‘आज सोमवार हैं!’

Share

श्रीनिवास बेलसरे

‘ज्याची त्याची, ज्याला त्याला’ असे काहीसे गंमतीशीर भाषांतर होईल अशा नावाचा (‘To each his own’) एक अमेरिकी सिनेमा आला होता १९४६ साली. सिनेमाने नायिका ऑलिव्हियाला (Olivia de Havilland) सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे १९४६ सालचे ‘अकादमी पारितोषिक’ मिळवून दिले. समीक्षकांनी सिनेमाचे जोरदार स्वागत आणि ऑलिव्हियाचे तोंड भरून कौतुक केले. समीक्षक सॅन बेक यांनी म्हटले होते, ‘जागतिक युद्धांनी काही ‘घाईघाईतली लग्ने’ घडवून आणली आणि अनेक महिलांवर वैधव्य लादले!’ या सिनेमाने जगाला त्या महिलांच्या इच्छाशक्तीचे दर्शन घडवले. त्यानंतर तब्बल २३ वर्षांनी शक्ती सामंता यांनी ‘आराधना’(१९६९) काढला. हिंदीतला पहिला सुपरस्टार राजेश खन्नाच्या कारकि‍र्दीत आराधनाचे फार मोठे योगदान आहे. त्याच्या १९६९ ते १९७१ या केवळ ३ वर्षांत हीट झालेल्या १७ सिनेमांत आराधनाचा नंबर वरचा आहे. राजेशसाठी पिता आणि पुत्र अशा डबल-रोलची कल्पना गुलशन नंदा यांनी दिली. पटकथा सचिन भौमिक यांनी लिहिली. मुलाचा रोल करताना अभिनय देव आनंदसारखा कर असे सामंतांनी सुचवले होते.

सिनेमा जबरदस्त चालला. लगेच बंगालीत डबिंग झाले. शिवाय तमिळमध्ये ‘सिवगामीयिन सेल्व्ह्न’ या नावाने तर तेलुगूमध्ये ‘कन्नावरी कलालू’ असे २ रिमेक निघाले! सिनेमा सोविएत यूनियनमध्येही (आताचा रशिया) प्रचंड गाजला. आराधनाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा ‘फिल्मफेयर पुरस्कार’ मिळाला आणि शर्मिला टागोरला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा! सहकलाकार होते अशोककुमार, मदनपुरी, फरीदा जलाल, सुजितकुमार, अनिता गुहा, असित सेन, सुभाष घई आणि अभी भट्टाचार्य.
आराधनाची कथा योगायोगानी भरलेली होती. भारतीय हवाईदलाचे पायलट अरुण वर्मा यांचे प्रेम केवळ प्रवासातल्या नेत्रपल्लवीतून बसते वंदना त्रिपाठीवर (शर्मिला टागोर). ते एका मंदिरात जावून लग्न करतात. ‘दिग्दर्शक विरचित नेहमीच्या योगायोगाने’ वादळी पावसात सापडून त्यांना एका घरात आसरा घ्यावा लागतो. फिल्मी रितीरिवाजाप्रमाणे त्या रात्रीच्या जवळीकतेचे रुपांतर शर्मिलाच्या गर्भार होण्यात होते. अपघातात अरुणचा मृत्यू होतो. इकडे वंदनाच्या वडिलांचाही मृत्यू होतो.

