Friday, May 9, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यमसाला किंग धनंजय दातार

मसाला किंग धनंजय दातार

सेवाव्रती : शिबानी जोशी

धनंजय दातार हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणारे एक भारतीय व्यापारी आहेत, हे आज कोणालाही सांगायची गरज नाही. दुबईतील एक नामवंत प्रतिष्ठित भारतीय उद्योजक म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. त्यांचा जीवनकार्य प्रवास हा सध्याच्या तरुणांना एक आदर्श वस्तूपाठ म्हणून पाहता येईल. महाराष्ट्रातील छोट्याशा शहरातून परदेशात जाऊन शून्यातून एवढ्या प्रचंड मोठ्या सुपर मार्केटच जाळ कसं विणता येत? याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धनंजय दातार  आहेत असं म्हणता येईल.

दातार यांचे  लहानपण  अमरावती शहरात गेले. त्यांचे वडील भारतीय हवाई दलात (IAF) सार्जंट होते आणि सतत प्रवास करत असत. त्यांचे वडील निवृत्त झाले आणि कुटुंब मुंबईत गेले, तेथून दातार यांचे वडील दुबईला एक छोटासा किराणा व्यवसाय सुरू करण्यासाठी स्थलांतरित झाले.

खरं तर धनंजय स्वतः दुबईमध्ये जाण्यासाठी तितकेसे इच्छुक नव्हते तरीसुद्धा ते वडिलांकडे गेले आणि त्यांच्या दुकानात बसू लागले. हळूहळू काम आवडू लागलं आणि यातच स्थिरस्थावर होण्याचं त्यांनी ठरवलं. त्यासाठी दुसऱ्या उद्योगात नोकरीही केली. व्यवसाय वाढवायचा असेल तर भांडवल हवं त्यासाठी त्यांनी बँकेचे कर्ज घेतलं आणि  ‘अल आदिल ग्रुप’ च्या कामाला सुरुवात झाली. दुबईला भारतीयांची संख्या खूप मोठी आहे. आज जागतिकीकरणामुळे सर्व वस्तू सहज उपलब्ध होतात; परंतु १९८०च्या दशकात  हपरिस्थिती नव्हती. आपले भारतीय मसाले, खाद्यपदार्थ सहजासहजी मिळत नसत. त्यामुळे मसाल्यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं. सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. धनंजय यांना अरबी आणि इंग्रजी दोन्ही भाषा येत नव्हत्या. हळूहळू त्या भाषा अवगत केल्या. त्यांच्या पत्नीचीही त्यांना मोठी साथ लाभली आहे.

१९८० च्या दशकात दुबईसुद्धा विकासाच्या टप्प्यात होती. अनेक छोटे-मोठे व्यवसाय सुरू करायला खूप मोठी संधी होती. त्याचा फायदा त्यांना मिळाला. आजमितीला त्यांच्या कंपनीची ५० सुपरमार्केट आउटलेटची चेन झाली आहे. दोन कारखाने आणि दोन मसाल्याच्या गिरण्या आहेत. २०१७ मध्ये अरेबियन बिझनेसने GCC मधील ५० सर्वात श्रीमंत भारतीयांमध्ये त्यांचं नाव नोंदलं गेलं आहे. २०१८ मध्ये, त्यांना फोर्ब्स मिडल इस्टच्या ‘टॉप १०० इंडियन बिझनेस लीडर्स’मध्ये २९ वे स्थान मिळाले होते आणि २०१९ मध्ये ते २७ वे स्थानावर होते. २०११ मध्ये त्यांना भारताच्या आर्थिक विकासात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल उद्योग  रत्न पुरस्कार तसेच अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.”दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धनंजय यांचं प्रथम विमान उतरले तेव्हा माझ्या खिशात फक्त १० दिरहमच्या ३ नोटा होत्या असं धनंजय दातार सांगतात. पहिल्या महिन्यातच मला दुबईच्या सर्वात मोठ्या सुपर मार्केटपैकी एकामध्ये इंटर्न म्हणून नोकरी मिळाली. “१९८० च्या दशकात, दुबई विकासाच्या टप्प्यात होता. मोठे, मध्यम आणि छोटे नवीन व्यवसाय स्थापन करण्याची मोठी क्षमता होती.

“माझ्या वडिलांनीही ही संधी साधली आणि तिथे एक छोटं दुकान सुरू केलं. आज, दुबई एक आंतरराष्ट्रीय व्यवसाय केंद्र आहे. “या देशाची व्यवसाय-अनुकूल धोरणे, उद्योगाला राज्यकर्त्यांचा सतत पाठिंबा, बहुसंस्कृत ग्राहकसंख्या आणि या देशाचे धोरणात्मक स्थान तसंच दर्जा राखणं हे उद्योजकांसाठी फायदेशीर घटक आहेत. “इथे भेसळीला अजिबात स्थान नाही. या देशाने मला स्वतःला सिद्ध करण्यास मदत केली. सचोटीचे बक्षीस मोठे भाग्य देऊन दिले असं ते म्हणतात.
अल आदिल ग्रुपची आखाती देशांमध्ये सुपरस्टोअर्सची साखळी आहे. येथे त्यांचे दोन मसाल्याचे कारखाने आणि दोन पिठाच्या गिरण्या देखील आहेत. हा समूह स्वतःच्या “पीकॉक” ब्रँड अंतर्गत ७०० हून अधिक उत्पादने तयार करतो. अमेरिका, कॅनडा, केनिया, स्वित्झर्लंड, इटली आणि सौदी अरेबियासह अनेक देशांमध्ये व्यापार करतो. ‘प्रचंड जिद्द, अपार कष्ट, प्रामाणिकपणा, सौजन्य व ग्राहकसेवा या पंचसूत्रीच्या आधारावर ३८ वर्षांपूर्वीपासून कार्य सुरू असल्याचं  ड. धनंजय दातार यांनी नुकतेच दुबईत एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

डॉ. दातार यांचं आत्मचरित्र ही प्रसिद्ध झालं आहे. व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर सुरक्षित, शुद्ध व भेसळमुक्त उत्पादने तसेच सौजन्यपूर्ण सेवा देऊन ग्राहकांना काटेकोर जपावे लागते तरच आपल्याला नाव व कीर्ती मिळते, असे डॉ. धनंजय दातार नेहमी म्हणतात. यश व समृद्धीचे स्वप्न बघणाऱ्या भारतीय सर्वसामान्य तरुणांमधून हजारो उद्योजक निर्माण व्हावेत हे माझे स्वप्न आहे. अशा नवउद्योजकांना प्रेरणा मिळावी म्हणून मी हे आत्मचरित्र लिहिले आहे, असे डॉ. दातारांचं म्हणणं आहे.थोडक्यात काय तर विदेशात हजारो जण जातात. नोकरी करतात, शिक्षण घेतात; परंतु तिथल्या संधींचा फायदा घेत तिथल्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करत एक यशस्वी उद्योजक ही होता येत, हे डॉ. धनंजय दातार यांच्याकडे पाहून आपल्या लक्षात येईल.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -