मुंबई : राज्यात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढाई होणार आहे. त्यात दोन्ही आघाड्यांमधील जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप समोर आला नाही. महाविकास आघाडीत जवळपास ८० टक्के जागावाटप निश्चित झाले असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता महाविकास आघाडीत कोण किती जागा लढवणार याबाबत आकडे समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते पत्रकार परिषद घेत जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा करतील.
दिल्लीतील सूत्रांच्या हवाल्याने महाविकास आघाडीतील जागावाटप पूर्ण झाले असून विदर्भ आणि मुंबईतील काही जागांवरून पेच आहेत. लवकरच ते सोडवले जातील असं सांगण्यात येते. महाविकास आघाडीत काँग्रेस ११९, शिवसेना ठाकरे गट ८६ आणि शरद पवारांची राष्ट्रवादी ७५ जागा, शेकाप ३, समाजवादी पक्ष २ आणि माकप २ जागा दिल्या जातील. जागावाटपाचा हा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे.
आतापर्यंत २२२ जागांवर एकमत झालं असून त्यात मुंबईतल्या १३ जागा उबाठा गटाला, ८ जागा काँग्रेस, १ समाजवादी पार्टीला देण्याबाबत सहमती झाली आहे. अद्याप मुंबईतल्या ४ जागांवर तिन्ही प्रमुख पक्षात रस्सीखेच आहे. त्यात संभाव्य जागांमध्ये उमेदवारांची अदलाबदली होण्याची शक्यता आहे. भाजपाविरोधात एकत्रित निवडणुकीला सामोरे जायचे यावर तिन्ही पक्षांचं एकमत आहे. अनेक मुस्लीम बहुल जागांवर काँग्रेस आणि उबाठा गटाने दावा केला आहे.