ते दिवस, तो परिसर आणि त्या आठवणी…!

Share

राजरंग – राज चिंचणकर

जुन्या मुंबईचा, म्हणजे साधारण ४०-५० वर्षांपूर्वीच्या मुंबापुरीचा महत्त्वाचा भाग म्हणजे दक्षिण मुंबई आणि या परिसराचा केंद्रबिंदू म्हणजे गिरगाव…! याच गिरगावने मुंबापुरीला बरेच काही दिले. मूळ मुंबईकरांसाठी हा परिसर कायमच आपुलकीचा आणि जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे. याच गिरगाव परिसराने मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीला असंख्य कलाकार दिले. हे कलाकार त्यावेळी ‘गिरगावची शान’ म्हणूनही ओळखले गेले. आता काळाच्या ओघात यातल्या बऱ्याच मंडळींचे बस्तान सद्यस्थितीतल्या मुंबईच्या उपनगरांकडे सरकले असले, तरी आजही त्यांचा एक पाय कायम गिरगावातच असतो. अशा या गिरगाव परिसरात ज्यांची जडणघडण झाली आहे; असे आघाडीचे दोन रंगकर्मी म्हणजे जयवंत वाडकर आणि विजय पाटकर…! हे कलाकार त्यांच्या तिथल्या आठवणी जागवताना त्या दिवसांत रमून जातात…

आयुष्य जगायला शिकवले… – जयवंत वाडकर

गिरगावातल्या वास्तव्याने मला बरेच काही दिले. मी मूळचा चिराबाजारचा, म्हणजे माझा जन्मच तिथे झाला. साहजिकच, त्या परिसरातल्या सर्व गोष्टी मी जन्मापासूनच अनुभवत आलो आहे. माझ्या तिथल्या जडणघडणीत मी एक महत्त्वाचे शिकलो आणि ते म्हणजे कधी कुणाला काही अडचण आली की त्याच्या मदतीला धावून जायचे. याचा परिणाम अर्थातच माझ्यातला माणूस घडण्यावर होत गेला. प्रथम महानगरपालिकेची शाळा, नंतर चिकित्सक शाळा, युनियन हायस्कूल, हिंदू विद्यालय आणि त्यानंतर सिद्धार्थ कॉलेज असा माझा शैक्षणिक प्रवास झाला.

गिरगावातले जीवन आणि तिथले सण-उत्सव यांचा माझ्यावर मोठा पगडा आहे. गिरगाव म्हणजे सणांचे माहेरघर! विशेषतः गोविंदा, गणपती अशा उत्सवांच्या काळात गिरगावचा उत्साह ओसंडून जायचा. गणेशोत्सवात नाटके असायची आणि त्यात मी सुद्धा सहभागी होत असे. यातून माझी ‘स्टेज’ची भीती कमी झाली. त्यावेळी, वाडीत पडद्यावर दाखवला जाणारा सिनेमा हा आमच्यासाठी आकर्षणाचा भाग होता. गोविंदाच्या दिवशी ट्रकवरून फिरवल्या जाणाऱ्या देखाव्यांमध्ये आम्हीही असायचो. गिरगाव, मांडवी, डोंगरी, उमरखाडी या परिसरात आमचा हा ट्रकवरचा देखावा फिरत असे. माझ्या त्यावेळच्या सगळ्या अनुभवांचा उपयोग मला आज भूमिका रंगवताना तर होतोच; पण त्यासोबतच आयुष्य कसे जगायचे, हे त्या परिसराने मला शिकवले. यातून मी आणि माझ्यातला कलाकार घडत गेला. तिथल्या प्रत्येक व्यक्तीकडून मी काही ना काही शिकत गेलो. आमच्या चिराबाजारच्या घरी आजही गणपती असतो आणि काहीही झाले तरी बाप्पासाठी पहिला व शेवटचा दिवस मी आजही गिरगावातच असतो.

अवलोकनाचा उपयोग झाला… – विजय पाटकर

दक्षिण मुंबईत वसलेल्या भेंडीबाजारच्या इमामवाडा परिसरात मी वाढलो. आता मी ज्या क्षेत्रात आहे; त्याचा पाया वगैरे काही भेंडीबाजारात रचला गेला नाही. पण तिथे राहून मला विविध प्रकारची माणसे मात्र पाहायला मिळाली. आमच्या भागात विविध धर्माचे लोक राहात असल्याने, मला त्यांची वैशिष्ट्ये जवळून टिपता आली. या अवलोकनाचा उपयोग मला पुढे भूमिका करताना झाला.

एखाद्या परिसराकडे तुम्ही कसे पाहता, यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. आमच्या या भागातले वातावरण खूप वेगळे होते; त्यामुळे माझी वाट कदाचित चुकलीही असती. पण तिथे मला योग्य दिशा मिळाली ती साने गुरुजी कथामालिकेमुळे! साहजिकच, मला चांगल्या संस्कारांची शिदोरी मिळाली. वाईट गोष्टी करण्यापासून माझे कुटुंब मला कायम परावृत्त करत राहिले; त्यामुळे माझी पावले चुकीच्या दिशेकडे वळली नाहीत. एकमेकांना सहकार्य करणे, मिळून मिसळून राहणे हे तिथले वैशिष्ट्य होते. तिथले वास्तव्य मला रोज काहीतरी नवीन शिकवत गेले. सणासुदीच्या काळात तर सर्वजण हटकून एकत्र येत आणि मिळून उत्सव साजरे करत. तो परिसर, तिथली माणसे, त्यांची स्वभाववैशिष्ट्ये, त्यांचे जीवनमान अशा सगळ्या गोष्टींचा माझ्यावर प्रभाव पडत राहिला आणि आपसूकच या सगळ्याचे प्रतिबिंब पुढे माझ्या विविध भूमिकांमध्ये पडत गेले. माझ्यात दडलेल्या कलावंताला माझ्या तिथल्या जीवनमानाचा खूप उपयोग झाला.

Recent Posts

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

39 minutes ago

IND vs PAK Tension: प्रत्येक हल्ल्याला चोख उत्तर देऊ, जयशंकर यांनी EUला दिली पाकिस्तान हल्ल्याची माहिती

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…

2 hours ago

भारताने लाहोर-सियालकोटमध्ये केला हल्ला, पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त

नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…

2 hours ago

PBKS vs DC, IPL 2025: मोठी बातमी! पाकिस्तान हल्ल्यादरम्यान रद्द झाला पंजाब-दिल्लीचा IPL सामना

धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…

3 hours ago

Jammu Drone Attack : पाकड्यांची मस्ती काय थांबेना! जम्मूत ड्रोन हल्ला, पठाणकोठमध्ये स्फोट, जम्मूमध्ये ब्लॅकआऊट

जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…

3 hours ago