टीव्ही माध्यमाच्या आहारी गेलेल्या मराठी प्रेक्षकांना गृृृहीत धरणे अगदी सहज शक्य असते. मराठी प्रेक्षक जे टीव्हीवरील सीरियल्स हेच मनोरंजनाचे सशक्त माध्यम समजत असतात, नाटक या माध्यमाबाबत अशा प्रेक्षकांचे मत विचारशून्य असते. टीव्हीवरील सीरियल कलाकार हमखास प्रत्यक्षात दिसण्याचे ठिकाण म्हणजे या कलाकारांचा सहभाग असलेली मराठी नाटके. चला हवा येऊ द्या, हास्यजत्रा, बिगबाॅस अशा कथानक विरहित सीरियल्समधून काही क्षणांचे मनोरंजन ही मंडळी हमखास घडवून आणत असतात. त्यात ते लोकप्रिय होतात व आपल्या अभिनयावरील काॅन्फिडन्स, स्वर्ग दोन बोटांवर उरल्याप्रमाणे त्याना भासत राहतो. मराठी नाटकेही आपल्यामुळे हीट ठरतील, पैसा कमावतील व गेला बाजार आपले इंडस्ट्रीतील स्थान घट्ट होऊन पुन्हा पुढल्या सीरियल्स पदरात पाडून आपले फेस व्हॅल्यूचे दुकान चालवायला ही मंडळी मोकळी असतात. आपल्या फेसव्हॅल्यूमुळे नाटके धो-धो पैसा कमावणारी असावीत हा दुर्दम्य आशावाद त्यामागे असतोच. त्या नाटकातील सहभागी कलाकारांना प्रत्यक्षात बघायला मिळते या एकाच गोष्टीवर प्रेक्षक त्यांना अशा काही उंचीवर नेऊन ठेवतात की, योग्यता नसलेल्यांना सेलिब्रिटी स्टेटस प्राप्त होतो. १९९२ नंतर लोकप्रियतेचे समीकरणच कोसळले आहे. (१९९२ का? तर त्याचे विवेचन पुढे येईलच). कारण नटाची लोकप्रियता अभिनयात नसून दिखाव्यातच आहे हे त्यांनाच कळून चुकले आहे. नटांची लोकप्रियता ही कुठल्याही माध्यम निर्मितीच्या प्रवासातील वाटमारी ठरली आहे…! (काय वाक्य सुचलंय…! वा…!) तर अशा बदललेल्या समीकरणांच्या काळात येऊ घातलेले मनोरंजन सवंग, लघुकालिन, व्यक्तिकेंद्री आणि कंपूसापेक्षी असेल ही भविष्यवाणी १९९२ साली निदर्शनास आली.
हा मुद्दा जरा स्पष्ट करायला हवा…! नाटक हे भाषेच्या परस्पर संपर्काचे साधन समजले जाते. जिथे नव्या पिढीची भाषाच बदलली तिथले कम्युनिकेशन हे सवंग होतेच. त्यामुळे नव्या नाटकांचे भाषिक सौंदर्य पार लयाला गेले. दुसरा मुद्दा लघुकालिन (शाॅर्टटर्म) विचारसरणीचा. सहा महिने वर्षभरात जे कमावता येईल ते कमवायचे आणि नंतर पुढल्या प्राॅडक्शनच्या कामाला लागायचे. हा अॅटीट्युड घेऊनच निर्माता त्या सीरियलच्या नटाला कॅप्चर करत असतो. तिसरा मुद्दा व्यक्तिकेंद्री नाटकांचा. टीव्हीवर सातत्याने दिसणाऱ्या एखाद्या नटाची वा नटीची फेसव्हॅल्यू (थोबाडदर) कॅश करून घेऊन मोकळे होणे व चौथा मुद्दा म्हणजे कंपूसापेक्षी पद्धती. हल्ली येणारी नाटके पर्टिक्युलर वर्गासाठी निर्माण केली जायला लागली. तो वर्ग हा कंपूमध्ये परावर्तीत करून तात्पुरत्या फायद्याभोवती या नाटकांचे अर्थकारण फेर धरून नाचत असते, तर अशा रीतीने हे विवेचन, सैद्धांतिक आणि थोडे क्लिष्ट झाले आहे. थोडक्यात म्हणायचे काय? तर सीरियलमधून दिसणाऱ्या कलाकारांनी लाँगटर्म नाटक माध्यमाची पुरती वाट लावली आहे. खऱ्या अर्थाने हेच ते रंगभूमीचे शत्रू गाजराची पुंगी वाजवत फिरत आहेत… आणि याला जबाबदार केवळ आणि केवळ प्रेक्षकच आहेत. मनोरंजनासाठी चांगली नाटके कुणाला बघायची नाहीत? परंतु त्यांची शहानिशा तरी प्रेक्षकांकरवी केली जावी. फसव्या जाहिरांतीपासून सावधानतेचा इशारा आता नाटक, सिनेमांबाबतही देण्याची गरज आहे. कारण एका नाटकामागे एका प्रेक्षकाचा सरासरी खर्च एक हजार रुपये झालाय. अशा चीप नाटकांमुळे वाट्यास आलेला भुर्दंड सरसकट मराठी नाटकांबाबतचे नकारात्मक मत तयार करते. अशावेळी ती नाटके पडलेली नसतात, तर शाॅर्टटर्म विचार करत मिळालेल्या गल्ल्यावर हात मारून पोबारा करणारी असतात. नाटक चालले नाही, पडले तर जे दुःख १९९२ साला अगोदर होत असे, ते आता राहिलेले नाही. याद गयी साथ गयी, सो… रात गयी बात गयी…!
हे सर्व विवेचन उदाहरणादाखल नाटकांची नावं जाहीर करायला खरे तर काहीच हरकत नाही पण माझी कमलाकर नाडकर्णींइतके धाडस नाही. त्यातही एखाद्या निर्मात्याला चांगले म्हटले म्हणून तो सद्य स्थितीत पुढल्या निर्मितीत माती खाणार नाही हे खात्रीने सांगताच येत नाही. हल्लीच “सीरियल किलर” या भाऊ कदमांचे नाटक बघण्याचा योग आला. मी जे वरील लिखाणात म्हंटलेय तेच नाटककाराला जेमतेम दोन तासांच्या स्किटमधून म्हणायचे आहे. केदार देसाई यांनी अत्यंत निर्जीव कथासूत्रात भाऊ कदम नामक जीव ओतलाय. टीका करावी असे या नाटकात काहीही नाही, तरीही प्रेक्षक नाटक पाहून समाधान पावेल असं काही म्हणता येत नाही. आपण हे नाटक नेमके का पाहिले? यावर मी देखील अजूनही विचार करतोय. भाऊ कदमांच्या एकंदर अॅपिअरंसवर प्रेम करणारे माझ्यासारखे अनेक प्रेक्षक आहेत पण तिकीट बारीवरचे कलेक्शन रोडावले अथवा भाऊ कदमांना मोठा प्रोजेक्ट गावला की किलर बंद होणार यात शंका नाही. लाँगटर्मसाठी चालणारे हे काही ‘करून गेलो गाव’ नाही. त्यामुळे वाजतेय तितकी पुंगी वाजवावी न वाजल्यास मोडून खावी. छोट्या भूमिकांमध्ये एनर्जिटीक दीपाली जाधव आणि अश्विनी कुलकर्णी भाऊ कदमांना छान साथ देतात; परंतु आडातच नाही तर पोहोऱ्यात त्या तरी आणणार कुठून? असो…याला अपवाद देखील सीरियलवाल्यांची काही नाटके आहेत पण एका हाताच्या बोटांवर मोजण्या इतपतच…! नाटक माध्यमांसाठी किलर ठरलेल्या या अल्पायुषी कलाकृतींचा सीरियसली विचार व्हावा.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…