विदूषक या विषयावर पीएच. डी. !

Share

मेघना साने

‘विदूषक’ हा संशोधनाचा विषय असू शकतो हे खरे वाटेल का तुम्हाला? पण हे खरे आहे! मोनिका ठक्कर लहानपणापासून विदूषकाची फॅन होती. लहानपणी मोठा भाऊ व त्याचे मित्र तिला सर्कशीला घेऊन जायचे तेव्हा विदूषकाची तिला फार गंमत वाटायची. विदूषक हसला की ती हसायची आणि त्याला कोणी त्रास दिला की ती रडायची. विदूषकाला चोप दिल्यावर लोक हसतात का याचे तिला कोडे पडायचे. पूर्वी गुजराती परिवारात मुली एवढ्या शिकत नव्हत्या. लवकरच लग्न होत. पण मोनिकाने उच्च शिक्षण संपादन करून सर्वांचे कौतुक झेलले. लोककलेचा अभ्यास करताना सर्कशीतील विदूषक, लहानपणी खेळण्यात मिळालेला जोकर, यासारखी खेळणी बाजूला ठेऊन, ती विदूषकाची संकल्पना विस्तृतपणे समजून घेऊ लागलेली. लोककलेच्या प्रांगणात विदूषक विविध कार्यक्रमात असतो. भरतमुनींच्या नाट्यशास्त्रापासून संस्कृत नाटक, लोककला यातील विदूषक हा अनेक कलांनी युक्त असा बुद्धीमान कलाकार असतो. त्याला संवाद, नृत्य ,गायन याचे ज्ञान असते. मग सादरीकरणात त्याला केंद्रस्थानी का समजू नये? उलट विदूषकाची भूमिका करणारी व्यक्ती नेहमी डावलली जाते. मोनिकाने लोककलेच्या विविध सादरीकरणातील विदूषक या संकल्पनेचा, पात्राचा अभ्यास केला. आज विदूषक रंगभूमीशिवाय इतरही काही ठिकाणी असल्याचे तिला आढळून आले. दिल्लीचे भट हे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी विदूषकाची भूमिका साकारत हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांना हसवतात. हे एक प्रकारचे समाजकार्यच आहे. मोनिका ठक्करने विदूषक या विषयावर आपला प्रबंध डॉ. प्रकाश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केल्यानंतर तिला पीएच. डी. पदवी मिळाली. आपला प्रबंध तिने पुस्तक रूपाने सादर केला. ‘विदूषकाची संकल्पना, बदलत्या स्वरूपाचा विचार’ हे मोनिका ठक्कर लिखित पुस्तक प्रकाशित झाले.

लोकसाहित्याच्या महामेरूतून अनेक ज्ञानसरिता उगम पावतात हे तिच्या लक्षात आले. कीर्तनातून नाटकाचा जन्म झाला. आजही नाटकात वग, तमाशा इत्यादी डोकावतात. नाट्यशात्राचा अभ्यास करावा असे तिला प्रकर्षाने वाटले. नाट्यशास्त्राची ‘मास्टर ऑफ फाइन आर्ट्स’ ही पदवी तिने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातून घेतली. ‘मास्टर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ ही पदवी देखील संपादन केली. नाट्यकलेचे विस्तृत क्षितिज तिच्या दृष्टीक्षेपात येऊ लागले. मराठी नाटक आणि मराठी लोककला या विषयावर तिने ‘इंडियन सोसायटी फॉर रिसर्च इंटरनॅशनल ‘मध्ये काही रिसर्च पेपर सादर केले. लोकसाहित्य आणि नाटक या साहित्यप्रकाराचा अभ्यास केल्यावर तिने ‘लोकरंग आणि नाट्यरंग’ असे एक पुस्तक लिहिले. यात महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील लोककला प्रकारांवर लेख आहेतच आणि नाटकाचे विविध घटक असतात याची माहिती दिली आहे. याशिवाय एक महत्त्वाचे मत तिने नोंदवले आहे. ते म्हणजे “नाट्यशास्त्र शिकण्यासाठी आज गुरुकुल पद्धतीची गरज आहे.’’

नाटकात अभिनेत्री किंवा अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा बाळगणारे अनेक असतात. पण त्यासाठी लागणारे शिक्षण काय असते याची त्यांना कल्पना नसते. मोनिकाने ‘इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रबंधम एवं फिल्म प्रोडक्शन’ यातही पदवी संपादन केली. कथक ‘नृत्य भूषण’ तर ती होतीच. पुढे नाटकात, चित्रपटात अनेक भूमिका गाजवत गेली. नाटकाचे लेखन व दिग्दर्शन देखील तिच्याकडून झाले. हिंदी, मराठी, गुजराती याशिवाय भोजपुरी आणि राजस्थानी या बोलीदेखील तिने आपल्या मित्र-मैत्रिणींकडून शिकून घेतल्या होत्या. मोनिकाच्या अभ्यासू वृत्तीमुळे अनेक मान्यवरांच्या ती परिचयाची झाली होती. लोककला अकादमीतर्फे संमेलने आयोजित करताना तिचे अभ्यासपूर्ण निवेदन ही श्रोत्यांच्या स्मरणात राहते. या गुणांमुळे तिला एक उत्तम संधी मिळाली. एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तीबरोबर काम करून एका उत्कृष्ट ग्रंथाची निर्मिती करण्याचे श्रेय मिळाले. या ग्रंथनिर्मितीची कहाणी अशी की, पन्नास-साठ वर्षांपूर्वी श्री. रामदास प्रभुगावकर यांनी संशोधन करून गोव्यातील लोककलेच्या अनेक प्रकारांची माहिती जमवून ठेवली होती. ती त्यांनी प्रकाशकांना दिली. दुर्गा भागवत यावेळी त्यांचे अभ्यास मंडळावर होत्या. त्यामुळे त्यांच्याकडे ती माहिती दिली गेली. पण या सर्व माहितीचे योग्यप्रकारे संकलन करून ती ग्रंथरूपात साकार करण्यासाठी या विषयाचा अभ्यास असणारी आणि लेखनाचा अनुभव असणारी कोणीतरी मेहनती व्यक्ती त्यांना हवी होती. दुर्गाबाईंच्या हयातीत ते पुस्तक होण्याचा योग आला नाही.

मोनिकाने रामदास प्रभुगावकर यांच्या पहिल्याच भेटीत हे शिवधनुष्य उचलून दाखवेन असा विश्वास त्यांना दिला. त्याप्रमाणे वर्षभर करून तिने त्यांचे पुस्तक तयार करून दिले. या पुस्तकाचे लेखक रामदास प्रभुगावकर आणि संपादक मोनिका ठक्कर यांचे नाव असणार होते. ‘धालो ते धूलपद, गोमंतकीय लोक संपदा’ असे या पुस्तकाचे नाव ठरले. ‘पन्नास वर्षे पडून राहिलेली ही सरस्वती तुझ्यामुळे स्थानापन्न झाली.’ असे शब्द ऐकून मोनिकाला धन्य वाटले. मोनिकाची चाळीशी ओलांडायच्या आतच नाटकाचा एक प्रदीर्घ अनुभव तिच्या गाठीशी होता. अनेक नाटकांचे लेखन, दिग्दर्शन करणे, नाट्य महोत्सवात सहभागी होणे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाचे नाटक या ज्ञान मंडळाचे समन्वयक म्हणून नामवंत व्यक्तींबरोबर काम पाहणे आणि लोककला अकादमीचे डॉ. प्रकाश खांडगे आणि डॉ. गणेश चंदनशिवे यांच्यासारख्या ज्ञानी मंडळींसोबत काम करणे यातून मोनिकाने स्वतःलाच संशोधक म्हणून उत्तम घडविले. ‘Folk Theatre Forms of Maharashtra’ हे तिचे पुस्तक परदेशातही गाजले. तेथील अभ्यासकांसाठी हे उत्तम संचित ठरले आहे.

meghanasane@gmail.com

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

37 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago