Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सपारंपरिक लावणीचा वारसा पुढील पिढीकडे

पारंपरिक लावणीचा वारसा पुढील पिढीकडे

फिरता फिरता – मेघना साने

सांस्कृतिक कार्यसंचालनालय आणि ‘महाराष्ट्र सांस्कृतिक मंच’ यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे येथे आयोजित केलेल्या लावणी प्रशिक्षण शिबिराचा समारोप समारंभ गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ३१ मार्च रोजी ‘मराठा मंडळ, पांचपाखाडी, ठाणे’ येथे सायंकाळी ५ ते ७ या वेळेत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ॲड. निरंजन डावखरे, सदस्य विधान परिषद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शिबिराच्या माध्यमातून पारंपरिक लावणीचे जतन करण्याच्या या उपक्रमाबद्दल त्यांनी आयोजकांचे कौतुक केले. ‘महाराष्ट्र कला मंच’च्या सचिव शैला खांडगे यांनी गेली दहा वर्षे हे शिबीर घेऊन निरनिराळ्या प्रसिद्ध कलावंतांकडून विद्यार्थिनींना प्रशिक्षण मिळवून दिले आहे. चित्रपटांमधून आणि काही व्यावसायिक कार्यक्रमांमधून उत्तान शृंगारिक लावणीचे सादरीकरण होत असल्याने त्याचा विपरीत परिणाम होऊन लावणीचा अस्सल बाज बिघडत चालला आहे, याची नोंद घेऊन शैला व डॉ. प्रकाश खांडगे यांनी पारंपरिक लावणी म्हणजे काय असते हे नव्या पिढीसमोर ठेवायचे ठरवले. लावणीचे शास्त्रशुद्ध शिक्षण नव्या पिढीला मिळावे यासाठी प्रयत्न सुरू केले व त्याला यश येऊ लागले. या शिबिरात प्रवेश घेतलेल्या युवतींनी त्यांच्या कानावर कधी न पडलेली अशी पारंपरिक लावणी शिकण्यासाठी अथक परिश्रम केले आणि त्याचे सुंदर सादरीकरण समारोपाच्या दिवशी करून दाखवले.

ठाणे येथील या नऊ दिवसांच्या शिबिरात पारंपरिक लावणीचे प्रशिक्षण देण्यास दिग्गज कलावती आल्या होत्या. लावणीसम्राज्ञी आणि चित्रपट कलावंत मेधा घाडगे पहिल्या दिवशी प्रशिक्षण देऊन गेल्या. त्यामुळे विद्यार्थिनी खूष झाल्या. मोठे कलावंत म्हणजे काय चीज असते, त्यांची कलेप्रतीची लगन कशी असते आणि नवीन मुलींना प्रशिक्षण देण्यासाठीही ते आपला वेळ देऊ शकतात, या गोष्टी पाहून विद्यार्थिनी भारून गेल्या होत्या. प्रशिक्षक आणि महाराष्ट्र सांस्कृतिक मंचच्या अध्यक्ष डॉ. सुखदा खांडगे यांनी तमाशा म्हणजे काय व त्यात गवळण कशी येते, त्यातून मधुरा भक्ती कशी दिसते यावर विवेचन करून विद्यार्थिनींना गवळण शिकवली. राधा कृष्ण यांच्या रूपकावरील गवळण मुलींना फार आवडली. अभिनेत्री प्रमिला लोदगेकर यांनी प्रशिक्षण देताना लावणीच्या अनेक अदा शिकवल्या. चित्रपट अभिनेत्री म्हणून कोणताही अभिमान न बाळगता प्रमिला, मेधा घाडगे, वैशाली जाधव या शिक्षिका बनून विद्यार्थिनींमधे मिसळत होत्या. पारंपरिक लावणीचे जतन होते आहे हे त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे कार्य होते.

या शिबिरात प्रशिक्षण घ्यायला आलेल्यात महाविद्यालयीन विद्यार्थिनी तर होत्याच; परंतु काही साठी ओलांडलेल्या महिलाही होत्या. पण सर्वांची जिद्द आणि शिकण्याचा उत्साह मात्र सारखाच होता. एखाद्या कलेवर प्रेम असले तर वयाचा विसर पडतो हे वयस्क विद्यार्थिनींनी जोषात सादर केलेल्या नृत्यावरून लक्षात आले. काही महिला डॉक्टर, वकील अशा व्यवसाय करणाऱ्या होत्या; परंतु लावणीचे शिक्षण घेता यावे यासाठी त्यांनी आपला व्यवसाय दहा दिवस बंद ठेवला होता. एकूण पंचेचाळीस विद्यार्थ्यांमध्ये दोन मुलगेही होते. ते शिबिराला रोज नाशिकहून ये जा करत होते. समारोप समारंभात त्यांनीही नऊवारी साडी आणि लावणीचा सर्व साज लेऊन मनापासून सादरीकरण केले.

