बाल कवितेतून भाषेचा आनंद

Share

मायभाषा : डॉ. वीणा सानेकर

वाचकहो, गेल्या आठवड्यातील लेखात प्रामुख्याने गिरणगावातील मराठी नाटकाच्या अनुषंगाने आपला संवाद झाला. आज भाषा शिक्षणाच्या संदर्भात बोलू या.

शालेय वयात मूळ भाषेच्या आधारेच अन्य विषय शिकतात आणि म्हणूनच मातृभाषा हे शिक्षणाचे माध्यम असायला हवे. शिकण्यातला आनंद हरवू नये याची काळजी घेणे हे मोठ्यांचे कर्तव्य आहे. मुळात लहानपणापासून पालक गणित, विज्ञान या विषयांचे ओझे वाहतात आणि तेच हळूहळू मुलांवर लादतात. बालवयात मुलांना भाषा शिकण्यातला आनंद घेऊ देणे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे.

मराठीतील समृद्ध बाल कविता म्हटलं की, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर ही नावे सहज आठवतात. त्यांनी विपुल बालकविता लिहिल्या आहेत. विंदानी आपण बालकविता कसे लिहू लागलो, हे एका मुलाखतीत सांगितल्याचे स्मरते.
त्यांचा मुलगा अंधाराला खूप घाबरत असे. विंदानी त्याच्याकरिता कविता लिहायला सुरुवात केली. त्याला अशी सवय लागली की, तो भीती वाटली की, घडाघडा कविता म्हणत असे. भीती संपेपर्यंत तो बाल कविता म्हणतच राहायचा. पुढे मुलगा हळूहळू या भीतीतून बाहेर आला पण विंदांच्या बालकविता मात्र सुरूच राहिल्या.

एका माकडाने काढले दुकान
आली गिऱ्हाईके छान छान
किंवा
अ ब ब ब केवढा फणस आई
आजोबांचे पोटसुद्धा एवढे मोठे नाही
किंवा
एक परी तिचे नाव उनी
लागते तिला उन्हाची फणी
अशा नानाविध बाल कविता विंदानी लिहिल्या आहेत.
त्यातल्या काही कवितांची गाणीही झाली आहेत.
मंगेश पाडगावकरांची ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय’ हे गाणे गुणगुणत किती मुले लहानाची मोठी झाली. अभ्यासाचा ताण मुलांना खूप त्रास देतो. नि ही छोटी-छोटी मुले म्हणतात,
आई गणित नको, आकडे लागले चुकू
दोन नि दोन पाच, डोकं लागलं दुखू
आई पाढे नको , डोळ्यात येतं पाणी
तू नुसतीच शिकव, छान छान गाणी
मला आठवते माझ्या मुलीची शाळा सकाळी ७ वाजता सुरू झाली, तेव्हापासून तिला उठवून डब्यासह नि दप्तरासह शाळेत पाठवणे हा उद्योग करताना दमछाक व्हायची. मग सुट्टीकडे डोळे लावून बसायची ती. अनंत भावे यांचा एक छोटा बालगीतसंग्रह ‘सुट्टी’ याच विषयावर आहे.
अशी सुट्टी सुरेख बाई ,
पंख फडफडत उडून जाते
माझ्यापाशी आठवणींची
रंगबिरंगी पिसे ठेवते
सुट्टी येते तशी लगेच जातेही. मुले मग पुन्हा तिची वाट पाहत राहतात.
भावे सरांची ‘पटपटपूर’, गरगरा, सांगा सांगा ढगोजीबाप्पा अशी विविध कवितांची पुस्तके आहेत. माझ्या प्रिय विजया वाड बाईंनी खूप छान बालकविता तर लिहिल्याच आहेत पण मुलांसाठी कवितांचे कोशही संपादित केले आहेत.
कासव चाले हळू,
त्याच्या पायाला झाले गळू
किंवा
माझी खार, माझी खार
झुला फांदीचा करते
अशा दीर्घ बालकविता वेगळाच आनंद देऊन जातात.
तर एकूण बालकविता मुलांनाच का मोठ्यांनाही उदंड आनंद देतात.
ही आनंद घेण्याची कला मात्र सर्वांनाच जमली पाहिजे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

1 minute ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

34 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago