इंडिया कॉलिंग- डॉ. सुकृत खांडेकर
माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी पंधरा वर्षापूर्वी मुंबईत दैनिक प्रहार (Prahaar) सुरू केला तेव्हाच राजकारणात खोटे वागणाऱ्यांना व लबाडी करणाऱ्या अनेकांना धडकी भरली. दि. ९ ऑक्टोबर २००८ रोजी दैनिक प्रहारचा पहिला अंक मुंबईत प्रसिध्द झाला. गेल्या पंधरा वर्षात अनेक संकटांना तोंड देत आणि अनेक आव्हानांना सामोरे जात प्रहारने मुंबई- कोकणात आपला पाया भक्कम केला आहे. आज ९ ऑक्टोबर रोजी प्रहारच्या मुंबई आवृत्तीचा वर्धापन आहे. मुंबईपाठोपाठ दि. ९ नोव्हेंबर २००८ रोजी प्रहारची सिंधुदूर्ग व रत्नागिरी आवृत्ती सुरू झाली. पंधरा वर्षाचा काळ हा एका दैनिकाच्या दृष्टीने फार लहान नाही आणि फार मोठाही नाही. पण या वाटचालीत प्रहारने महाराष्ट्रातील माध्यम क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
केंद्रात, राज्यात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधे सत्ता कोणाचीही असली किंवा सरकार कोणत्याही पक्षाचे असले तरी प्रहारने आपली बांधिलकी वाचकांशी कायम ठेवली आहे. वाचकांचा दीपस्तंभ किंवा वाटाड्या म्हणून महाराष्ट्रात प्रहाराची प्रतिमा निर्माण झाली आहे. नारायण राणे तसेच त्यांचे पुत्र माजी खासदार डॉ. निलेश आणिआमदार नितेश हे सर्वजण लढाऊ नेते म्हणून राजकारणात ओळखले जातात. परिणामाची पर्वा न करता राणे पिता पुत्र आपली भूमिका मांडत असतात. पक्षाची भूमिका व पक्षाची धोरणे तेवढ्यात तडफेने लोकांपर्यत पोचविण्यात राणे परिवार आघाडीवर असतो. प्रहारही त्यांची भूमिका तेवढ्यात रोखठोक शब्दात मांडण्याचा प्रयत्न करीत असतो.
प्रहारमधे काय प्रसिध्द होते त्यावर नारायण राणे यांचे बारीक लक्ष असते. चूक झाली तर ते लगेच खडसावतात, पु्न्हा चूक होऊ नये हीच त्यांची भावना असते. नितेश राणे हे भाजपाचे प्रवक्ता म्हणून विरोधकांवर कठोर शब्दात हल्ले चढवतात व हिंदुत्वाचा वसा घेऊन राज्यभर दौरे करीत असतात. निलेश राणे हे नेहमीच सडेतोड भूमिका मांडतात. हे दोघे बंधु जाहीर सभांमधे कडक शब्दात बोलत असतात, विरोधकांना बोचकारे काढतात, पण प्रहार परिवाराला नेहमीच आदर आणि व सन्मान देतात. आपली बातमी किंवा फोटो प्रहारमधे प्रसिध्द करा, असे कधीही ते सांगत नाहीत किंवा कोणा मार्फत निरोपही देत नाहीत हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे.
कोविडच्या काळात अडिच वर्षे मीडियावर अक्षरश: आभाळ कोसळले होते, त्या काळात अनेक लहान वृत्तपत्रे बंद झाली. अनेक मोठ्या वृत्तपत्रांनी आपल्या काही आवृत्याही बंद केल्या, अनेक दैनिकांच्या पुरवण्या थांबवण्यात आल्या पण प्रहारने नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल चालूच ठेवली. कोविडच्या संकटानंतर लोकांची वृत्तपत्र वाचनाची संवय कमी झाली आहे. रस्त्यावर किंवा स्ट़़ॉलवर पेपर किंवा साप्ताहिकांची विक्री कमी झाली आहे. प्रिंट मिडियाच्या स्पर्धेत प्रहारने मात्र आपली प्रतिष्ठा व विश्वासार्हता कायम ठेवली आहे. अडिच वर्षापूर्वी प्रहारने नाशिक आवृत्ती सुरू केली. आता गेल्या महिन्यांपासून प्रहारने अहिल्यानगर (अहमदनगर) व पुण्यातही प्रवेश केला आहे. वाचकांचा वाढता प्रतिसाद बघता, लवकरच तिथेही प्रहारची घोडदौड सुरू होईल अशी आम्हाला खात्री आहे.
प्रहारची रविवारी प्रसिध्द होणारी कोलाज पुरवणी म्हणजे साहित्यिक मेजवानी असते. कोलाजमधे डॉ. विजया वाड, एकनाथ आव्हाड, सतीश पाटणकर, लता गुठे, श्रीनिवास बेलसरे, डॉ. स्वाती गानू, डॉ. महालक्ष्मी वानखेडकर, अॅड. रिया करंजकर, राजश्री वटे, प्रा. प्रतिभा सराफ, स्वाती चिटणीस, पूर्णिमा शिंदे, पल्लवी अष्टेकर, गुरूनाथ तेंडुलकर, देवबा पाटील, रमेश तांबे आदी लेखकांची टीम हे प्रहारचे वैभव आहे. शिवाय शब्दकोडे व सुरेश वांदिले यांचे करिअर मार्गदर्शन जोडीला आहेच. आमची शाळा हे तर प्रहारचे वेगळेपण आहे. शाळेची वाटचाल, शाळेची प्रगती, शाळेतील विद्यार्थींनी घेतलेली झेप, संस्थापक व शिक्षकांची ध्येयपूर्ती याचा आढावा फोटोसह आमची शाळा या स्तंभात असतो. विद्यार्थी, शिक्षक, पालक व शाळा व्यवस्थापन यासर्वांच्याच जिव्हाळ्याचे हे सदर असून शाळांची या स्तंभात येण्यासाठी रांग लागली आहे.
रविवारी मंथन पुरवणीत डॉ. वीणा सानेकर, पूजा काळे, अर्चना सोंडे, तसेच संपादकीय पानावर नियमीत लेखन करणाऱ्या शिबानी जोशी, यांनी वाचकांमधे वेगळे स्थान मिळवले आहे. मंगेश महाडिक यांचे दैनंदिन व साप्ताहिक राशी भविष्य तसेच बु्ध्दीला चालना देणारे शब्द कोडेही दर रविवारी प्रहारमधे प्रसिध्द होते.
दर शनिवारी प्रसिध्द होणाऱ्या रिलॅक्स या मनोरंजन पुरवणीत चित्रपट, नाटक, टीव्ही मालिका यांतील घडामोडी वाचायला मिळतात. भालचंद्र कुबल, ऋतुजा केळकर, राज चिंचणकर, युवराज अवसरमल ही रिलॅक्स टीम आघाडीवर असते. अर्थविश्वमधे तर आर्थिक घडामोडींवर भाष्य, विश्लेषण व मार्गदर्शन आहे. उमेश कुलकर्णी, नंदकुमार काकिर्डे, महेश मलुष्टे, डॉ. सर्वेश सोमण, महेश देशपांडे आदी अर्थतज्ञांचे त्यात लेख असतात. संपादकीय पानावर मीनाक्षी जगदाळे यांचे फॅमिली कौन्सलिंग, अल्पेश म्हात्रे यांचे मुंबई डॉट कॉम, मंगला गाडगीळ, मधुसुदन जोशी, उदय पिंगळे, ममता आठल्ये आदींचे मुंबई ग्राहक पंचायत, अभयकुमार दांडगे यांचे मराठवाडा वार्तापत्र, रवींद्र तांबे, हेमंत देसाई आदी लेखकांची टीम आहेच.
श्रध्दा संस्कृती या अध्यात्मिक पानावर प्रा. मनीषा रावराणे, सदगुरू वामनराव पै, प्रवीण पांडे, विलास खानोलकर यांच्या स्तंभातून ज्ञानेश्वरी, गजानन महाराज, श्री स्वामी समर्थ अशा संत महात्म्यांचे जीवन व विचार यांचे दर्शन होते. क्रीडाप्रेमी वाचकांसाठी प्रहारमधे रोज संपूर्ण पान आम्ही राखीव ठेवले आहे. प्रहार व्यासपीठ हे आमचे आणखी वेगळेपण आहे. प्रासंगिक घडामोडींवर अगदी हिट अँड रन अपघातापासून ते महिला सुरक्षापर्यंत व मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेपासून ते शिवनेरी सुंदरीपर्यंत सर्व विषयांवर अभिप्राय व्यक्त करायला वाचकांसाठी हे खुले व्यासपीठ आहे.
चित्रपट, नाटक, मालिका, समाजसेवा, शिक्षण, उद्योग- व्यापार अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना व बोलावून त्यांचा सन्मान करण्यासाठी प्रहार गजाली ही कार्यक्रम मालिका खूप लोकप्रिय ठरली. या कार्यक्रमात व्यक्त केलेले मनोगत प्रहारमधून आणि प्रहार डिजिटलच्या माध्यमातून लक्षवधी लोकांपर्यंत आम्ही पोचवले. प्रहार गजालीमधे आजवर अश्विनी भिडे, प्रेमानंद गजवी, चिन्मयी राघवन, संजय मोने, मिलिंद इंगळे, अमृता राव, गणेश चंदनशिवे, अरूण म्हात्रे, फुलवा खामकर, पंढरीनाथ कांबळे, डॉ. पल्लवी साफळे, भार्गवी चिरमुले, विसुभाऊ बापट, डॉ. राजश्री कटके, आदिती सांरगधर, मीनल मोहाडीकर, अच्चुत पालव, प्रल्हाद पै, इंद्रनील चितळे, चंद्रकांत शेवाळे अशा पन्नास नामवंतांनी हजेरी लावली. लवकरच प्रहार गजाली मालिका नव्याने सुरू होणार आहे.
यंदा महिला दिन कार्यक्रमात ठाण्याच्या राज्ञी वेलफेअरच्या वैशाली गायकवाड व गायत्री डोंगरे, पोलीस उपनिरीक्षक रूपाली साळुंखे, महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. वसुंधरा गळधन यांचा सहभाग होता. सध्या नवरात्र उत्सव चालू आहे. रोज एक देवीची माहिती व त्यावर प्रश्नमंजुषा अशी वाचकांसाठी स्पर्धा आहे. विजेत्यांना पैठणी दिली जाणार आहे. शिवाय सन्मान नारी शक्तिचा या सदरातून उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांची नऊ दिवस रोज फोटोसह माहिती प्रसिध्द केली जात आहे. पूजा काळे व वर्षा हांडे- यादव यांनी त्यासाठी लेखन केले आहे.
क्रीकेट प्रेमी वाचकांसाठी आयपीएस व विश्व चषक स्पर्धेसाठीही प्रहारने प्रश्न मंजुषा स्पर्धा योजली होती, अशा स्पर्धांना वाचकांचा उदंड म्हणजे सदतीस हजारांहून जास्त वाचकांचा प्रतिसाद मिळाला.
यंदा आयोजित केलेल्या घरगुती गणेश सजावट स्पर्धेमधे साडेसातशेहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला. स्पर्धेतील विजेत्यांना वॉशिंग मशिन, कुलर, बॅगा, मिक्सर, ज्युसर, टॉवर फॅन, डिनर सेट, म्युझिक सिस्टीम, स्मार्ट वॉच, मोबाईल फोन आदी बक्षिसे देण्यात आली.
संदीप खांडगे – पाटील (मुंबई), संतोष वायंगणकर (सिंधुदूर्ग), नरेंद्र मोहिते (रत्नागिरी), सुभाष म्हात्रे (अलिबाग, रायगड), प्रशांत सिनकर (ठाणे), दीपक मोहिते (पालघर), प्रताप जाधव (नाशिक), राजेश जाधव (शिर्डी, अहिल्यानगर) या तडफदार कार्यक्षम संपादकीय टीमचा प्रहारच्या प्रगतीत मोठा वाटा आहे.
प्रहारचे महाव्यवस्थापक व राणे प्रकाशचे मुद्रक- प्रकाशक मनीष राणे, प्रहारचे लेखा, हिशोब, प्रशासन व वितरण विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत, जाहिरात विभागाचे दिनेश कहर, कला विभागाचे प्रमुख निलेश कदम, डिजिटल टीमचे प्रमुख राजेश सावंत, आयटी विभाग प्रमुख राकेश दांडेकर, मुद्रीत शोधक विभागाचे प्रमुख अजित राऊत तसेच वितरणचे राजेश मर्तल, जाहिरीत विभागाचे कौशल श्रीवास्तव, प्रमोद साळुंखे, किशोर उज्जैनकर अशा भक्कम व कार्यक्षम टीममुळे प्रहारची वाटचाल दमदारपणे चालू आहे.
प्रहारने अनेकांना न्याय मिळवून दिला तसेच अनेक शत्रूही निर्माण केले. पण प्रहारमधील लिखाण चुकीचे आहे, असे कोणी म्हणू शकले नाही. प्रहारच्या रूपाने मोदी- शहा- शिंदे- फडणवीस, भाजपाला धारदार शस्त्र मिळाले आहे. विधानसभा निवडणूक महिनाभरावर आली आहे, या निवडणुकीत जनतेशी बांधिलकी ठेऊन वास्तव व सत्य मांडण्याचा वसा प्रहार चालूच ठेवील.
प्रहारच्या पहिल्या अंकात सल्लागार संपादक नारायण राणे यांनी पहिल्या पानावर लिहिलेल्या अग्रलेखात म्हटले होते – महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाच्या नागरिकापर्यंत बातम्या पोचवणे हा प्रहारचा हेतू राहील. त्या माणसाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रहार झटणार असून विकास, उन्नती व प्रगतीसाठी हे वृत्तपत्र धारदार शब्दांनी प्रहार करील…. राणे साहेबांनी आखून दिलेल्या मार्गावरूनच प्रहारची वाटचाल चालू आहे.