जळगाव: बंगळुरू एक्सप्रेसच्या धडकेत जळगाव जवळील परांडा रेल्वे स्थानकाजवळ तब्बल ११ प्रवाशांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जळगावहून मुंबईला जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याच्या भीतीने काही प्रवाशांनी चालत्या गाडीतून उड्या मारल्या. मात्र, त्याचवेळी समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्सप्रेसच्या खाली चिरडल्याने या प्रवाशांचा दुर्दैवी अंत झाला. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी अपघातातील मृतांच्या वारसांना ५ लाखांची मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, “माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसंच पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. ८ रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसंच नजीकच्या इतर खासगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आलं आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.”
Deeply saddened by the tragic loss of lives in an unfortunate incident near Pachora in Jalgaon district. My deepest condolences to the affected families. 🙏
My colleague Minister Girish Mahajan and the Superintendent of Police are already at the site, with the District Collector… https://t.co/MbS8rCdzDu— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 22, 2025
या अपघातानंतर जखमींना जवळच्या दवाखान्यात हलवण्यात येत आहे. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “अपघातातील सहा ते सात प्रवासी आहेत त्यांना बंगळुरु कर्नाटक एक्सप्रेसने उडवलं आहे. या दुर्घटनेच्या ठिकाणी मदत आणि बचावकार्य सुरु केलं आहे.” सात ते आठ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे असंही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. जखमींना आम्ही तातडीने ग्रामीण रुग्णालयासह एकूण तीन रुग्णालयांमध्ये दाखल करतो आहोत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. तसंज जळगावच्या सिव्हील हॉस्पीटलच्या डीनने ११ मृतदेह रुग्णालयात आणल्याचं तसंच ४० जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती दिली आहे.
दिल्लीतील रेल्वे बोर्डाच्या माहिती आणि प्रसिद्धी विभागाचे कार्यकारी संचालक दिलीप कुमार यांनी म्हटलं की, काही प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमध्ये साखळी ओढली आणि ट्रेनमधून खाली उतरले. बेंगळुरू-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस दुसऱ्या बाजूने येत होती. आम्हाला काही प्रवाशांना धडक बसल्याने गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे. अनेक लोक भुसावळहून ट्रेनमध्ये चढले होते आणि त्यापैकी एकाने अलार्म चेन ओढली. त्यानंतर, ते ट्रेनमधून खाली उतरले आणि चुकीच्या पद्धतीने रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला किंवा रुळांवर उभे होते. यामुळे त्यांना ट्रेनने धडक दिली. भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक घटनास्थळी रवाना झाले आहेत, वैद्यकीय पथक तेथे आहे, स्थानिक प्रशासन देखील तेथे आहे. रेल्वेचे वरिष्ठ विभाग अभियंता देखील तेथे आहेत. इतर वरिष्ठ डॉक्टर आणि रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.
मंत्री गिरीश महाजन म्हणाले की, जळगाव टीमचा मला फोन आला, मी लगेच तिकडे निघालो असून १० ते १२ जण या अपघातात दगावल्याची माहिती आहे. ही घटना खूप दुर्दैवी असून घटनेसंदर्भातील माहिती प्रत्यक्षदर्शी गेल्यावरच मिळेल. अपघातातील जखमींना मदत व उपाचारासाठी सर्वतोपरी काम केले जाईल. पाचोऱ्यापासून १५ ते २० मिनिटांच्या अंतरावर ही घटना घडली असून तेथील रुग्णालयात जखमींवर उपचार केले जातील, त्यासाठीची तयारी रुग्णालयाकडून करण्यात आली आहे, अशी माहिती यांनी दिली.
मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, मी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बोललो असून रेल्वे स्थानकावर ट्रेन उभी होती, तेव्हा लोहमार्ग क्रॉस करताना ही दुर्दैवी घटना घडल्याचे समजते, मात्र हे निश्चित नाही.