पारंपरिक लावणी सादर करताना ते काव्य आणि नृत्य यांचा संगम म्हणून सादर केले जाते. यात वादकांना फार महत्त्व आहे. ते स्टेजवर एका बाजूला बसून वाजवत असतात. त्यांच्या वादनामुळेच सादरीकरणात रंगत येत असते. या नऊ दिवसांच्या शिबिरातही शैला खांडगे व डॉ. सुखदा खांडगे यांनी अत्यंत अनुभवी अशा वादकांना आमंत्रित करून त्यांची साथसंगत प्रशिक्षणार्थींना मिळवून दिली. ज्या ढोलकीपटू ज्ञानेश्वर ढोरे व पेटीवादक सुभाष खरोटे यांनी दादा कोंडके, शाहीर साबळे, विठ्ठल उमप अशा दिग्गजांना अनेक वर्षे साथ केली ते या शिबिरात साथसंगतीसाठी उपस्थित होते. याशिवाय पूजा सावंत व प्रीती तोरणे या दोन गायिकांनी लावणीला नाट्यमय गाण्याची साथ केली. गायन व वादन प्रत्यक्ष होत असल्याने सहभागी विद्यार्थ्यांचा जोश अधिकच वाढला होता. कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व सहभागी विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, गायकांना व वादकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. हे शिबीर विद्यार्थ्यांसाठी मोफत होते. पण म्हणून कोणीही नऊ दिवसात दांडी मारली नव्हती. अत्यावश्यक काम असल्यासच रजा घेतली होती. शिबिरातही वेळ वाया जाऊ नये याची खबरदारी शैलाताईंनी घेतली होती. आयोजक म्हणून त्या रोज जातीने उपस्थित होत्या. सर्व युवतींच्या बोलण्यावरून त्या लावणीकडे एक कला म्हणून पाहत आहेत असे दिसून येत होते.

लावणीचा उगम पंधराव्या-सोळाव्या शतकात झाला असला तरी एकविसाव्या शतकात ती ताजीतवानी आहे. अभिनेत्री मेधा घाडगे, प्रमिला लोदगेकर, वैशाली जाधव यांचे युट्यूबवरील किंवा अनेक मोठ्या रंगमंचावरील सादरीकरण पहिले तर लक्षात येते की लावणीची जवानी अजून टिकून आहे. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत लावणी ही फडात किंवा जत्रेतच सादर केली जायची. पण डॉ. प्रकाश खांडगे व शैला खांडगे या लोककलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या दांपत्याने महाराष्ट्रात लोककलेचे महोत्सव सुरू केले. गावातील अनेक लोककलावंतांना, लावणी नर्तिकांना त्यांनी शहरी रंगमंदिरात आणले. त्यामुळे गायन, वादन, नृत्य, अभिनय या साऱ्याचा संगम असलेली ही शृंगार किंवा भक्तिरसाची शिंपण करणारी लावणी लोकांना बघायला मिळाली. रवींद्र नाट्यमंदिर, शिवाजी मंदिर, षण्मुखानंद अशा अनेक मोठ्या रंगमंदिरात लोककला महोत्सव किंवा महिला लोककला महोत्सव होऊ लागले. सरकारने पाठिंबा दिला व प्रायोजकही मिळू लागले. लावणी बहराला आली. अनेक लोककलावंतांना प्रसिद्धी मिळाली. हा सारा इतिहास माझ्या डोळ्यांसमोरच घडला आहे. या महोत्सवांमध्ये निवेदन करण्याची संधी मला मिळाली होती.

लोककलेला मानसन्मान मिळवून देण्याचे कार्य खांडगे पती-पत्नींनी गेली पंचवीस वर्षे सुरूच ठेवले आहे. त्यांच्यासोबत या उपक्रमांमध्ये सातत्याने असलेले डॉ. गणेश चंदनशिवेही प्रशिक्षक म्हणून या शिबिरात येऊन गेले. त्यांनी लावणीची थिअरी शिकवली. तेजश्री सावंत आणि हेमाली शेडगे यांनी काही पारंपरिक लावण्या बसवल्या. समारोपाच्या दिवशी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन तेजश्रीने अतिशय सुंदर रीतीने केले.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -