Share

प्रतिभारंग – प्रा. प्रतिभा सराफ

‘नवस’ म्हणजे काय तर एखाद्या देवतेने आपली विशिष्ट इच्छा पूर्ण केल्यास आपण तिला विशिष्ट पदार्थ अर्पण करून किंवा तिच्यासाठी विशिष्ट व्रत करून, असे अभिवचन देणे म्हणजे नवस करणे होय.  अशी व्याख्या गुगलगुरूने दाखविली. ‘नवस’ हा आधी बोलावा लागतो आणि नंतर तो पूर्ण करावा लागतो अशी प्रथा अगदी प्राचीन काळापासून सर्वत्र चालत आलेली आहे.

जीवनाच्या चढउतारात अगदी सुशिक्षित माणसेसुद्धा सहजपणे देवापुढे नवस बोलतात आणि तो नवस आवर्जून फेडायचा प्रयत्नही करतात. वयाच्या तेविसाव्या वर्षी कॉलेजमध्ये नोकरी लागली. तेव्हा आमच्या कॉलेजच्या एका लेक्चररने डब्यामध्ये काही मोदक आणले होते. बाजूला आम्ही मैत्रिणी बसलेलो होतो. सगळ्यांनी एकमेकांच्या डब्यातले काहीतरी उचलले, खाल्ले; परंतु तिच्या डब्याला कोणी हात लावला नाही याचे मला नवल वाटले. आमच्याबरोबर तिनेही डबा खायला सुरुवात केली आणि साधारण तिसरा मोदक तिने खाल्ल्यावर तो डबा तिने आमच्यासमोर सरकवला आणि मग सगळ्यांनी त्यातले मोदक घेतले. त्या दिवशी मला समजले की, तिने आपली मुलगी आजारी असताना सिद्धिविनायकाला एक नवस केला होता की, दुर्धर आजारातून मुलगी पूर्ण बरी झाल्यावर, मी संकष्टीला एकवीस मोदकांचा नैवेद्य तुला दाखवेल. तिची मुलगी आजारातून पूर्णपणे बरी झाली. त्या एकवीस मोदकांपैकी एक मोदक हा मिठाचा असतो आणि मिठाचा मोदक आला माझा उपवास सुटतो! हे व्रत ती आयुष्यभर पाळणार होती. असा तिचा नवस फेडण्याचा प्रकार होता. त्यामुळे जितके लहान आकाराचे मोदक करता येतील तितक्या लहान आकाराचे मोदक ती करायची. कारण जर मिठाचा मोदक दहा मोदकांनंतर आला तर किती मोदक खाणार? तितके खाता तर आले पाहिजेत ना? मग मी बालिश प्रश्न केला, “ जर पहिलाच मोदक मिठाचा आला तर…” ती म्हणाली, “देवाची मर्जी.”

हा कदाचित त्या वयात मला खूप कठीण असा नवस वाटला. पण तिची श्रद्धा आणि भक्ती पाहून मी अवाकही झाले.
एकदा एक बातमी वाचून मी हादरले. एका बाईने देवळात स्वतःची जीभ कापून आपला नवस पूर्ण केला! जीभ कापल्यावर पुढे काय झाले असेल, याचा फक्त आपण विचार करा.

कोणता तरी बाबा, कोणती तरी देवी, लालबागचा राजा, पुण्याचा दगडूशेठ हलवाई गणपती, शिर्डीचे साईबाबा, तिरुपती बालाजी कुठेतरी नवस बोलण्यासाठी आणि नवस फेडण्यासाठी तासनतास रांगेत उभे असलेली माणसे मी पाहिली आहेत. कोणाला तरी नवस बोलल्यावर काहीतरी फायदा होतो, हे ऐकल्यावर इतर अनेक माणसे नवस बोलू लागतात.

नवस बोलणे चांगले किंवा वाईट याविषयी मला कोणतेही वक्तव्य करायचे नाही. नवसाला देव पावतात किंवा नाही, याविषयी बोलण्याचा मला अधिकार नाही. काहीतरी अनुभव आल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात माणसे ‘नवस’ बोलत नसावीत, असा मनात विचार आला आणि दुसऱ्याच क्षणी एका पुस्तकामध्ये एक वाक्य वाचले –
“नवस करून बाईला मुलं होत असतील तर बाईला नवऱ्याची गरजच नाही.” हे संत गाडगेबाबांचे विचार आहेत.
राजकीय पुढारी असोत वा सिनेमातील कलाकार, श्रीमंत असो वा गरीब आजच्या काळातही मोठ्या प्रमाणात नवस बोलणारे / नवस फेडणारे भेटतच राहतात.

परवा एका देवस्थानाच्या पायरीवर पोटावर घसरत एक माणूस पुढे चालला होता. त्याच्याबरोबर माणसांचा लोंढा होता, ते कोणते तरी भजन म्हणत होते. मी क्षणभर थबकले. त्या लोंढ्यातला एका बाईला विचारले तर त्या म्हणाल्या, “यांनी नवस केला होता. फळ मिळाले आणि नवस फेडण्यासाठी हा पोटावर रांगत देवापर्यंत जात आहे.”
किती प्रसंग सांगू? कोणत्याही देवळात जा… तुम्हाला कुठे नारळं बांधलेली दिसतील, कुठे गंडेदोरे बांधलेले दिसतील, कुठे लाल ओढण्या बांधलेल्या दिसतील, तर आणखी कुठे काहीतरी.

डाॅ. अनुपमा उजगरे यांच्या ‘ख्रिस्ती स्त्रियांच्या जात्यावरच्या ओव्या’ या पुस्तकातील एक ओवी उद्धृत करते –
येत्या शुक्रवारी मी मंदिरी जाईन
फरशी केसांनी पुशीन, नवस
माझा फेडीन…

आता देशविदेशात मी फिरते आहे. तिथेही मला नवस बोलणारी आणि नवस फेडणारी माणसे दिसतात. अशा वेळेस श्रद्धाअंधश्रद्धेच्या पलीकडेसुद्धा काहीतरी असते असे वाटून जाते. अलीकडेच व्हिएतनामला गेले होते तेव्हा एका देवस्थानाच्या बाहेर असंख्य कुलपे लावून ठेवलेली होती. मनात आले ज्या नवसासाठी यांनी ही कुलपे लावली आहेत त्यांचे ते नवस पूर्ण होऊ देत जेणेकरून ही सगळी कुलपे उघडली जावोत. कुलपाच्या आत कोणाच्याही गरजवंतांच्या अपूर्ण इच्छा बंदिस्त राहू नयेत.

तसेच असंख्य झाडे, असंख्य जाळ्या, असंख्य खांब अशा अगणित ठिकाणी बांधलेल्या नवसाच्या ओढण्या, सुपाऱ्या, नारळ, गंडेदोरे, पाळणे, मेणबत्त्या आणि आणखी काही काही लवकरात लवकर तिथून कायमचे हटून जावोत. ती झाडे, त्या जाळ्या, ते खांब यांचेही जडत्व कमी होऊन त्यांनाही थोडा मोकळा श्वास घेता यावा!

pratibha.saraph@ gmail.com

Tags: navasVow

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

5 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

28 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago