अबोला धरणाऱ्यांना आपली कधीच गरज पडणार नाही?

Share

यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ज्यांना तुम्ही आपलं म्हणत आहात, नातेवाईक म्हणत आहात, जवळचे समजत आहात, ज्यांच्यात तुम्ही गुंतलेले आहात ते खरंच तुम्हाला आपलं मानतात का? ते तुमचे आहेत का? त्यांना पण तुमच्याबद्दल तेवढंच प्रेम, ओढ, आदर, आपुलकी, जिव्हाळा आहे का? हे सगळं फक्त बोलून आहे की कृतीतून ते सिद्ध होत आहे हे जाणून घ्या.

मीनाक्षी जगदाळे

अनेक कौटुंबिक समस्या घेऊन लोकं जेव्हा समुपदेशनाला येतात तेव्हा बहुतांश घरातील लोकांची समस्या असते ती म्हणजे घरातील नातेवाइकांचा अबोला! कुटुंब मोठं असो छोटं असो रुसवे-फुगवे, वादविवाद, मतभेद हे असतातच. अनेक समजूतदार घरामध्ये, चांगले विचारविनिमय असलेल्या घरातील सदस्यांमध्ये घरातील सर्व समस्या, अडचणी एकमेकांना विश्वासात घेऊन, धीर देऊन, आधार देऊन, मदत करून, चर्चा करून सोडवल्या जातात. तर अनेक घरांमध्ये जिथे लोकांची मनस्थिती कमकुवत आहे, विचार करण्याची, परिस्थिती समजावून घेण्याची कुवत नाही त्याठिकाणी एकमेकांना दोष देऊन, कोणावरही खापर फोडून, एकमेकांना टोमणे मारून, अबोला धरून, भांडणे करून, लपवा-छपवी करून, निंदा-नालास्ती करून, अधिक गैरसमज पसरवून घरातलेच लोक घरातल्या आपल्याच माणसांना बदनाम करण्यात धन्यता मानतात.

ज्या घरामध्ये सतत एकमेकांना अंधारात ठेवलं जातं, सत्य लपवलं जातं, एकमेकांशी व्यवस्थित संवाद साधला जात नाही, सतत दिशाभूल केली जाते, माघारी बोललं जातं, जिथे सतत घरात राजकारण, कुटनीती, संभ्रम, संशय आरोप-प्रत्यारोप याच गोष्टींचा साम्राज्य असतं ते घर आणि ती माणसं कधीच प्रगती करू शकत नाहीत. हे समुपदेशनाच्या प्रकरणातून लक्षात येते. अनेक घरातील लोकांना आपल्याशी कोणी अबोला धरला, व्यवस्थित बोललं नाही, चांगलं वागलं नाही, आपल्याला एकटं पाडलं आहे याचा खूप त्रास होतो. जे लोकं मनाने हळवे असतात, भावनांशील असतात, सगळ्यांना आपले जवळचे मानणारे आणि नात्यावर विश्वास ठेवणारे असतात, ज्यांना कुटुंब तुटू नये असं वाटतं असतं त्यांना असे चुकीचे वाईट अनुभव आल्यावर खूप त्रास होतो, मनस्ताप होतो आणि त्यांच खूप खच्चीकरण होत आहे अशी त्यांची तक्रार असते. घरातलीच लोकं आम्हाला वेगळी, परकी वागणूक देतात, घरात ग्रुप केलेले आहेत, घरात एकोपा, एकजूट नाहीये याचा त्यांना त्रास होत असतो. यामुळे घरात सतत धुसफूसणारं वातावरण असतं. मनमोकळे, प्रसन्न, आनंदी कोणीच नसतं, सगळेच मनात कुढत असतात आणि तरीही एकमेकांना त्रास देत असतात. अनेक लोकं सांगतात की आमच्याच घरात काय चाललंय ते आम्हाला माहिती नसतं. काही घडो अथवा न घडो अचानक आम्हाला वेगळं एकटं पाडलं जातं, काही सदस्य आमच्याशी बोलणं बंद करतात, आमचे फोन घेत नाहीत, समोर आले तरी आम्हाला प्रतिसाद देत नाहीत, मोबाईलवर आम्ही कितीही चांगलं बोलण्याचा प्रयत्न केला, त्यांना चांगला मेसेज पाठवला तरी त्यातून आम्हाला उलटंच बोललं जात, अर्थाचा अनर्थ केला जातो किंवा काहीच प्रतिसाद मिळत नाही.

आजकाल तर मोबाईलला एकमेकांना ब्लॉक करणे, ब्लॅक लिस्टला टाकणं यामुळे मनस्तापात अधिक भर पडली आहे. आता लोकं अशी का वागतात हे समजावून घेऊ आणि त्यांच्या या वृत्तीचा आपण का आणि किती त्रास करून घ्यायचा? हे आपल्यावर कसं अवलंबून आहे हे पण पाहू. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहे ज्यांना तुम्ही आपलं म्हणत आहात, नातेवाईक म्हणत आहात, जवळचे समजत आहात, ज्यांच्यात तुम्ही गुंतलेले आहात ते खरंच तुम्हाला आपलं मानतात का? ते तुमचे आहेत का? त्यांना पण तुमच्याबद्दल तेवढंच प्रेम, ओढ, आदर, आपुलकी, जिव्हाळा आहे का? हे सगळं फक्त बोलून आहे की कृतीतून ते सिद्ध होत आहे हे जाणून घ्या. कोणतंही नातं दोन्हीकडून सारखं योगदान असेल तरच टिकू शकत, बहरू शकतं हे व्यवस्थित तपासून त्या व्यक्तीला तेवढंच महत्त्व द्या. जे तुम्हाला आपलं मानत नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा करणं पूर्णपणे सोडून द्या. तुमच्याशी कोणी कोणत्याही कारणास्तव बोलत नाहीये किंवा बोललं तरी त्याच्या बोलण्यात राग, द्वेष, तिरस्कार, वाद घालण्याची वृत्ती, ओरडाआरडा करून स्वतःचं खरं करण्याची प्रवृत्ती आहे, अशा लोकांना शांतपणे एक-दोन वेळा समजावून घेण्याचा आणि समजावून सांगण्याचा प्रयत्न करून बघा. त्यानंतर पण त्यांच्यात काहीच सुधारणा होत नसेल तर ते आणि त्यांचा स्वभाव बदलण्यापलीकडे आहे असं समजून विषय सोडून द्या, पण स्वतःला त्रास करून घेऊ नका. अशा लोकांच्या गावी पण नसतं की त्यांच्या वागणुकीमुळे तुम्हाला किती त्रास होत आहे. लोकं असं का वागतात हे पहिले समजावून घ्या. असे वागणाऱ्या लोकांची शैक्षणिक पात्रता प्रथम लक्षात घ्या. शिक्षणाने माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते, विचार, आचार प्रगल्भ होतात, सकारात्मक विचारशैली जागृत होते. त्या व्यक्तींचा सामाजिक आयुष्य लक्षात घ्या. ते समाजात कोणत्या स्थानावर आहेत, किती आणि कशा प्रकारच्या बुद्धिमान, कर्तृत्ववान, अनुभवी आणि हुशार लोकांच्या सहवासात ते कामं करतात, बोलतात, राहतात हे जाणून घ्या. अशा वागणाऱ्या लोकांचं बालपण, पूर्व आयुष्य समजावून घ्या. त्यांनी स्वतःच्या विकासासाठी, स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःला अधिक समृद्ध बनवण्यासाठी किती वेळ दिला आहे यावर विचार करा.
meenonline@gmail.com

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

1 hour ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

1 hour ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

2 hours ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

2 hours ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

2 hours ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

4 hours ago