अरुणच्या घरचे अविवाहित आणि वर गर्भार सुनेला स्वीकारण्यास नकार देतात आणि ती रस्त्यावर येते. त्यात अरुणच्या मुलाचा-सुरजचा (राजेशचा डबल रोल) जन्म होतो. पुन्हा योगायोगाने अनाथाश्रमाकडून सूरजला ज्या घरात दत्तक दिले जाते तिथेच त्याची आया म्हणून शर्मिला रुजू होते. एक गुंड (मनमोहन) तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न करतो. त्या झटापटीत तिचा मुलगा सुरज तिथे येतो. छोट्या सुरजच्या हातून त्याचा खून होतो. खुनाचा आरोप शर्मिला स्वत:वर घेते. सजा भोगून ती बाहेर येते आणि एका पत्राने सुरजला तीच आपली आई असल्याचे कळते. अशा रीतीने तिची ‘आराधना’ सफल होते अशी ही कथा! गीतकार होते आनंद बक्षीजीं व संगीतकार सचिनदेव बर्मन. बक्षीजी साहेबांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विषयातली विविधता. आराधनात त्यांनी सचिनदांबरोबर अभिजात कलेच्या रसिकांसाठी ‘सफल होगी तेरी आराधना, काहे को रोये?’ सारखे गाणे तर रोमँटिक गाणी आवडणाऱ्यांसाठी ‘कोरा कागज था ये मन मेरा’, आणि ‘गुनगुना रहे हैं भंवर खिल रही हैं कली कली’ सारखी गाणी दिली. काहीशी सवंग आवड असलेल्यांसाठी ‘रूप तेरा मस्ताना’, आणि ‘मेरे सपनो की रानी कब आयेगी तू’ सारखी खेळकर गाणी लिहून दिली. असेच एक रोमँटिक गाणे गायले होते लतादीदी आणि महंमद रफींनी!
सुरजचे प्रेम जेलर मदनपुरीची मुलगी रेणुकावर (फरीदा जलाल) आहे. त्यात त्यांची खेळकर चेष्टामस्करी सुरू आहे. सुरजला तिच्याकडून प्रेमाची कबुली हवी असते आणि ती खोडकरपणे ती देण्याचे टाळत असते. तो म्हणतो, ‘ठीक आहे, नको मान्य करू पण मी विचारेन त्या प्रश्नांची खरी उत्तरे मात्र द्यायची!’ त्याला ती कबुल होते. तो विचारतो- ‘अच्छा, तो बागों में बहार है?’ कलियों पे निखार है?’ रेणुका (फरीदा) उत्तरते- ‘है.’ अनावर घाई झालेला सुरज (राजेश) म्हणतो- ‘तो तुमको मुझसे प्यार है.’ रेणू त्याला चिडवण्यासाठी म्हणते- ‘ना ना ना…’ प्रियकर-प्रेयसीची अशी नोकझोक हाही त्याकाळी एक लोकप्रिय विषय असायचा. रेणू म्हणते – ‘छोडो हटो, जाओ पकडो ना बैंया, आऊँ ना मैं तेरी बातों में सैंय्या.’ लगेच सुरज म्हणतो- ‘तुमने कहा है देखो, देखो मुझे सैंय्या! बोलो, तुमको इकरार है?’ फिर भी इनकार है? तो तुमको मुझसे प्यार है…’ फरीदाचा लटका नकार सुरूच राहतो. मग राजेश तिचीच साक्ष काढायचा प्रयत्न करतो. ‘तुमने कहा था मैं सौ दुःख सहूँगी, चुप के पिया तेरे मन में रहूँगी.’ पुढचे गाणे तर एक संवादच आहे. ‘मैं सब कहूँगी लेकिन वो ना कहूँगी, तुमको जिसका इन्तजार है!’ (रेणुका) है! (सुरज) फिर भी तकरार है? (रेणू) ‘है!’ ‘तुमको मुझसे प्यार है.’ (सुरज) ‘ना ना ना…’ (रेणू) ती पुन्हा त्याला छेडण्यासाठी म्हणते- ‘अच्छा चलो, छेडो आगे कहानी, होती है क्या बोलो प्यार की निशानी?’ बिचारा सुरज पुन्हा प्रयत्न करतो. तो प्रेमात पडलेल्या युवतीची अवस्था सांगू लागतो- ‘बेचैन रहती है प्रेमदिवानी, बोलो क्या दिल बेकरार है?’ ‘है!’ (रेणू) आनंदजींनी मग पुढच्या ओळीत नायकाला एक क्लुप्ती दिली. एकापाठोपाठ एक प्रश्न विचारून प्रेयसीला गाफील करून टाकायचे आणि मग तिच्या नकळत तिचा होकार घेऊन टाकायचा! तो विचारतो- ‘मुझपे ऐतबार है, जीना दुश्वार है?’ आज सोमवार है?’ यावर काहीशी वैतागलेली रेणुका उत्तरते- ‘अरे बाबा, है!’ पण मुद्दाम तिच्या उत्तराकडे दुर्लक्ष करून सुरज विचारतो- ‘तो तुमको मुझसे प्यार है!’ गाफील रेणूच्या तोंडून निघून जाते – ‘है!’ अन लगेच ती ओरडते- ‘ना ना ना… नहीं नहीं नहीं!’ गाण्याची गंमत इथेच होती. ‘आजचा वार सोमवार आहे’ फक्त एवढेच निश्चित करून घेताना प्रेयसीकडून होकार मिळवणारे खोडकर आनंदजी अशी मिश्किल मुडची गाणी लीलया रचत.

‘अपनापन’(१९७७) मध्ये जितेंद्र आणि सुलक्षणा पंडितच्या तोंडी त्यांनी असेच अगदी सोमवारचीच सुरुवात करून एक गाणे लिहिले होते. नायिकेने स्वत:च स्वत:साठी गाण्याचा तो विरळ प्रसंग होता. आनंदजींचे आल्हाददायक शब्द होते-
“सोमवार को हम मिले, मंगलवार को नैन, बुध को मेरी नींद उडी, जुम्मेरात को चैन, शुकर शनी कटे मुश्कील से,
आज हैं एतवार! सात दिनों में हो गया जैसे, सात जनम का प्यार!” एका आठवड्यात असे ७ जन्माचे प्रेम पक्के करून टाकणाऱ्या जुन्या गीतकारांच्या पार्श्वभूमीवर अलीकडची ‘ए गणपत, चल, दारू ला’ सारखी गाणी ऐकल्यावर प्रेमरोगमधील नरेंद्र वर्मांच्या “भंवरेने खिलाया फुल” या गाण्याची शेवटची ओळ आठवते- “वो दिन अब ना रहे.”

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

34 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

57 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago