मुंबई : मुंबईतील सर्व टोल नाक्यांवरून छोट्या वाहनांना टोलमुक्ती मिळाल्यानंतर आता मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून धावणाऱ्या सर्व इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी मिळणार आहे. १ मे २०२५ पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता असून सरकारकडून ‘महाराष्ट्र दिनाची’ भेट ठरणार आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी सरकारने सरकारी वाहने इलेक्ट्रिक करण्याचे धोरण स्वीकारले आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी एक व्यापक इलेक्ट्रिक वाहन धोरण सरकार राबवत आहे. ‘ईव्ही’चा वापर वाढविण्यासाठी प्रोत्साहने, पायाभूत सुविधा विकास व नियामक उपाय योजनांचा समावेश आहे.
देशभरात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीने गती घेतली असली तरीही वाहन विक्रीपैकी ६-७ टक्के इलेक्ट्रिक वाहने आहेत. त्यामध्ये दिल्ली (१२ टक्के), कर्नाटक (९-१० टक्के) व तामिळनाडू (८ टक्के) या राज्यांनी पायाभूत सुविधांच्या विकासाच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहनांच्या अधिक प्रमाणावरील स्वीकारार्हतेला चालना दिली आहे.