Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्सप्रयोगशील ‘अंधारदरी’त डोकावताना...

प्रयोगशील ‘अंधारदरी’त डोकावताना…

राजरंग – राज चिंचणकर

मराठी रंगभूमीवर व्यावसायिक नाटकांसोबतच प्रायोगिक नाटकेही सादर होत असतात. अनेकविध प्रयोगांची खाण म्हणून प्रायोगिक रंगभूमीकडे पाहिले जाते. प्रायोगिक नाटकांतून आलेले अनेक कलाकार आज व्यावसायिक रंगभूमीवर स्थिरावलेले दिसतात. प्रायोगिक नाटकांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे विविध प्रकारच्या विषयांना त्यात हात घालता येतो आणि असे विषय रसिकांपर्यंत, किंबहुना समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न पोटतिडिकीने केला जातो. यातूनच अनेक विषय रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात येऊ शकतात आणि त्यांना विस्तृत अवकाश प्राप्त होऊ शकते.

सध्या प्रायोगिक रंगभूमीवर ‘अंधारदरी’ नामक एक दीर्घांक त्याच्या शीर्षकामुळे विशेष लक्ष वेधून घेत आहे. एका सामाजिक विषयाला या नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीचे दार खुले झाले आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव यांच्या ‘आठवलेची एक आठवण’ या कथेवर हे नाटक आधारित आहे. या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महेंद्र डोंगरे यांनी केले आहे. श्रीनिवास ओक, प्रज्ञा गरीबे, डॉ. सुनील घोणे, क्षितिज भंडारी, गोकुळ राठोड आदी कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत. अचूक पात्र निवड, सहजाभिनय, मर्यादित स्वरूपाचे संगीत, प्रकाश व नेपथ्य यातून हे नाटक प्रयोगशील होईल, याची दक्षता या नाटकमंडळींनी घेतली आहे.

‘अंधारदरी’ हे नाटक लिहिण्यामागे काय विचार होता याविषयी महेंद्र डोंगरे यांच्याशी संवाद साधला असता ते सांगतात, “राजकीय, आर्थिक व सामाजिक बातम्यांच्या सततच्या पुनरावृत्तीमुळे संवेदनशीलता बोथट होऊन गेली होती. त्यातच अधूनमधून, मॅनहोलमध्ये गुदमरून झालेले सफाई कामगारांचे मृत्यू; अशा पद्धतीच्या बातम्या मनातील संवेदना चाळवत होत्या. सन २०१७ मध्ये मुसळधार पावसामुळे पाण्याखाली गेलेले रस्ते व त्यात उघड्या राहिलेल्या मॅनहोलमध्ये बुडून एका डॉक्टरांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर माझ्या अबोध मनात साचलेल्या असंख्य सफाई कामगारांचे मॅनहोलमध्ये उतरून काम करताना झालेले मृत्यू फेर धरू लागले. नकळत मॅनहोलमध्ये काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांबद्दल सहानुभूती वाटू लागली. याच काळात, युवा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक प्रणव सखदेव यांची कथा वाचनात आली. ही कथा मॅनहोलमध्ये गुदमरून मरण पावलेल्या सफाई कामगारांचे मनोगत मांडत होती. मी नाट्यक्षेत्रात कार्यरत असल्याने, यावर एखादे नाटक लिहावे असे मला वाटू लागले आणि त्यावर एक-दीड तासाचा दीर्घांक लिहून काढला. या लेखनाच्या दरम्यान सफाई कामगारांचे जगणे, त्यांच्या कथा आणि व्यथा, त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर; या सगळ्याचा अभ्यास होत गेला.

कलावंत या नात्याने आणि सामाजिक बांधिलकीच्या दृष्टिकोनातून मी हा दीर्घांक बसवायला घेतला. मूळ कथेत अंतर्भूत असलेला आशय, सामाजिक विषमता, शिक्षणव्यवस्था आदी गोष्टींची सरमिसळ होऊन गरीब-श्रीमंत यातली सहजतेने न दिसणारी खोल दरी, असे चित्र डोळ्यांसमोर उभे राहिले आणि मला ‘अंधारदरी’ हे नाटकाचे शीर्षक सुचले. आम्ही या नाटकाचे पाच प्रयोग केले आणि सहा एकांकिका स्पर्धांमध्ये भाग घेतला. प्रयोगांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला; पण तळमळून, कधी अश्रू ढाळून, कधी नि:शब्द होऊन त्यातल्या काही प्रेक्षकांनी हृदयाला भिडणारा प्रतिसाद दिला. कुठेतरी एक महत्त्वाची सामाजिक समस्या मांडल्यामुळे, प्रयोग पाहिलेल्या सगळ्यांना नाटक मात्र खूप भावले”.

या नाटकाचा उद्देश स्पष्ट करताना महेंद्र डोंगरे म्हणतात, “आपली भौगोलिक, सामाजिक परिस्थिती व यातून आलेली मानवनिर्मित अशी कला किंवा नाटक अजूनही जिवंत आहे. पण कलेचा हा प्रवाह काहीसा गढूळ झालेला दिसतो. बाजारीकरणाच्या विळख्यात सापडलेली नाट्यकला; तिचा अस्सलपणा पडताळून पाहणे अशक्य झाले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या त्रिसूत्रीवर आधारलेली आपली राज्यघटना देशातल्या प्रत्येक नागरिकाला समान कायदा, समान स्वातंत्र्य, समान बंधुता यांचे हक्क देऊन समाजात एकोपा, आनंद व सुख नांदावे; याकरिता आग्रही आहे. पण प्रत्यक्षात तसे दिसते का, हा प्रश्न आहे. आपण नक्की काय करत आहोत, कुठे जाणार आहोत; याची जाण हरवलेला माणूस समाजातल्या विषमतेबद्दल या नाटकामुळे अंशतः तरी विचार करेल. माझ्या कर्तव्यशील भावनेने मी हे नाटक केलेले आहे. यात समाजाच्या दोन टोकांमधली विषमता तौलनिक विचारांद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे”.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -