ईव्हीएमला दोष देण्यापेक्षा पराभवाची कारणे शोधा

Share

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे काँग्रेसप्रणीत महाविकास आघाडीचा धुव्वा उडाला आहे. २८८ जागा असलेल्या विधानसभेत महायुतीला २३६ जागांवर विजय मिळाल्याने, दोन दिवस उलटून गेल्यानंतरही पराभव कशामुळे झाला याचा अंदाज महाविकास आघाडीला लागत नाही. त्यातूनच उबाठा सेनेचे नेते व कार्यकर्ते यांनी पराभव खिलाडूवृत्तीने न स्वीकारता त्याचे खापर ईव्हीएम मशीनवर फोडले आहे. उबाठा सेनेच्या आरोपाला महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गट पाठबळ देत आहेत. जणू महाराष्ट्रातील महायुतीचा विजय हा ईव्हीएमचा चमत्कार आहे, असा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. एवढेच नव्हे तर ईव्हीएमच्या विरोधात आता जनआंदोलन उभारण्याची भाषा विरोधी पक्षांतील नेत्यांकडून केली जात आहे. हरियाणामध्ये काँग्रेस हरली. जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस नॅशनल कॉन्फरन्स जिंकली.

२३ नोव्हेंबर रोजी लागलेल्या निकालामध्ये झारखंडमध्ये काँग्रेस इंडिया आघाडी जिंकली. मात्र महाराष्ट्रात काँग्रेसचा सहभाग असलेली महाविकास आघाडी हरली. खरं तर हरल्यानंतर प्रत्येक पक्षाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. आपली ध्येयधोरण ही कितपत जनतेला आवडतात याचा विचार करायला हवा; परंतु तसे न करता, ईव्हीएमवर खापर फोडले, तर आपल्या पक्षातील नेत्यांच्या आणि पक्षांच्या चुका झाकण्यास मदत होईल, असेच बहुधा त्यांना वाटत असावे. लोकसभा निवडणुकीच्या आधी सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. यावरील याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत, पुढील निवडणुका ईव्हीएम मशीनवर होतील, असे खंडपीठाने स्पष्ट केले होते. मात्र या निवडणूक प्रक्रियेतील तांत्रिक दोष दूर करून, उमेदवार आणि मतदारांचे समाधान व्हायला हवे, अशा सूचना निवडणूक आयोगाला न्यायालयाने दिल्या होत्या.दरम्यान, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान, तज्ज्ञांचा एक अहवालही मागितला होता. त्यातून ईव्हीएम हॅक होऊ शकते, याचा पुरावा कोणालाही देता आला नव्हता. आता मुंबईत उबाठा सेनेला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी, आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात, वरुण सरदेसाईंच्या वांद्रे (पूर्व) मतदारसंघात व सेना भवनाची वास्तू असलेल्या माहीम मतदारसंघात उबाठा सेनेला यश मिळाले. तो विजय ते नाकारणार आहेत का? किंवा या मतदारसंघातील ईव्हीएम मशीनची तपासणी झाली पाहिजे, अशी मागणी करताना कोणी दिसत नाही. लाडक्या बहिणी, युवावर्ग, शेतकरी व कामगार वर्ग भक्कमपणे सरकारच्या बाजूने उभा राहिल्यानेच महायुतीला मोठा विजय मिळाला आहे.

त्याचप्रमाणे, जगभरात इस्लामीकरणाचा प्रसार वेगाने होत आहे. ब्रिटन, फ्रॉन्ससारखे देशही या संकटातून कसे बाहेर पडावे याचा विचार करताना दिसत आहेत. त्यात मुंबईसह राज्यात गेल्या काही वर्षांत लव्ह जिहाद, लॅन्ड जिहाद यांसारख्या घटना घडत असल्यानेच, युवा हिंदू नेतृत्व आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या मेळाव्याला हजारोंची उपस्थिती लाभत होती. हा जनतेमधील अंडर करंट ओळखायला विरोधकांना वेळ मिळाला नाही. त्यातून विशिष्ट धर्माची मते कशी आपल्या बाजूने राहतील याची रणनिती महाविकास आघाडीतील नेत्यांनी आखल्याचा फटका बसल्याचे निकालातून दिसून आले आहे.

पूर्वी बॅलेट पेपरवर मतदान होत असे; परंतु मतदान केंद्र ताब्यात घेणे. मतपेट्या पळविणे असे गैरप्रकार घडले आहेत. तसे पाहायला गेले तर नवीन तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास आपल्याला वेळ लागला. भारतात पहिल्यांदा जवळपास ४० वर्षांपूर्वी ईव्हीएम वापरण्यात आले. १९८२ च्या केरळ विधानसभा निवडणुकी दरम्यान, परूर या एका मतदारसंघात ईव्हीएम मशीन वापरण्यात आले. या निवडणुकीत ईव्हीएमचा वापर हा एक प्रयोग होता. तेव्हा त्यावेळचे काँग्रेसचे उमेदवार, ए. सी. जोस यांनी पहिल्यांदा ईव्हीएमवर निशाणा साधला होता. मात्र ईव्हीएमच्या मतमोजणीत काही गैरप्रकार होतो असा तो आरोप नव्हता, तर त्याचा वापरच बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद जोस यांनी सर्वोच्च न्यायालयात केला होता. ए. सी. जोस देखील तेव्हा निवडणूक हरले होते. ईव्हीएम ब्लेम गेमसाठी होता, हे न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. देशभरात २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम हटाव, देश बचाव असा नारा देत काही संघटनांकडून दिल्लीत जंतर-मंतरवर आंदोलन करण्यात आले होते. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालयातील वकिलांकडून याचिका दाखल करून ईव्हीएम बंद करण्याची मागणी करण्यात आली होती.

गडबडीचा आरोप होत असेल, तर त्यात सुधारणा करायला हव्यात; परंतु ईव्हीएम मशीनवरून पुन्हा बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया राबविण्याचा विचार म्हणजे देशाला पुन्हा मागे नेण्यासारखे आहे, अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली होती. लोकसभा निवडणुकीत भाजपाला २४० जागा मिळाल्या. २७२ चा बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता. जर केंद्र सरकारच्या हातात सर्व यंत्रणा असती, तर ४०० पारचा नारा दिल्याप्रमाणे भाजपा लोकसभा निवडणुकीत घडू शकले असते. पण, तसे झाले का? तर नाही. त्यामुळे आता महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या महायुतीच्या यशाकडे संशयाकडे पाहण्यात काय अर्थ आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांनी आपला पराभव का झाला याची कारणे शोधावी. जनमताचा आदर करून ईव्हीएमवर खापर फोडणे आता तरी थांबवावे तूर्त एवढेच सांगावेसे वाटते.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

3 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

26 minutes ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

5 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

5 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

5 hours ago