Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्स‘कीर्तन’ नव्हे; एका कुटुंबाचे ‘ किर्रतन ’...

‘कीर्तन’ नव्हे; एका कुटुंबाचे ‘ किर्रतन ’…

राजरंग – राज चिंचणकर

गेली काही वर्षे प्रशांत दामले व संकर्षण कऱ्हाडे यांची जोडी विविध प्लॅटफॉर्मवर झक्कास जमली आहे. आता हीच जोडी रंगभूमीवर एक नवीन नाटक घेऊन येत आहे. निर्मात्याच्या भूमिकेत प्रशांत दामले आणि लेखक व कलाकाराच्या भूमिकेत संकर्षण कऱ्हाडे, असा हा योग साधत त्यांचे ‘कुटुंब किर्रतन’ हे नाटक आता रंगभूमीवर येण्यास सज्ज होत आहे. २१ मार्च रोजी मुंबईत शुभारंभ होत असलेल्या या नाटकाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते यांची या नाटकात असलेली धमाल भूमिका…! आता अशी सगळी भट्टी जुळून आल्यावर हे ‘कुटुंब’ नक्की काय ‘किर्रतन’ करणार, याची चर्चा नाट्यसृष्टीत सुरु झाली आहे. “हे ‘कीर्तन’ नसून ‘किर्रतन’ आहे”; असे संकर्षण कऱ्हाडे याने आधीच स्पष्ट केल्याने, या नाटकाविषयीची उत्सुकता अधिकच ताणली गेली आह

‘प्रशांत दामले फॅन फाउंडेशन’ प्रकाशित व ‘गौरी थिएटर्स’ निर्मित ‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाचे कथासूत्र विनोद रत्ना यांचे असून, नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडे याने केले आहे. अमेय दक्षिणदास हे या नाटकाचे दिग्दर्शक असून, अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य व किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. संकर्षण कऱ्हाडे, तन्वी मुंडले, अमोल कुलकर्णी आणि वंदना गुप्ते या कलाकारांच्या या नाटकात भूमिका आहेत.

आतापर्यंत प्रायोगिक रंगभूमीवर बरीच वर्षे कार्यरत असलेले अमेय दक्षिणदास या नाटकाच्या निमित्ताने दिग्दर्शक म्हणून व्यावसायिक रंगभूमीवर येत आहेत. त्याचप्रमाणे युवा अभिनेत्री तन्वी मुंडले हिचेही हे पहिलेच व्यावसायिक नाटक आहे. वंदना गुप्ते यांना या नाटकाद्वारे विनोदी ढंगात रसिकांना पाहता येणार आहे. संकर्षण कऱ्हाडे लेखक व अभिनेत्याच्या भूमिकेत असून, ‘तू म्हणशील तसं!’ या नाटकातला त्याचा सहकलाकार अमोल कुलकर्णी याची या नाटकात एक ‘सरप्राईज’ भूमिका असल्याची चर्चा आहे.

‘कुटुंब किर्रतन’ या नाटकाविषयी बोलताना संकर्षण कऱ्हाडे सांगतो, “या नाटकातून आम्ही समाजाला काय देऊ शकतो किंवा लोकांनी या नाटकातून काय घ्यायला हवे, याचा विचार करत हे ‘कुटुंब किर्रतन’ करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. घरामध्ये एखादा माणूस जेव्हा खूप बोलत असतो; तेव्हा आपण त्याला ‘काय प्रवचन देत आहेस’, असे म्हणतो. अगदी त्या प्रवचनाच्या धाटणीचा हा प्रयोग आहे. त्यामुळे हे ‘कीर्तन’ नाही; तर ‘किर्रतन’ आहे”.

पुरस्कार जेव्हा ‘वयात’ येतो…

नाट्यसृष्टीतले ‘शुभ्र व्यक्तिमत्त्व’ म्हणजेच सबकुछ अशोक मुळ्ये, चुकून काही काळ चर्चेत नसले तरी त्यांचे नक्की चाललंय तरी काय; असा नाट्यसृष्टीला प्रश्न पडतो. याचे कारणही तसेच आहे. कधीही स्वस्थ न बसणारे अशोक मुळ्ये अशावेळी नक्कीच कुठल्या तरी नवीन उपक्रमाच्या मागे लागले असणार, याची खात्री तमाम रंगकर्मींना असते. त्यांचा स्वघोषित असा ‘माझा पुरस्कार’, हे त्यांनी जन्माला घातलेले अपत्य नाट्यसृष्टीत दबदबा राखून आहेच. दरवर्षी ते हा पुरस्कार ‘स्वतःला वाटेल त्यांना’ देत असतात. सालाबादप्रमाणे यंदाही या पुरस्कार सोहळ्याचा घाट त्यांनी त्यांच्या पद्धतीने घातला आहे. पण यावेळचे त्याचे वैशिष्ट्य म्हणजे यंदा हा पुरस्कार ‘वयात’ आला आहे. अर्थात साक्षात मुळ्येकाकांनीच अशी दवंडी पिटली असल्याने त्याला दुजोरा देणे क्रमप्राप्तच आहे. मुळ्येकाकांचे हे नवीन प्रकरण काय; तर यंदा या पुरस्काराचे एकोणिसावे वर्ष आहे. त्यामुळे हा पुरस्कार थेट ‘वयात’ आला असल्याचे मुळ्येकाकांनीच ठरवून टाकले आहे.

‘आले त्यांच्या मना’ अशा तालावर काम करणारे अशोक मुळ्ये दरवर्षी ‘माझा पुरस्कार’ देत असतात. “हा पुरस्कार मी देतो म्हणून तो माझा पुरस्कार”, हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. आता मुळ्येकाकांच्या म्हणण्यानुसार त्यांचा हा पुरस्कार यंदा ‘वयात’ आला असल्याने, १९ मार्चला होणाऱ्या या सोहळ्यात नक्की काय काय घडणार याची उत्सुकता वाढली आहे. अशोक मुळ्ये यांनी त्यांच्या स्वभावाधर्मानुसार यंदाचे पुरस्कार थेट जाहीर करून टाकले आहेत. सद्यकाळात नाट्यसृष्टीत ज्यांनी ज्यांनी ‘मुळ्येकाकांना आवडेल अशी’ भरीव कामगिरी केली आहे, त्यांनाच ते हा पुरस्कार देणार आहेत. यात त्यांच्या पसंतीनुसार त्यांनी रंगकर्मींची वर्णी लावली आहे. तर, या ‘माझा पुरस्कार’ सोहळ्यात अशोक मुळ्ये यांचे शाब्दिक फटकारे नेहमीप्रमाणेच कानी पडतील आणि ‘वयात’ आलेला हा पुरस्कार सोहळाही ते तारुण्याच्या जोशात पार पाडतील, याबद्दल सर्वांना खात्री आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -