सुषमा अंधारेंमुळे महाआघाडीत प्रचंड नाराजी
पुणे : एकिकडे महाआघाडीचा मुख्यमंत्री जाहीर करा, अशी मागणी उबाठा सेनेचे पक्षप्रमुख करतात. तर दुसरीकडे उबाठा गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायचे आहे त्यासाठी तयारीला लागा असे कार्यकर्त्यांना सांगतात. इतकेच नव्हे तर जागावाटपाचा पेच सुटला नसताना देखिल त्या परस्पर उमेदवारी जाहीर करत असल्याने महाआघाडीचे नेते प्रचंड नाराज झाल्याचे दिसते.
ज्या पक्षाचे आमदार जास्त, त्या पक्षाचा मुख्यमंत्री, असे महाविकास आघाडीचे सूत्र ठरले असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आपल्याला प्रत्येक जागा जिंकावी लागणार आहे. त्यासाठीच पुण्यातील वडगाव शेरी, हडपसर आणि कोथरूड मतदारसंघांची मागणी केली आहे, अशी माहिती सुषमा अंधारे यांनी एका कार्यक्रमात शिवसैनिकांना दिली. तसेच मतदारसंघातील मतदारयादीनुसार बैठका घेण्यात याव्यात. त्यात प्रभावी मतदारांची वेगळी नावे काढून त्यांच्यासोबत गुप्त बैठका घ्याव्यात. या बैठकीतील एकही गोष्ट बाहेर जणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असा संदेश देखिल सुषमा अंधारे यांनी उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. यामुळे उबाठा मुख्यमंत्री व्हावेत या आशेवर असलेल्या उबाठा सेनेने ‘देव पाण्यात बुडवले’ आहेत. तर आघाडीच्या जागावाटपात तिकीट कोणाला मिळणार हे निश्चित झालेले नसतानाही उबाठा सेनेचे इच्छूक उमेदवार निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. यामुळे आघाडीमधील अन्य पक्षाचे कार्यकर्ते नाराजी व्यक्त करत आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने पुण्यातील आठ पैकी कोथरूड, वडगाव शेरी आणि हडपसर या तीन विधानसभा मतदारसंघांवर दावा केला आहे. मात्र सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हडपसरमधून माजी आमदार महादेव बाबर निवडणूक लढवतील, असेही सोमवारी जाहीर केले.
पुण्यात सध्याचे पक्षीय बलाबल पाहता भाजपाचे पाच आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन आणि काँग्रेसचा एक आमदार आहे. हडपसरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे आमदार असून, पक्ष फुटीनंतर तुपे अजित पवार यांच्यासोबत आहेत. त्यामुळे ही जागा महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळावी, अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याकडून माजी महापौर प्रशांत जगताप तयारी करीत आहेत. ‘हडपसर’ साठी तयारीला लागा, असा संदेश वरिष्ठांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. महादेव बाबर यांनी एकदा हडपसर विधानसभेची बाजी मारली आहे. त्यामुळे हडपसरच्या जागेवरून शिवसेना आणि ‘राष्ट्रवादी’ शरदचंद्र पवार गटात जोरदार ‘सामना’ रंगण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, हडपसर मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे महादेव बाबर यांना सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीर केली. याविषयी सुप्रिया सुळे यांना विचारले असता, “सुषमा ताई त्या मीटिंगमध्ये होत्या का? त्यांना फोन करून विचारेन. माझ्या माहितीनुसार कालच्या बैठकीला त्या नव्हत्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सुषमा अंधारे यांना टोमणा मारला. तसेच जोपर्यंत जागावाटप फायनल होणार नाही, तोपर्यंत मी आऊट ऑफ लाईन बोलणार नाही. महाविकास आघाडीत कुठेही गैरसमज होईल, असे वक्तव्य मी करणार नाही. मी जबाबदार खासदार आहे, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी अंधारे यांना लगावला.