रत्नागिरी : हिंदू धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिले आणि आम्हाला हिंदू म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कसबा येथे भव्य-दिव्य स्मारक उभारण्यात येईल. हा महायुती सरकारचा निर्धार असून सारे जग या स्मारकासमोर नतमस्तक होईल. यातून पुढच्या पिढ्या प्रेरणा घेतील असे प्रतिपादन राज्याचे मत्स्य व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनादिवशी कसबा संगमेश्वर येथे झालेल्या हिंदू धर्मरक्षण दिनाच्या निमित्ताने मंत्री राणे बोलत होते. यावेळी कसबा येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर मंत्री नितेश राणे यांनी अभिवादन करून त्यांना पुष्प अर्पण केले. यावेळी व्यासपीठावर पदाधिकारी व शिवशंभू प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, आज मी मंत्री किंवा आमदार म्हणून नव्हे, तर एक हिंदू म्हणून या भूमीत उपस्थित आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्याची आठवण म्हणून येथे उपस्थित आहे.
Chhatrapati Sambhaji Maharaj Statue : छत्रपती संभाजी स्मारकासमोरील रोहित्र स्ट्रक्चर हलवणार
राजांनी हिंदू धर्मासाठी पिढ्यानपिढ्यांसमोर इतिहास रचून ठेवला आहे. त्याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. या भूमीत त्यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी महायुती सरकारने अर्थसंकल्पात त्याची तरतूद केली आहे. महायुती सरकारच येथे महाराजांचे भव्य स्मारक उभारणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हिंदुत्ववादी विचारांचे आहेत. त्यांच्या तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या इच्छाशक्तीमुळे या महायुती सरकारने स्मारकासाठी तरतूद केली आहे. सरदेसाई कुटुंबीयांशी आम्ही बोलणार आहोत, त्यांचा यथायोग्य सन्मान करून महाराजांचे भव्य-दिव्य स्मारक आम्ही इथे उभे करणार आहोत. यात कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही. देशाचं इस्लामीकरण करण्याचा मुघलांनी, औरंग्यानं ठरवले होते म्हणूनच त्यांनी आमची मंदिरे पाडली. आमच्या माता भगिनींचा अमानुष छळ केला गेला. म्हणूनच त्यावेळचे युद्ध हे हिंदू विरुद्ध मुसलमान असेच होते.
आमच्या राजांनी तेव्हा आमच्या हिंदू धर्माला झुकायला दिले नाही पण आता काही अतिशहाणे ज्यांची दुकाने या विषयावर चालतात, ते मात्र राजांची बदनामी करायला लागले आहेत. महाराजांच्या सैन्यात मुसलमान होते अस सांगत चुकीचा इतिहास समोर आणायला लागले आहेत. पण हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने जो पाहील त्याला तिथेच ठेचले जाईल, अशी शिकवण महाराजांनी आम्हाला दिली आहे. विधानसभेमध्ये कडवट हिंदूंनी हिंदूंचे सरकार आणले. त्यामुळे तितक्याच उत्साहात हिंदूंचे सण, उत्सव साजरे होणार. आता हिंदू धर्माचे रक्षण हे आमचे कर्तव्य आहे.