Friday, May 9, 2025
Homeसाप्ताहिककिलबिलदोन विळे : कविता आणि काव्यकोडी

दोन विळे : कविता आणि काव्यकोडी

गावच्या एका घरात,
दोन विळे होते
त्यांचे वागणे मात्र,
बरेच वेगळे होते

एक विळा कोपऱ्यात बसून,
गंजून गेला होता
दुसरा विळा काम करून,
लखलख करीत होता

गंजलेला विळा एकदा,
लखलखत्या विळ्याला म्हणाला,
“तू एवढं काम करतोस,
पण जाणीव आहे का मालकाला?

धार लावण्यासाठी तुला,
दगडावर तो घासतो
सदानकदा कामामध्ये,
वापरत तुला असतो
पण मी बघ कसा अगदी,
आरामात बसून राही
तुझ्यासारखे कष्ट बघ,
मुळीच मला नाही”

आता लखलखता विळा,
गंजलेल्या विळ्याला म्हणाला,
“अरे जीवन सार्थ करायचे तर,
उपयोगी पडावे जनाला
मी माझ्या कामाने,
लोकांच्या लक्षात राहील
नुसते गंजून पडण्यापेक्षा,
चांगले करून जाईन!”

काव्यकोडी – एकनाथ आव्हाड

१) पापुद्र्यावर पापुद्रे
अंगावर चढवतो
पापुद्रे काढताच
कोण बरं रडवतो?

२) बी रुजते
कोंब येतो
कोंबाचाच
अंकुर होतो

चिमुकली पाने
फुटतात जेव्हा
मग यालाच काय
म्हणतात तेव्हा?

३) मिठाच्या सोबत
मिरची असे
हळदीच्या सोबत
कुंकू दिसे

चाऱ्यासोबत
येते पाणी
सोन्याच्या सोबतीला
यायचं कुणी?

उत्तर

१) कांदा
२) पालवी
३) चांदी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -