Thursday, May 8, 2025
Homeसाप्ताहिकरिलॅक्समाध्यमांतर, ‘छावा’ आणि वाचनसंस्कृती...!

माध्यमांतर, ‘छावा’ आणि वाचनसंस्कृती…!

राज चिंचणकर

साहित्यविश्वात अनेक साहित्यकृती निर्माण होतात आणि वाचकवर्ग त्यांचे उत्साहात स्वागत करतात. काही साहित्यकृती तर ‘माईलस्टोन’ ठरतात. अनेकदा अशा गाजलेल्या साहित्यकृतींचे माध्यमांतरही होताना दिसते. आतापर्यंत विविध कथा, कादंबऱ्या या रंगभूमीवर; तसेच छोट्या व मोठ्या पडद्यावर माध्यमांतर होऊन अवतरल्या आहेत. रसिकही त्यांच्या आवडीच्या अशा साहित्यकृतींच्या माध्यमांतराचे स्वागत करत आले असून, या कलाकृतींना रंगभूमीवर किंवा पडद्यावर अनुभवणे ही रसिकांसाठी आनंदाची पर्वणी ठरलेली आहे. सध्या सर्वत्र एका मराठी साहित्यकृतीची मोठी चर्चा आहे आणि ती साहित्यकृती म्हणजे ज्येष्ठ साहित्यकार शिवाजी सावंत यांची ‘छावा’ ही कादंबरी…! सध्या हिंदी चित्रपटसृष्टीत, छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनकार्यावर आधारित ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या सगळ्याचा एक वेगळा परिणामही होताना दिसत आहे आणि तो म्हणजे ‘छावा’ या कादंबरीला आता वाचकांकडून खूप मागणी वाढली आहे.

 

अनेक पुस्तकांच्या दुकानांमध्ये ‘छावा’ ही कादंबरी विकत घेण्यासाठी वाचकवर्ग पायधूळ झाडताना आढळत आहे. काही ठिकाणी तर ही कादंबरी दुकानातून गायब झाल्याचे चित्र आहे. असे असले तरी सद्यस्थितीत ही कादंबरी हमखास उपलब्ध होण्याचे ठिकाण म्हणजे विविध वाचनालये…! ‘छावा’ ही कादंबरी ऐंशीच्या दशकात जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हापासूनच वाचकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. कालांतराने या कादंबरीच्या अनेक आवृत्त्याही निघाल्या. ही कादंबरी ‘माईलस्टोन’ साहित्यकृती असल्याने बहुतेक सर्वच वाचनालयांत ती उपलब्ध आहे. सध्या ‘छावा’ या कादंबरीसाठी वाचकांकडून वाचनालयांकडे मोठी मागणी होताना दिसत आहे. अर्थातच, मागणी अधिक आणि पुरवठा कमी, या स्थितीमुळे वाचकांना ही कादंबरी आता हातात मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. एखाद्या साहित्यकृतीवर नव्याने निर्माण झालेल्या कलाकृतीमुळे, मूळ साहित्यकृतीवर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो, याचे उदाहरण सध्या ‘छावा’ या चित्रपटाच्या निमित्ताने स्पष्ट होत आहे. या संदर्भात माहीम सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल संदीप पेडणेकर यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणतात, ‘आमच्या वाचनालयात शिवाजी सावंत यांच्या ‘छावा’ या कादंबरीच्या प्रती अर्थातच आहेत आणि ‘छावा’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून या कादंबरीला युवा पिढीकडून मागणी वाढली आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या कर्तृत्वाची व पराक्रमाची उजळणी पुन्हा एकदा युवा पिढी यानिमित्ताने करत आहे आणि हे आपल्या इतिहासाचे वैभव आहे. अशा चित्रपटामुळे वाचनाची ओढ वाढली, हे वाचनसंस्कृती जपणाऱ्या आमच्यासारख्या वाचनालयासाठी महत्त्वाचे आहे’.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -