महाराष्ट्राला विकासाच्या शिखरावर नेणे हाच पक्षाचा संकल्प – मुख्यमंत्री

Share

मुंबई : भारतीय जनता पार्टीची वाटचाल तेजस्वी आहे, आपल्या सरकारच्या कारकिर्दीत सुरू असलेला विकासाचा आलेख उंचावता आहे, पण एवढ्यावरच न थांबता आणखी खूप काही आपल्याला करायचे आहे. सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवून आणून परिवर्तनाचा पाया रचणारे एक गतिशील, पारदर्शी, प्रामाणिक सरकार देण्यासाठी आपले सरकार सातत्याने प्रयत्नशील असून शंभर दिवसांच्या कारभारातून आपण हा संदेश देऊ शकलो आहोत. महाराष्ट्राला सर्वोच्च स्थानी नेल्याखेरीज हे सरकार थांबणार नाही ही ग्वाही मी देतो, पण या गतिमान वाटचालीत पक्षाच्या कार्यकर्त्यानी जनता आणि सरकार यांमधील समन्वयाचा व संवादाचा सेतू होऊन काम केले पाहिजे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आपल्याला असाच प्रचंड विजय मिळवायचा असून, भारतीय जनता पार्टी ही सामान्यांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्याकरिता महाराष्ट्रात सातत्याने निवडून येत राहील, याकरिता आपला पाया मजबूत करून सामान्य माणसाचा विचारच मनात राहील असा संकल्प करू, आणि या महान पक्षाला अधिक महानता प्राप्त करून देण्याासाठी अधिकाधिक योगदान देण्याचा संकल्प स्थापना दिनानिमित्त सर्वांनी करू या, असा महत्वपूर्ण संदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी महाराष्ट्रातील भाजपा कार्यकर्त्यांना दिला. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जनसंघ ते भाजपा या वाटचालीतील तेजस्वी टप्प्यांचा अतिशय समर्पक आढावा घेतला. पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशीष शेलार, राज्य मंत्रिमंडळातील भाजपाचे सर्व मंत्री, पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते या संमेलनास उपस्थित होते.

अयोध्येत रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर राम नवमीच्या दिवशी पक्षाचा स्थापना दिवस साजरा व्हावा हा एक विलक्षण योगायोग नव्हे, तर एक प्रकारचा ईश्वरी संकेत असून ज्या रामराज्याच्या स्थापनेकरिता आपण सगळे प्रयत्नरत आहोत, त्या रामराज्याची आपली वाटचाल सुरू झाली असल्यानेच आज राम नवमीच्या निमित्ताने आपला स्थापना दिवस साजरा करत आहोत, असा उल्लेख करून श्री. फडणवीस यांनी सुरुवातीसच पक्षाच्या सुशासन संकल्पाचे स्मरण केले. महाराष्ट्रात पक्षाचे दीड कोटी सदस्य नोंदविण्याचा संकल्प आपण वेगाने पूर्ण केला असून या दीड कोटी सदस्यांमुळे जगाच्या पाठीवरील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून भाजपा स्थापित झाला आहे, अशा शब्दांत आनंद व्यक्त करून फडणवीस यांनी महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. ही सदस्य नोंदणी अत्यंत शास्त्रीय पद्धतीने केलेली असल्यामुळे प्रामाणिक व पारदर्शक ठरली आहे, असे त्यांनी आवर्जून नमूद केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेली विकासाची वाटचाल आज सारे जग अचंबित होऊन पाहात आहे, असे सांगून श्री. फडणवीस यांनी या ऐतिहासिक वाटचालीचा आढावा घेतला. 1952 मध्ये जनसंघाच्या स्थापनेपासून ‘राष्ट्र प्रथम’ हा संस्कार मिळाल्याने संघ विचाराने प्रेरित असलेल्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांनी लोकशाही व संविधानाच्या संरक्षणाकरिता कित्येक महिने तुरुंगवास भोगला. पुढे लोकशाहीच्या रक्षणाकरिता आपले अस्तित्व जनता पक्षात विलीन केले, दुर्दैवाने कम्युनिस्ट व अन्य पक्षांच्याा विचारसरणीमुळे जनता पक्ष फुटला व 1980 मध्ये आजच्या दिवशी जनसंघाचाच विचार घेऊन भारतीय जनता पार्टीच्या रूपाने आपण पुन्हा अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली संकल्पित होऊन राष्ट्रकार्यासाठी सिद्ध झालो. या वाटचालीत, श्यामाप्रसाद मुखर्जी, दीनदयाळ उपाध्याय, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांच्यापासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत 45 वर्षांच्या कार्यकाळातील ही वाटचाल विलक्षण आहे.

1980 मध्ये मुंबईतच पक्षाच्या स्थापनेच्या वेळी अटलजींनी मावळत्या सूर्याच्या साक्षीने ‘अंधेरा छटेगा, सूरज उगेगा, कमल खिलेगा’ हे द्रष्टे विचार व्यक्त केले होते. त्यानंतर सातत्याने मेहनत करून आपण सत्तेपर्यंत पोहोचलो आहोत. आपला पक्ष 45 वर्षांचा झाला आहे, आणि आता सातत्याने तीन वेळा देशाचे पंतप्रधान होण्याचा बहुमान मोदीजींना मिळाला ही आपली तेजस्वी वाटचाल आहे. आज देशाच्या 16 राज्यांत भाजपाचे सरकार आहे, तर 21 राज्यांत मित्रांसोबत आपला पक्ष सत्तेवर आहे. देशाच्या सर्व भागांत प्रमुख राजकीय पक्ष म्हणून भाजपा प्रस्थापित झाला आहे. या वाटचालीत भाजपाने लोकशाही सोडली नाही, घराणेशाही राबविली नाही. हा कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला, असे सांगून फडणवीस यांनी लोकसभेत गृहमंत्री अमित शाह आणि अखिलेश यादव यांच्या संवादाचा दाखला दिला. आमचा पक्ष कोणा परिवाराचा पक्ष नाही, तो मोठा असल्याने अध्यक्ष निवडीस योग्य वेळ लागणार, हे अमित शाह यांचे उत्तर म्हणजे भाजपा व अन्य पक्षांतील नेमका फरक नोंदविणारे होते. महाराष्ट्रात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, लक्ष्मणराव मानकर, सूर्यभान वहाडणे आदी अनेक नेत्यांच्या परिश्रमातून व संघर्षातून आज आपण महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून सिद्ध झालो आहोत, असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी बेईमानी केल्यामुळे एकदा सत्ता गमावली, पण हिंदुत्वाच्या मुद्द्यावर उद्धव सेनेचा त्याग करून सोबत आलेल्या एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करून आता तर आपण अभूतपूर्व यश संपादन केले असून भक्कम विजयानिशी कार्यकर्त्यांचे आशीर्वाद, मेहनतीमुळे आज राज्यातील सर्वात मोठ्या, शक्तिशाली सरकारचे नेतृ्त्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल फडणवीस यांनी केंद्रीय नेतृत्वाबरोबरच पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांचेही आभार व्यक्त केले.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

22 minutes ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

32 minutes ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

52 minutes ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

1 hour ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

1 hour ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

2 hours ago