मुंबई : उन्हाळ्याच्या सुटीत मुंबईकरांना जलतरणाचे अर्थात पोहण्याचे प्रशिक्षण घेता यावे यासाठी मुंबई महानगरपालिकेने पोहण्याचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले आहे. या उत्तम व्यायाम प्रकाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी नव्याने सभासद नोंदणीची सुविधाही सुरू केली आहे. दादर आणि चेंबूर वगळता इतर ९ जलतरण तलावांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याची नोंदणी २१ एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. तर दादर (प) येथील महात्मा गांधी स्मारक ऑलिम्पिक जलतरण तलाव आणि चेंबूर (पू) येथील जनरल अरुणकुमार वैद्य ऑलिम्पिक जलतरण तलाव या दोन्ही जलतरण तलावांवर उन्हाळी सुट्टी दरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी २१ दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरू करण्यात येणार आहे. येत्या २ मे २०२५ पासून २१ दिवसांचे प्रशिक्षण सुरू करण्यात येणार आहे.
मुंबईत महानगरपालिकेचे ११ तरण तलाव कार्यरत आहेत. मात्र, अनेकदा पोहण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण न मिळाल्याने अनेक इच्छुक या क्रीडा प्रकारापासून लांब राहतात. पोहणे शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना मुंबई महानगरपालिकेने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.
महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात येत असलेल्या या प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, २१ एप्रिल २०२५ पासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती उप आयुक्त (उद्याने) अजित आंबी यांनी दिली आहे. या दोन्ही जलतरण तलावात प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे.
तर याच प्रशिक्षणाच्या दुसऱ्या कालावधीचा प्रारंभ २३ मे २०२५ पासून होणार आहे. प्रशिक्षणासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. त्यासाठीची लिंक सोमवार, २१ एप्रिल २०२५ सकाळी ११ वाजेपासून कार्यान्वित होणार आहे. तसेच इतर जलतरण तलावांवर मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा नव्याने उपलब्ध होणार आहे.
असे आकारले जाणार शुल्क
पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठी २ हजार २१० रूपये,
१६ ते ६० वयोगटातील नागरिकांसाठी ३ हजार ३१० रूपये
दादर आणि चेंबूर येथील दोन्ही जलतरण तलावांमध्ये दररोज तीन सत्रांमध्ये प्रशिक्षण
दुपारी १२.३० ते १.३०, दुपारी २ ते ३.३०, दुपारी ३.३० ते ४.३०
प्रशिक्षणाची करा नोंदणी
प्रशिक्षणाच्या नोंदणीसाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
दादर आणि चेंबूर वगळता ९ जलतरण तलावांमध्ये मासिक आणि त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा
दादर आणि चेंबूर वगळता इतर ९ जलतरण तलावांमध्ये नागरिकांच्या सुविधेसाठी मासिक, त्रैमासिक सभासदत्वाची सुविधा सुरू करण्यात येत आहे. त्याची नोंदणी २१ एप्रिल २०२५ पासून सुरू करण्यात येणार आहे. सदर विशेष उन्हाळी सत्राची सभासद नोंदणी फक्त ऑनलाईन पध्द्तीनेच होणार आहे. सभासदत्वासाठी https://swimmingpool.mcgm.gov.in/ या लिंकचा उपयोग करावा. सभासद नोंदणीच्या चौकशीसाठी १८००१२३३०६० या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
या तलावांमध्ये मासिक, त्रैमासिक सभादत्वाची सुविधा
कांदिवली (पश्चिम) येथील सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव
दहिसर (पश्चिम) येथील श्री भावदेवी कांदरवाडा जलतरण तलाव
दहिसर (पूर्व) येथील श्री मुरबाळीदेवी जलतरण तलाव
मालाड (पश्चिम) येथील मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
गिल्बनर्ट हिल, अंधेरी (पश्चिम) येथील मुंबईत महानगरपालिका जलतरण तलाव
अंधेरी (पूर्व) येथील मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
वरळी येथील मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
विक्रोळी (पूर्व) येथील बृहन्मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव
वडाळा येथील मुंबई महानगरपालिका जलतरण तलाव