Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलजळो - बिघडो... कधीतरी, काहीतरी चांगले घडो!

जळो – बिघडो… कधीतरी, काहीतरी चांगले घडो!

प्रा. प्रतिभा सराफ

मी तुम्हाला सुरुवातीलाच एक प्रश्न विचारणार आहे. हो, हा प्रश्न स्त्री असो वा पुरुष सर्वांसाठीच आहे. प्रत्येक माणसाने अनेकदा अनेक पदार्थ करण्याचा प्रयत्न करून पाहिलेला असतो त्यानंतर तो कदाचित सवयीचा भाग होतो आणि चांगलाही बनतो; परंतु सुरुवातीला पदार्थ बनवताना हमखास बिघडतात, याचा अनुभव तुम्हाला आलाय का? तसे प्रत्येकालाच वाटते की आपण खूप उत्कृष्ट स्वयंपाकी आहोत म्हणून… मला नक्की बोलवा जेवायला म्हणजे मी खात्री करून त्याच्यावर शिक्कामोर्तब करू शकते! माझे नवीनच लग्न झाले होते. तसे काही पदार्थ शिकले होते. त्यापैकी एक सोपा पदार्थ म्हणजे इडल्या. आदल्या दिवशी अगदी प्रमाणात उडदाची डाळ, तांदूळ आणि कोणीतरी दिलेल्या टीपनुसार मेथीदाणासुद्धा टाकून छान वाटून घेतले होते. सकाळी उठल्यावर पाहिले, तर पीठ टम्म फुगले होते. त्या पिठाला पाहून तेव्हा गोबरे असलेले माझे गाल पिठासारखेच आणखी फुलले. रविवारची प्रसन्न सकाळ होती. सासूबाईंचे नातेवाईक त्यादिवशी नाश्त्यासाठी येणार होते. ‘मला येतं’ असे सांगितल्यामुळे सासूबाईंनी इडलीची जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. बाकी सांबर-चटणी वगैरे त्या स्वतःच करणार होत्या. त्या अंघोळीला निघून गेल्या. जाता जाता ‘‘मी डाळ भिजवून ठेवली आहे तेवढी शिजवून ठेव”, म्हणाल्या. मी स्वयंपाकघरात गेले. कामवाली बाई भांडी घासत होती. डाळीचे भांडे गॅसवरच दिसले. पटकन गॅस पेटवला आणि पाहुणे येणार म्हणून घरातली इतर स्वच्छता करण्यासाठी स्वयंपाक घराबाहेर पडले. बाईचे काम झाले. त्याही निघून गेल्या. अचानक सासूबाईंनी आवाज दिला. “अगं कसला धूर झालाय, वास येतोय बघ…” मी पळतच स्वयंपाकघरात शिरले तोपर्यंत सासूबाईंनी डाळीवरचे झाकण बाजूला काढले होते. त्या जितक्या जोरात ओरडल्या त्यापेक्षा जास्त जोरात मीही ओरडले कारण समोरचे दृश्य तसेच होते.

मी डाळीचे पातेले गॅसवर ठेवण्याऐवजी इडलीच्या पिठाचे पातेले गॅसवर ठेवले होते. ते पीठ अर्धवट शिजून खालून व्यवस्थित जळले होते आणि त्याच्यातून धूर आणि वास येत होता. आताचा काळ असता तर पटकन जाऊन इडलीचे पीठ विकत आणले असते; परंतु त्याकाळी इडलीचे पीठ विकत मिळत नव्हते. त्यामुळे इडलीच्या बेताचे तीन तेरा वाजले होते. त्यानंतर या नातेवाईकांसाठी सासूबाईंनी कोणता पदार्थ बनवला हे काही मला खरोखर आठवत नाही. ते पातेले गॅसवर बाईनेच ओटा पुसताना चुकून ठेवले होते की काय? शिवाय झाकण न उघडता मी कसे काय शिजायला ठेवले? हे आता महत्त्वाचे नाही. तर महत्त्वाची सांगायची गोष्ट म्हणजे नवीनच लग्न झाले होते. त्यामुळे तशी पातेली ओळखीची नव्हती. मी ज्या पातेल्यात इडलीचे पीठ तयार केले होते साधारण त्याच आकाराचे ते डाळ भिजवलेले पातेले होते. जे झाले ते झाले आता तुम्हाला वाटले असेल की माझ्याच्याने आयुष्यात परत असे कधी घडले नाही. पण असे नेहमी नेहमीच घडत गेले. आता किती उदाहरणे देणार? अलीकडे तूप छानपैकी काचेच्या बरणीत येते. त्यामुळे ते दिसायला आणि वापरायला छान वाटते. हिवाळ्याचे दिवस होते. तूप संपत आले होते. म्हटले अर्धा मिनिट गॅसवर तुपाची बरणी ठेवूया. गरम झाले की छान ओतून घेता येईल! परंतु पाव मिनिटातच बरणी तडकली. काचा घरात चारी बाजूला उडाल्या. ओट्याच्या टाइल्स, फ्रिज, मिक्सर जमीन काचांनी भरले. त्या काचा उचलणे एकीकडे चालू असताना लक्षात आले की, इकडून तिकडे जाताना पाय घसरतोय कारण जिकडेतिकडे तूप उडालेले होते.

दूध उतू जाणे हे तर नेहमीचेच. बाकी भाजी जळणे, पोळी करपणे, दूध विरजण लावल्यावर विसरून जाणे, आदल्या दिवशी खरेदी केलेली पनीर तसेच पर्समध्ये राहणे, लग्नाच्या हॉलमध्ये शिरताना दिलेला पेढा एक महिनानंतर पर्समध्ये सापडणे, निवडून साफ केलेली कोथिंबीर कचऱ्याच्या बादलीत टाकणे आणि कोथिंबिरीच्या फेकून द्यायच्या काड्या गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवणे, नेमके पाहुणे यायच्या दिवशी बासमती तांदळाची खिचडी होणे आणि एखाद्या संध्याकाळी मऊशार खिचडी खायचा मूड आल्यावर नेमकी भाताची शित शित मोकळे झालेली खिचडी तयार होणे. चहा ऊतू जाऊन जळल्यामुळे तर वर्ष दोन वर्षांतून मला चहाचे पातेले बदलावेच लागते. आणखी किती स्वतःची बदनामी करू? जाऊ द्या.
आज मायक्रोवेव्हमध्ये कालचा एक मेथीचा थेपला ठेवला तर तो मस्त कोरडा झाला. त्याचा खाकरा झाला. हातात घेतला आणि वाटले अजून अर्धा मिनिट ठेवूया जास्त कुरकुरीत होईल. अर्ध्या मिनिटानंतर तो जळून राख झालेला होता. मग लगेच हा लेख लिहायला बसले.

…तर आपण आपल्या आयुष्यात राखरांगोळी केलेले पदार्थ, नेमके पाहुणे आणि नातेवाईक यांच्यासाठी अती मेहनतीने केलेल्या पदार्थांची लागलेली वाट, प्रचंड घाईत असताना मिक्सरमधून स्वयंपाक घरभर उडालेला मसाला हा लेख वाचताना आपल्याला आठवल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा स्वतःलाच किती दोष द्यायचा? आपल्यासारखे सगळे आहेत, असा छान विचार करायचा आणि नवीन पदार्थ बनवायला घ्यायचा! तसाही आज रविवार आहे, तर रविवार स्पेशल…? कधीतरी, काहीतरी चांगले घडून येतेच ना!
pratibha.saraph@ gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -