पवारांनी १९९९ मध्ये काँग्रेस सोडली. सोनिया गांधींच्या विदेशी असण्याला विरोध करत ते बाहेर पडले. यानंतर १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत सोनिया गांधींनी महाराष्ट्रातील काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ भोरमध्येच केला. त्यांनी थोपटेंचा प्रचार केला. शरद पवार समर्थक काशिनाथ खुंटवड यांनी निवडणूक जिंकली. पण ही निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवारांना खुंटवड यांच्या मागे मोठी ताकद लावावी लागली होती. अनंतराव थोपटे २००४ मध्ये पुन्हा निवडून आले होते. नंतर २००९ मध्ये अनंतरावांचे पुत्र संग्राम थोपटे विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. यानंतर ते २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतही विजयी झाले होते.
उद्धव यांनी भाजपासोबतची युती तोडून मविआसोबत जाण्याचा निर्णय घेतला. राज्यात उद्धव सरकार आले. काँग्रेसचे नाना पटोले विधानसभेचे अध्यक्ष झाले. काही काळाने नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर संग्राम थोपटे विधानसभेचे अध्यक्ष होतील अशी चर्चा होती. पण ही चर्चा फक्त चर्चाच राहिली. थोपटे विधानसभेचे अध्यक्ष होऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रयत्न केल्याची चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात रंगली होती.
Thackeray : उद्धव – राज ठाकरेंचा जुना खेळ नव्यानं सुरू, ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा
अनंतराव थोपटे यांच्या राजकीय प्रगतीत शरद पवारांनी अडचणी निर्माण केल्या तर संग्राम थोपटेंपुढे अजित पवारांचेच आव्हान आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शंकर मांडेकर यांनी संग्राम थोपटेंचा २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला.
लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार विरुद्ध पवार असा संघर्ष झाला. शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवारांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. त्यावेळी संग्राम थोपटे काँग्रेसचे आमदार होते. निवडणूक जिंकण्यासाठी शरद पवार जुने राजकीय हेवेदावे विसरुन संग्राम थोपटेंच्या घरी गेले होते. अजित पवारांसोबत असलेल्या संघर्षामुळे संग्राम थोपटे यांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंसाठी काम केले.संग्राम थोपटेंमुळे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भोर विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंना आघाडी मिळाली होती. सुनेत्रा अजित पवार यांच्या पराभवाला संग्राम थोपटे हे एक महत्त्वाचे कारण ठरले होते. आता संग्राम थोपटे भाजपाच्या वाटेवर आहेत. अजित पवारांच्या बालेकिल्ल्यातील मोठा नेता हेरुन भाजपने पुढच्या विधानसभेत शतप्रतिशतसाठी तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.